सुलभाताईंच्या कला प्रांताचा आवाका खूपच मोठा आहे. हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिका, मराठी-हिंदी नाटकं, मराठी-हिंदी चित्रपट, शिवाय लघुपट आणि ३४ पेक्षा जास्त जाहिरातपट तसेच त्यांनी दिग्दर्शन केलेली नाटकं. त्यांच्या ‘आविष्कार’ आणि ‘चंद्रशाला’ या दोन नाटय़संस्थेतून तर अनेक कलाकार घडले. प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळाला.. अरविंद – सुलभा देशपांडे यांची रंगभूमीची सेवा सुफळ संपूर्ण झाली. त्या सुलभाताईंचा पहिला स्मृतिदिन उद्या ४ जूनला आहे. त्यानिमित्ताने..

भा. रा. तांबे यांची एक कविता-

‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला

आज पासुनी जीवे अधिक तू माझ्या ह्रदयाला

नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनात..

या कवितेतल्या तरल भावार्थाप्रमाणे पती-पत्नीने असायला पाहिजे.. ते जोडपं तसंच होतं.. ही कविता त्या दोघांची आवडती होती. मग तो तिला ती नेहमी गायला सांगत असे..

खरं तर दोघांचं नाटय़वेड कमालीचं, टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात. मुख्य मुंबई शहरातल्या प्रेमिकांना मलबार हिलची बाग एकांतात गप्पात रंगून जाण्यासाठी आवडत असे. हे प्रेमीयुगुल मलबार हिल चढून गेलं, पण ओढ वाटत असली तरी अजून ते कळीचं वाक्य दोघांमध्ये उच्चारलं गेलं नव्हतं. त्यामुळे मौनात दोघं ती टेकडी चढले आणि उतरले. खिशात पैसे बेताचे असले तरी मग आइस्क्रीम खायचं ठरलं. नंतर टॅक्सीने तिला घरी सोडायचं, असाही बेत ठरला. दोघांनाही उगाच हसू येत होतं आतल्या आत, एकमेकांकडे पाहताना मात्र चेहरा गंभीर, पण डोळे ‘देई वचन तुला’ असं सांगत होते. शेवटी त्याने तिला लग्नाचं विचारलं.. तेव्हा काही सेकंदांसाठी तिच्या घशात आइस्क्रीम अडकलं तरी ‘मला आवडेल’ एवढंच वाक्य बाहेर पडलं; पण पुढचं वाक्य कसं उच्चारायचं हे त्या २०/२१ वर्षांच्या मुलीला कळत नव्हतं. त्यानेच त्या पणला पुस्ती जोडली.. ‘लग्न केल्यावर नाटक सोडायचं नाहीस तू.’ बस्स, हेच तर हवं होतं. आता सुटकेच्या भावनेने तिला हसू फुटलं. कसाटा आइस्क्रीम महाग असल्याने पैसे संपले. मग टॅक्सी कुठली, बसच्या रांगेत उभं राहावं लागलं.. पुढची दोन र्वष ते असे छान प्रियकर-प्रेयसीची भूमिका जगत होते. १९६० मध्ये सुलभा कामेरकर सुलभा देशपांडे झाली आणि पुढे   हे  दाम्पत्य विलक्षण पद्धतीने नाटक जगले..

सुलभाताईंनी रंगभूमी, चित्रपट (मराठी, हिंदी), जाहिराती, बालरंगभूमी इत्यादी जवळजवळ ६२ र्वष (१९५० – शालेय रंगभूमी ते २०१२ – ‘इंग्लिश विंग्लिश’ हिंदी चित्रपट) या सर्व क्षेत्रांत स्वत:ला वाहून घेतलं; पण सुलभा देशपांडे हे नाव उच्चारताच प्रेक्षक, रसिक यांच्यासमोर उभी राहते ती ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकातली प्रमुख व्यक्तिरेखा- ‘लीला बेणारे’. जसं ‘नटसम्राट’ म्हणजे डॉ. लागू, फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे, ‘कटय़ार’मधले खाँसाहेब म्हणजे वसंतराव देशपांडे, तसं ‘शांतता कोर्ट चालू आहे’मधली लीला बेणारे म्हणजे सुलभा देशपांडे हे समीकरण झालं. हे नाटक अनेक भाषांमध्ये गेलं आणि जागतिक पातळीवर पोचलं..

अरविंदबरोबरचा सुलभाताईंचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठय़ा जमा झाल्यावर सुलभाताईं त्यांना म्हणाल्या, ‘‘या चिठ्ठय़ा घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं..

