नव्वदोत्तर कवितेच्या उत्तरार्धामध्ये लिहू लागलेल्या योगिनी सातारकर-पांडे या कवयित्रीचा ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ हा पहिलाच कवितासंग्रह आहे. ‘स्व’पासून सुरू झालेला हा प्रवास स्त्री-जाणिवांचे वेगवेगळे आयाम शोधत या कवयित्रीच्या सकस, अर्थपूर्ण निर्मितीची साक्ष देतो. ही कविता मराठीतील दर्जेदार नियतकालिकांतून पुढे आली आहे. तसंच या कवितेने स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ ही समकालीन वास्तवाशी नातं सांगणारी सुज्ञ आणि संयत अशी स्त्रीवादी जाणीव आहे. तसा हा आपल्या अस्तित्वाशी रुजेल इतक्या खोलवर साधलेला संवादच आहे. या कवितेचं दुखणं पृष्ठभागावर रेंगाळणारं नाही. परंपरेच्या घट्ट विणीतून आजवर थोडे थोडे सैल करून घेत पुरुषार्थाच्या संकल्पनेला आपल्या असतेपणाचा तो दुजोरा आहे. आपल्या अस्तित्वभानासाठी विचारव्यूहातून लढणारी (कधीही न कुढणारी, रडणारी) अशी या कवितेची प्रकृती आहे. त्यामुळेच तथाकथित स्त्रीवादी आक्रोश आणि अभिनिवेशापासून ती दूर आहे. तिचं सांगणं सर्वसमावेशक अशा स्त्री-जाणिवेचं स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये सबंध स्त्री-जाणिवेच्या अस्तित्वाचे संदर्भ दडलेले आहेत. म्हणूनच तिला आज क्लास, जेंडर आणि सेक्सची स्पर्धा संपवून पुरुषी मानसिकतेच्या, दास्याच्या शृंखला तोडायच्या आहेत. याचं समग्र भान या कवितेतून प्रकट होतं. ती आपल्यातून समष्टीकडे थेट निर्देश करते. तिचा अवकाशही व्यापक होतो..

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?

‘माझ्या अस्तित्वाचे संदर्भ तपासून पाहताना

सापडतात सिमोन द बोव्हुआला त्रासणारे  वाग्बाण

अन् समोर येतो व्हर्जिनिया वुल्फ

आणि एलेन शोवाल्टरचा

स्वत:च्या अवकाशासाठीचा अथक लढा..’

या वैश्विक संदर्भातून सर्वसमावेशक ग्लोबल स्त्रीवादी जाणिवा प्रगट करीत कवयित्री आपली अस्वस्थता अंतर्मुखपणे कवितेतून मांडत जाते. कोणत्याही अभिनिवेशाला ती बळी पडत नाही.

‘इच्छांची मोहक फुलं’ फक्त कवितेतूनच फुलवता येतात. जाणीव-नेणिवेच्या तळाशी दडून असलेली एक सकारात्मक ऊर्जा अवगत असलेल्या शब्दांतून अलगद टिपता येते. कोणतीही थोपवणारी लक्ष्मणरेषा त्याआड येत नाही. कविताच या अव्यक्ताला सांधणारा दुवा म्हणून पुढे येते. ज्या कवितांच्या माध्यमातून ही सगळी अव्यक्ततेच्या स्तरावरील तगमग मांडता येते, त्या कवितेच्या सन्मानासाठी स्वतंत्रपणे सजग असणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.

‘वर्किंग वुमन’ म्हणून घर, परिसर, नातीगोती आणि सभोवतीच्या समाजवास्तवाला सामोरे जाताना भिन्न पातळ्यांवर होणारी स्त्रीची कसरत डोंबाऱ्याच्या खेळापेक्षा तसूभरही कमी नाही. एक स्त्री म्हणून घरादाराला ओलांडतानाचं तिचं बर्हिगत वास्तव दिसतं म्हणून ते समजून तरी घेता येते; परंतु तिच्या नेणिवेत परंपरेतून पेरलेला काळोख शरीर आणि मनाच्या दोन्ही पातळ्यांवर तिला जेरबंद करतो. खऱ्या अर्थाने तिची मुक्ततेची वाट भावनिक गुंतवळ्यात विरून जाते. तिला तिच्या स्वतंत्र सगराने मार्गक्रमण करणं कठीण जातं. मुक्ततेचा श्वास आणि सुरक्षेचं कवच शोधण्याचे कष्ट स्वस्थपणे, स्वतंत्रपणे विचार करू देत नाहीत. शेवटी केवळ कविताच या वास्तवाचा आधार बनत तिच्या ठायी वास्तव्याला येते. आणि मग तिच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ मानवी प्रवृत्तीच्या नव्या आविष्काराला, स्वीकार-नकाराच्या भाषेला जन्म देतात..

