आत्मचरित्र, आत्मकथनातून संबंधित लेखक ज्या क्षेत्रातील असतो त्यातील बहुविध अनुभव मांडले जातात. बाराव्या शतकापासून विविध धर्म, पंथ वा संप्रदायांतील संत-सत्पुरुषांनी जी वाङ्मयनिर्मिती केली, त्यातही आत्मपर लेखन आढळते. हे ध्यानी घेऊन ‘मार्गस्थ’चा विचार करता येतो. महानुभाव पंथाच्या बा. भो. शास्त्री यांचे हे आत्मचरित्र दोन भागांत आहे. वर्तमान स्थितीत पंथीय विचारधारा स्वीकारलेल्या महंताचे हे पहिलेच आत्मचरित्र मानावे लागेल. महानुभाव पंथात लिहिले गेलेले वाङ्मय सांकेतिक लिपीत बद्ध असल्याने वाचकांसमोर येण्यास खूप विलंब लागला. या वाङ्मयात पंथीय दृष्टी प्रधान होती. ललितलेखनात पंथीयांचा फारसा संबंध दिसत नाही. मात्र, अलीकडच्या काळात कविता, कादंबऱ्या  लिहिल्या जाऊ लागल्या आहेत. बा. भो. शास्त्रींच्या मते, ‘ज्यांनी मराठीतला आद्यग्रंथ लिहिला, आजवर साडेसहा हजार ग्रंथांची भर टाकली, ते महानुभाव साडेसातशे वर्षांपासून अबोल राहिले. स्वतला लपवत राहिले. हा धागा पकडून मी बोलायचं ठरवलं.. स्वतबद्दल.’

त्यांची स्वकथनाची ही भूमिका संवादाची आहे. परमार्थाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या एका उपासकाची ही जीवनगाथा आहे. अतिशय नितळ, पारदर्शी; पण तितकेच परखड असे हे लेखन आहे. बा. भो. शास्त्रींचा प्रांजळपणा व सत्यकथनाची दृष्टी यात प्रकटली आहे. एका महंताचा खडतर प्रवास उलगडणारे हे लेखन आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

‘मार्गस्थ’च्या पहिल्या भागात बाभूळगावकर शास्त्रींच्या जगण्याचा पूर्वार्ध उलगडतो. पंथदीक्षा घेण्यापूर्वीचे त्यांचे जगणे आणि दीक्षेनंतरचे जीवन यांचा विस्तृत पट त्यात दिसतो. त्यांच्या कौटुंबिक जीवनातील चढउतार त्यात प्रतििबबित झाले आहेत. आपली खरी जन्मदात्री आणि वडील कोण आहेत, हे उशिराने कळल्यानंतरची त्यांची उलघाल वाचकालाही अस्वस्थ करते. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सरभर झालेले जीवन हा त्यांच्या जीवनातला चटका लावणारा भाग. वयाच्या सतराव्या वर्षी अक्षरांची ओळख झालेला हा महंत वारकरी पाश्र्वभूमी असणारा आहे. साहजिकच या दोन्ही संप्रदायांचा प्रभाव त्यांच्यावर आहेच; त्याचबरोबर या काळात मधुकरराव चौधरी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. अ. ना. देशपांडे यांच्या व्याख्यानांचा प्रभावही शास्त्रीजींवर पडला. डॉ. रा. बो. मेश्राम यांची भेट व अन्य ज्येष्ठांच्या सहवासातून तयार झालेल्या त्यांच्या वैचारिक मांडणीचे वेगळेपण ध्यानात येते. नतिक संस्कार आणि संस्कृती यांचा धर्माशी असणारा संबंध व त्यातून जातविरहित समाजव्यवस्थेविषयीचे चिंतन ‘मार्गस्थ’मध्ये येते. महानुभाव पंथ ‘मार्ग’या नावानेही ओळखला जातो. श्रीचक्रधर यांनी जीवोद्धरणाचे कार्य स्वीकारले होते. त्या कार्याशी समरस होत केलेली वाटचाल पहिल्या भागात आहे.

‘मार्गस्थ’चा दुसरा भाग शास्त्रीजींच्या जीवनाचा शोध घेणारा आहे. विविध घटना-प्रसंगांचे अन्वयार्थ लावण्याचा प्रामाणिक व तटस्थ प्रयत्न त्यात आहे. अन्य पंथ-संप्रदायांपेक्षा महानुभावांची उपासना पद्धती, त्यांचे तत्त्वज्ञान, आश्रमव्यवस्था, पोशाख यांत खूपच वेगळेपण आहे. त्यांची समूहाभ्यासाची रीतही निराळी आहे. कालौघात भौतिक समृद्धी आल्यानंतर बदलत गेलेले जीवन, विचारांमध्ये होत गेलेले स्थित्यंतर, पंथप्रचाराच्या पद्धतीत झालेले बदल हे दूर राहून लक्षात येणारे नाहीत. महानुभाव पंथातील अधिकारी व्यक्तीच नेमकेपणाने यावर भाष्य करू शकतात. ‘मार्गस्थ’मध्ये याचे नकळत दर्शन घडते. पंथाविषयी अनभिज्ञ असणाऱ्यालाही ते सहज उमजू शकतात. कारण शास्त्रीजींची भाषा प्रवाही व लालित्यपूर्ण आहे. प्रसंग खुलविण्याची हातोटीही विलक्षण आहे. त्यांची भाषाच केवळ प्रभावी नाही, तर पंथामधील अंतर्गत धुसपूसही त्यात जाणवते. स्पष्टवक्तेपणाची लेखकाची भूमिकाही लक्षात येते. महंत नागराजबाबांचे प्रागतिक विचार, काळाबरोबर बदल स्वीकारण्याची त्यांची वृत्ती याचेही सूचन शास्त्रीजी करतात.