मुलगा निनाद ३/४ वर्षांचा होईपर्यंत सुलभाताई नाटक सोडून घरीच रमल्या. भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये, ‘रंगायन’मध्ये मात्र जात राहिल्या, कारण नाटकाचं वातावरण. त्याच इमारतीत अल्काझींची थिएटर युनिट ही हिंदी नाटकवाल्याची संस्था. सत्यदेव दुबे ती सांभाळत. ते अरविंदचे मित्र. एकदा ते अडचणीत होते. त्यांनी अरविंदला गळ घातली आणि अरविंदनी सुलभाताईंना. ‘कलकत्ता फेस्टिव्हल’मध्ये थिएटर युनिटचं नाटक सादर होणार होतं- ‘अंधायुग’. त्यातली मूळ गांधारी आजारी पडली होती. फेस्टिव्हल चार दिवसांवर आला होता. ती गांधारी (हिंदीत) सुलभाताईंनी उभी करावी म्हणून अरविंद सुलभाताईंना सांगत बसले, ‘‘रंगभूमीची तुझ्याकडून कलावंत म्हणून अपेक्षा आहे, तू हे चॅलेंज स्वीकार. आपला विश्वास आपल्यावर बसणं आवश्यक आहे. आर्टिस्ट जितका टेन्शनमध्ये तितकंच त्याचं काम चांगलं होतं. वगैरे वगैरे.’’ सुलभाताई सांगतात, ‘‘असं जगावेगळं अभिनयाचं तंत्र अरविंद मला सांगत होता आणि शेवटी मी गांधारीची भूमिका करायला तयार झाले. चार दिवस हिंदी उच्चारांसह कसून तालीम केली.’’

आणि नेमका निनाद आजारी पडला; पण अरविंदनी ताईंना गळ घातलीच, ‘‘कलकत्त्याची तयारी कर. प्रेस्टिज शो आहे. रंगभूमीची प्रतिष्ठा राखली पाहिजे.’’ सत्यदेव दुबे न्यायलाही आले, त्यांनी सुलभाताईंची बॅग घेतली. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. सुलभाताई म्हणतात, ‘‘तापानं फणफणलेल्या निनादने हे पाहिलं. नंतर दोन र्वष तो दुबेंशी बोलत नव्हता.’’ ‘अंधायुग’मध्ये तेव्हा अमरीश पुरी, राजेश खन्ना हे हिंदी थिएटरचे कलावंत होते. कोलकात्याला पोचताच सुलभाताईंना तार मिळाली- ‘निनादचा ताप उतरला.’ त्या म्हणतात, ‘‘त्या दिवशी माझी गांधारीची भूमिका इतकी छान झाली की शेवटचा, कृष्णाला गांधारी शाप देते तो सीन आठवला की, अजूनही अंगावर शहारे उभे राहतात.’’

विजय तेंडुलकरांची नाटकं अरविंद त्या काळात दिग्दर्शित करीत होते. तेव्हा सुलभाताई दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतही सहभागी झाल्या. ‘‘आपल्याला काय हवं आहे हे फक्त आपल्याला कळून चालत नाही तर करणाऱ्या कलाकाराला ते सांगता आलं पाहिजे. या दिग्दर्शनाच्या मुख्य सूत्राचे धडे गिरवायला मी सुरुवात केली. अजूनही माझा तो धडा पूर्ण झालेला नाही,’’ असं सुलभाताई नमूद केलं आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नाटक. त्या आधी सुलभाताई बऱ्याच नाटकांत कामं करीत होत्याच; पण अरविंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या बेणारेला सुलभाताईंनी अजरामर केलं.

त्याची पाश्र्वभूमी थोडी अशी. १९६७ मध्ये ‘रंगायन’साठी राज्य नाटय़ स्पर्धेसाठी नाटक करायचं ठरलं तेव्हा स्पर्धा तीन आठवडय़ांवर आली होती आणि तेंडुलकरांनी नाटक लिहायला सुरुवात केली. रोज लिहिलेली काही पानं तेंडुलकर पाठवायचे. सुलभाताई म्हणतात, ‘‘नाटक कसं बसवू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘शांतता कोर्ट..’ अरविंद मला रात्री अभ्यासाला बसवल्यासारखा नाटकातले प्रसंग समजावून द्यायचा. मी फक्त दुसऱ्या दिवशी त्या तालमीत करवून घ्यायची. मधला भरणा आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक कलावंत भरायचा. आपली भूमिका आपणच सजवायची. डायरेक्टरचं म्हणणं मी फक्त सांगायची, अरविंदने रिमोट कंट्रोलने हे नाटक बसवलं.’’ ‘शांतता कोर्ट..’मधलं लीला बेणारेचं स्वगत हे तालमीच्या ठिकाणी तेंडुलकर आल्यावर त्यांना एका खोलीत बंद करून लिहून घेण्यात अरविंद देशपांडे यशस्वी झाले आणि नंतर ते नाटक इतकं गाजलं की  तेरा भारतीय भाषांमध्ये या नाटकाचा अनुवाद झाला. ‘शांतता..’ हे नाटक २० डिसेंबर १९६७ रोजी स्पर्धेत रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये प्रथम सादर झालं आणि विजय तेंडुलकरांना या नाटकासाठी कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार मिळाला. नाटक मग हाऊसफुल्ल होऊ लागले.