‘कविता ओलावत जाते आयुष्य

भयाण सत्याच्या उजाड माळरानावर

काहीच उगवायची शक्यता नसते

तेथेही रुजवत जाते संवेदनांचे बीज

वास्तवाच्या वणव्यात होरपळूनही

अबाधित राहिलेले

दु:खाच्या ओसाड, खडकाळ जमिनीत

उतरत जाते खोलवर भावनांच्या मुळातून

शोधत चिरंतन मानवी सत्य..’

ही कविता स्त्री-जाणिवेचा एक अखंड शोध आहे. प्रत्येक घटितामधील सौख्य, औत्सुक्याला देत-घेत ती पुढे जाताना दिसते. अभावातील दु:खद जाणिवांचा सल आज सुखद क्षण म्हणून मोहरून येतो. त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी ती उत्सुक असते. परंतु आज सगळं आलबेल असतानाही कोणत्या सुखासाठी आपण तिष्ठत आहोत, या संभ्रमाची उकल ही कविता करीत बसते. आणि गतकालीन स्मृती अनुमानातून जगण्याचं साधं सूत्र शोधून काढते. ही कविता सतत स्वत:शी, आपल्या मनाशी संवादत असते. मग सगळं यथास्थित असताना कोणत्या दु:खाविषयी ती सतत बोलत असते? यात संवादशीलतेचा निकोपपणा नाही असंच म्हणावं लागतं. या गोष्टींना कारणीभूत असलेलं समाजमनाचं अनेक पातळ्यांवर झालेलं विघटन ही महत्त्वपूर्ण घटना आहे. हा एकपदरी आयुष्यातील जन्माला आलेला मूल्यभाव नाही. विखंडित असं वास्तव समोर असताना सुख आणि दु:खद अशा क्षणांना आपण पारखे झालेलो आहोत, हा जागतिकीकरणोत्तर काळ सुख आणि दु:खाची धड चिकित्साही करू देत नाही- हा सर्वात अहम असा तिच्यासमोरचा पेच आहे.

समाजमनापलीकडे तिच्या अत्यंत निकटचं ‘मी-तू’चं अस्तित्व, जवळच्या प्रिय नातेसंबंधांतील गुंतणूक, ताणतणावापलीकडील चांगले-वाईट क्षण या कवितेतून येत राहतात. तिच्या जगण्याच्या सगळ्या अवस्थांचा सूक्ष्म विचार ही कविता करीत राहते. तिच्या आयुष्यातील साध्या प्रसंगांनाही कवितेचा स्पर्श होत असतो. या कवितेतून आलेली साधी-सरळ शब्दकळा मनाची सततची भावावस्था टिकवून कवितेचं रूप देत असते. अनुभवाला सहजपणाने भिडण्याची किमया, प्रतिमांचा सोस या कवितेतून प्रत्ययाला येतो. म्हणूनच ती आपल्या अनुभवांना सोबत घेऊन जाणारी सहप्रवासी वाटते. स्त्रीमनाचा अनुबंध सहजपणे समकालीन वास्तवाशी ती जोडत जाते. ‘नसते माझे काही काही’ या अवस्थेतून ती संवादत राहते. ही सहवेदना वाटणे, ती शेअर करणे ही तिच्या व्यक्तपणाची एक बाजू झाली. तिच्या म्हणून वेगळ्या अस्तित्वाला स्वत:ची अशी अव्यक्त बाजूही आहेच. ती व्यक्त करण्याच्या पलीकडची घुसमट आहे. तिच्या कवितेमधील हा स्थायीभाव आहे. या कवितेतील कवयित्रीची ही अवस्था आहे..

‘नि:शब्द अव्यक्त एकाकी

डोळ्यांत दाटते पाणी

हृदयाचे काजळडोहात

सलत्या दु:खाची गाणी..’