आपल्या वाटचालीत महानुभाव व वारकरी संप्रदायांमध्ये झालेल्या विचारसंघर्षांची नोंदही येते. ‘माझं माहेर वारकरी व सासर महानुभाव आहे. माहेर व सासरच्या संघर्षांत सापडलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली होती,’ अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे. महानुभाव पंथाची नालस्ती करणारे लेख जेव्हा छापले गेले तेव्हा वैचारिक पातळीवर ‘आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडा ना’ हे पुस्तक लिहून बाभूळगावकर शास्त्रींनी त्याला उत्तर दिले. वारकरी संतांविषयीची आदरभावना मनात असल्याने समन्वयाची भूमिका त्यांनी स्वीकारली. याप्रसंगी मदत करणाऱ्या वारकरी सत्पुरुषांची कृतीही शास्त्रीजींनी अधोरेखित केली आहे.

‘मार्गस्थ’ हे महंत बाभूळगावकर शास्त्रींचे केवळ आत्मचरित्र नाही. महानुभाव पंथाची वाटचाल, पंथात होणारे बदल, पंथाच्या बऱ्या-वाईट गोष्टी, पंथातील व पंथीयेतर व्यक्ती, पंथप्रचारासाठी केलेले काम, जाणीवपूर्वक केलेले प्रयोग यांचे दर्शन घडवणारे हे लेखन आहे. प्रारंभीच्या पुस्तक प्रकाशनाचे अनुभव कथन केले जातात. कितीतरी मोहाचे क्षण येतात, त्यातून निर्णयही चुकू शकतो याची नोंद केली जाते. पंथातील संप्रदायविशिष्ट शब्दांचे दर्शनही यात घडते. उदा. महंती, झेंडा, लघुचिंतनी, महाचिंतनी, इत्यादी. महानुभाव पंथातही कीर्तन असते. पण कीर्तनाबद्दल पंथीयांना आदर नव्हता. संगीतालाही मान नव्हता. ही कीर्तनपरंपरा रुळवण्याचा प्रयत्न शास्त्रीजींनी केला. ब्रह्मविद्या प्रवचन, शास्त्री संमेलन, महाचिंतनी असे प्रयोग केले गेले. पंथात असणारी जाहीर पोथी करण्याची पद्धत इतरांना ज्ञात नाही, याचीही नोंद या आत्मकथेत आहे. ‘भेटकाळ’ नावाचा प्रसिद्ध कार्यक्रम आज लुप्त झाला आहे. अशा बारीकसारीक गोष्टी यातून आकळतात. पंथीयांच्या जगण्याचे पलू ‘मार्गस्थ’मधून ज्ञात होतात. प्रत्यक्ष पंथात पंथमान्य गाद्यांवर दोन-दोन महंत असणे, त्यातून गट-तट, कलह होणे, हेवेदावे झाल्याने विद्वानांमध्ये तेढ व तणाव निर्माण होणे, सत्तेसाठी प्रयत्न करणे या पंथातील विकृतींच्या सूचनातून पंथाच्या काही मर्यादाही मांडल्या आहेत. पंथाची म्हणून एक व्यवस्था आहे. महंती असणे हा आश्रमव्यवस्थेशी निगडित असा भाग आहे. ‘श्रीचक्रधरांनी सांगितलेली जीवनमूल्ये लोकांना सांगून फाटत चाललेलं माणूसपण सांधणं हे आमचं ध्येय होतं,’ ही शास्त्रीजींची भूमिका होती. सर्वज्ञ विद्यापीठाची निर्मिती, पंथाच्या अभ्यासक्रमाच्या मांडणीबद्दलचे शास्त्रीजींचे विवेचन त्यांच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. तर दुसऱ्या बाजूला पप्पू, राजा, हिरा यांसारख्या व्यक्तींशी आलेले आत्मीय संबंध बाभूळगावकर शास्त्रींच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकतात. पंथीय व पंथीयेतर अनेक व्यक्तींची व्यक्तिचित्रे यात आहेत.

महानुभाव पंथातील एका महंताची ही आत्मकथा तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. आत्मलोपाची भावना मनात ठेवूनही महंत बाभूळगावकर शास्त्री मात्र ‘स्व’ला शोधण्याची धडपड करताना दिसतात. ‘मार्गस्थ’ हा केवळ ‘स्व’चा शोध नाही, तो माणूसपणाचाही शोध ठरतो. महानुभावांची आश्रमव्यवस्था, त्यांची कार्यपद्धती यांचा ओझरता का होईना, पण परिचय होतो. एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून कळतं. स्वतविषयी न बोलणाऱ्या महंताचा आतला आवाज ‘मार्गस्थ’मध्ये उमटला आहे. म्हणूनच ही मौनाची गुपिते उलगडणारी अनोखी आत्मकथा ठरते.

‘मार्गस्थ’- बा. भो. शास्त्री,

आदित्य प्रकाशन, 

भाग-१ (पृष्ठे- १५६, मूल्य- २००  रुपये)

भाग- २ (पृष्ठे- २००, मूल्य- २५० रुपये) 

डॉ. सतीश बडवे