पुढे ‘रंगायन’ ही संस्था फुटली आणि अरविंद-सुलभा देशपांडे, अरुण काकडे इत्यादींनी ‘आविष्कार’ संस्था जन्माला घातली. ‘शांतता..’चे प्रयोग या संस्थेतर्फे  चालू राहिले. ज्या छबिलदास शाळेत सुलभाताई शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका होत्या. तिथेच ‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळाला. तीच छबिलदास चळवळ. रंगायननंतर ‘शांतता..’चे प्रयोग ‘आविष्कार’च्या वतीने चालू ठेवायचं ठरलं. सुलभाताई म्हणतात, ‘‘गृहिणी सचिव’ अशीही भूमिका (प्रयोग चालू ठेवायचा) माझ्यावर येऊन पडली.’’

अरविंद यांनी या नाटकाबद्दल लिहिलं आहे, ‘‘शांतता कोर्ट चालू आहे’ ही लीला बेणारेची शोकांतिका नाटकभर विनोदी स्वरूपात मांडलेली असली तरी या शोकांतिकेचा अंत:प्रवाह वेगळा आहे, अतिशय तरल व गंभीर आहे. वरवर खेळकर दिसणारी बेणारे कुठे तरी खोल दुखावली गेली आहे. सहकाऱ्यांनी सुरू केलेला अभिरूप न्यायालयाचा खेळ. बेणारेवर भ्रूणहत्येचा ठेवलेला आरोप. (ती अविवाहित आहे) ती त्यात अडकत जाते. तो खेळ राहत नाही. ती शिकार होते. निर्घृण हिडिस किळसवाणी शिकार. प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडतो. शेवटचं तिचं स्वगत, तिला शिक्षा फर्मावली जाते. मग टाइम अप म्हणून नाटक पुन्हा रिअ‍ॅलिस्टिक पातळीवर येतं. बेणारे आरोपीच्या पिंजऱ्यात सुन्न आहे. नाटकातला एक कलावंत सामंत पुतण्यासाठी आणलेला खेळातला पोपट तिच्याजवळ ठेवतो. ‘चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले’ बालकवींच्या या कवितेवर पडदा पडतो. पहिल्या भागात हीच कविता बेणारे गुणगुणत असते.’’

१९७९ हे बालक वर्ष म्हणून सुलभाताईंनी बालनाटय़ विभाग सुरू करायचं ठरवलं; त्याचं नामकरण ‘चंद्रशाला’ केलं आणि त्यासाठी सुलभाताईंनी तनमनधन खर्च केलं आणि थाटात बालनाटय़ विभाग सुरू झाला. विजय तेंडुलकरांची बरीच बालनाटकं सुलभाताईंनी केली.

पुढे दोघांनीही- सुलभाताईं व अरविंद यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून पूर्णपणे रंगभूमीला वाहून घेतलं. प्रायोगिक, व्यावसायिक आणि बालरंगभूमी इतक्या तीन तीन पातळ्यांवर काम सुरू होतं आणि त्यात मुलाचं संगोपन, संसार या गोष्टी तर कोणत्याही स्त्रीच्या रक्तातच मुरलेल्या असतात. अरविंद देशपाडे यांचे चित्रपट क्षेत्रातले मित्र शशी कपूर त्यांना म्हणत, ‘‘अरविंद, अरे आपल्या बायका आपल्यापेक्षा अभिनयामध्ये कणभर जास्त हुशार आहेत. हे तुला कबूल केलं पाहिजे.’’ तर सुलभाताई म्हणतात, ‘‘अरविंद म्हणत, तू माझी मित्र आहेस, कारण शिष्टसंमत पती-पत्नीचं नातं त्याला मान्य नव्हतं. मी त्याची समीक्षक होते; पण तो माझा फॅन होता.’’ सुरुवातीला उद्धृत केलेली तांबे यांची कविताच ही दोघं जगत होते..

दोघांनी नोकरी सोडून नाटकाला वाहून घेतल्याने कधी कधी आर्थिक अडचण असे खरं म्हणजे अरविंदना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर तळमजल्यावरच्या जागेची आवश्यकता होती, कारण त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर होता. सुलभाताई लिहितात, ‘तुमचं लंडनचं तिकीट आलंय दोन दिवसांत निघायचंय!’ असा अरविंदसाठी आलेला फोन मीच घेतला. खूप उत्साहात होते. ही इंग्लिश फिल्म अरविंदला लाख-दीड लाख रुपये मिळवून देणार होती. म्हणजे चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर यायला दीड-दोन लाखांची आवश्यकता होती, ती संधी आपोआप चालून आली आणि मी त्याची तयारी करण्यात गुंतले.’ त्या वेळी अरविंद यांचं ‘प्रेमाच्या गावा जावे’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर जोरात चालू होतं. त्यामुळे ‘‘मी लंडनला जाणार नाही. नाटकाचे महिन्याला पंचवीस प्रयोग होताहेत. मी नसताना प्रयोग बंद म्हणजे निर्मात्यासह (मोहन वाघ) नाटकावर अवलंबून असलेल्या सगळ्यांचंच रोटी-पाणी बंद. हे योग्य नाही,’’ असं सांगून ते खरंच लंडनला गेले नाहीत. सुलभाताई रागावून त्यांना म्हणाल्या, ‘‘तुझ्या नुकसानीचं काय? कोण देणार आपल्याला तळमजल्यावर जागा? या पैशांत आपल्याला जागा घेता येईल.’’ ‘‘तो (निर्माता) नुकसानभरपाई करणार आहे.’’ अरविंदनी सांगितलं. सुलभाताई म्हणतात, ‘‘पुढे कबूल केल्याप्रमाणे मोहनने नुकसानभरपाई केली; पण तोपर्यंत माझं फार मोठं नुकसान होऊन गेलं होतं.. माझा सहचर मला पूर्णपणे स्वतंत्र करून कायमचा निघून गेला होता.. ३ जानेवारी १९८७ ला.’’

‘सखाराम बाईंडर’ हिंदूीत झालं, त्यात सुलभाताई चंपा होत्या. सुलभाताईंचं व्यक्तिमत्त्व आणि चंपाची भूमिका पूर्णपणे भिन्न. त्या वेळी सत्यदेव दुबे म्हणाले, ‘‘तुझ्या प्रकृतीला चंपा कशी मानवणार.’’ पण सुलभाताई म्हणाल्या, ‘‘माझी प्रकृती अभिनेत्रीची आहे, सुलभा देशपांडेची नाही. चंपा समजून घेता आली तर करेन.’’ हे नाटक त्यांनीच दिग्दर्शित केलं होतं. यात सखाराम होते अमरीश पुरी, तर लक्ष्मी प्रेमा साखरदांडे होत्या. हेही नाटक गाजलं आणि मग १९७९ पासून दूरदर्शन, दूरचित्रवाणी मालिका सुरू झाल्या. मराठीत ११७ पेक्षा जास्त, हिंदी मालिका २११, मराठी-हिंदी नाटकं, मराठी-हिंदी चित्रपट, शिवाय लघुपट आणि ३४ पेक्षा जास्त जाहिरातपट. ‘जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन’ कंपनीच्या सुलभाताई ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होत्या. सुलभाताईंच्या कला प्रांताचा आवाका खूपच मोठा आहे. त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेली नाटकं, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका ही माहिती चोवीस पानी आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अशीच शंभराच्या घरात.

‘शांतता कोर्ट..’मध्ये शेवटी लीला बेणारे ही व्यक्तिरेखा कविता म्हणते, ‘चिमणीला मग

पोपट बोले का गं तुझे डोळे ओले, काय सांगू

बाबा तुला माझा घरटा कोणी नेला.’ इथे अरविंद गेल्यावर या अभिनेत्रीने त्यांचं घरटं पुन्हा उभारलं आणि त्या कार्यरत राहिल्या ते मे २०१६ पर्यंत.. तब्बल २९ वर्षे.

‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला’ – सुरुवातीला या त्यांच्या आवडत्या कवितेचा उल्लेख झाला आहे. त्यातलं ‘देई वचन तुला’ हे अरविंदसाठी असलेलं वचन या गुणी स्त्रीने मनोमन अंगीकारलं. इतक्या अनेक पातळ्यांवर कलेचा उत्कट आविष्कार साकारणाऱ्या सुलभाताईंचा पहिला स्मृतिदिन उद्या आहे. त्यांची आठवण जागवताना लक्षात आलं, ज्या ज्या वेळी सुलभाताईंची भेट झाली त्या त्या वेळी त्यांच्यातल्या कलावंत स्त्रीचं सोज्वळ, सात्त्विक, वात्सल्यपूर्ण रूप आणि या सर्व उत्कट भावभावनांचा ढग तयार होई आणि त्यातून प्रत्ययास येणारं अस्पर्श असं काही मला वेढून टाकत असे..

मधुवंती सप्रे

madhuvanti.sapre@yahoo.com

संदर्भ – रंगनायक – अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