एकविसाव्या शतकात ग्लोबल जाणिवेत, स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या या युगात आपलं जगणं अधिक बाजारोत्सुक व्हायला पाहिजे. परंपरांच्या पसाऱ्यात न अडकता पुढच्या नव्या जगाच्या स्वागतासाठी सदैव तत्पर असलं पाहिजे. मात्र, या कवितागत स्त्रीचं विश्व वेगळं आहे. या सगळ्या उपलब्धतेत, वस्तूंच्या संग्रहामध्ये तिचं परंपरागत गतकातर भान रमत नाही. तिला नातीगोती, परिसर, खेळ, बालपण, सुख आणि दु:खाचे आठवरंग वेळोवेळी एका विश्वात नेऊन सोडतात. बालपणीच्या निसर्गप्रेरणा, त्यातील कुतूहल तिला खुणावत असतं. पशु-पक्ष्यांसारखं, झाडावेलींसारखं स्वच्छंदी मन तिला हवं असतं. निसर्गाच्या चराचराशी आपलं साधम्र्य असावं असा मुक्तपणा तिला हवासा वाटतो. हा सगळा अट्टहास माणसांपासून सुटण्यासाठी आहे. तिला कोणत्याही प्रकारे ‘रूपांतरण’ हवं आहे. गतरम्यतेतील सुखामध्ये विलीन होण्याची ही स्वप्नवत, नेणिवेत दडलेली आकांक्षा आहे. या जगण्यापासूनच्या सुटकेसाठी आठवणींच्या हिंदोळ्यावर विसावणं आहे. या बदललेल्या जाणिवेत स्वत:साठी नसलेला अवकाश तिला अस्तित्वहीन वाटतो. नव्या प्रश्नांसाठी तयार होणं धाडसाचं वाटतं. खरं तर हे माणसांपासूनचं पलायन नाही. सुटका नाही. कारण या कवितेतला आशावाद तिला ठायी ठायी जिवंत करत जातो, प्रेरणा देत असतो..

‘मला जगायचंय एक पान होऊन

फुलायचंय बेभान वसंताबरोबर

आणि गळायचंय अलगद पानगळीत

भूत-वर्तमान-भविष्य यांच्या

कोणत्याही जाणिवेशिवाय

म्हणजे पडणार नाहीत जगण्यासाठीचे

अंत:स्थ उदासीन प्रश्न

निर्माण होणार नाही कोणताच ट्राउमा!’

या संग्रहातील बरीचशी कविता नॉस्टॅल्जिक असली तरी तिला पूर्णत: वर्तमानाचंही भान आहेच. गतस्मृतीला तोलत, पेलत, आजचा मार्ग सुकर करीत ती पुढे जात राहते. आजच्या या ग्लोबल युगात कुटुंबसंस्था, विवाहसंस्था हळूहळू नष्ट होत असताना तिला ‘स्त्री’पणाच्या अस्मितेची, अस्तित्वाची ओढ कायम लागलेली आहे. त्यामुळे ती पूर्णपणे बंडखोरही होऊ शकत नाही. या सगळ्या कवितांचा प्रवास कणखर अशा स्त्रीवादी भूमिकेतील जडपणा स्वीकारणारा नाही. तो हरत, जिंकत, परिस्थितीशी साधम्र्य साधत, उंच-सखलपणे प्रदेश न्याहाळत, सुखकर होण्याच्या धडपडीत सामंजस्य  साधणारा, सकारात्मक जाणिवेचा आहे.  या कवितेला स्त्रीजाणिवेतल्या आपल्या संस्कृतीचा भक्कम असा आधार लाभला आहे. हे सगळं स्वीकारताना होणारा जाच सकारात्मकतेत बदलविण्याची ताकद कविमनात अजूनही आहे. या सगळ्या घटिताचं सुंदर असं उदाहरण ‘एवढं तरी करूच शकतो आपण’ या कवितेत आहे. जन्म-मृत्यूच्या सृजनशील अशा जाणिवेची संकल्पना वटवृक्षांच्या मंडल-प्रतिमेतून त्यांनी मांडली आहे. या निर्मिती, प्रतिनिर्मितीतून मातृत्वाचा एक आदिबंध त्यांनी समोर ठेवला आहे. ही जगण्यातील जिवंतपणाची अपरिमितता आहे. आपलं अस्तित्व पिढय़ान् पिढय़ा संपत नाही. आपलं असतेपण अंशाअंशाने पुढे चालत असतं. स्त्री आणि धरित्रीचा आदिबंध वडाच्या माध्यमातून या जगाशी, चराचराशी जोडण्याचा हा एक सुंदरसा प्रयत्न आहे..

‘एवढं तरी करूच शकतो ना आपण

वडाच्या पारंब्यांतून पुन्हा झाड जन्मावं तसं

आपल्यास सामावून एकरूप होईपर्यंत

एवढं तरी करूच शकतो आपण..’

ही कविता म्हणजे एक संज्ञाप्रवाह आहे. त्यातून आपलं भावविश्व या कवयित्रीने उलगडलं आहे. या कवितेला निश्चित अशी भूमिका नसली तरी विचारांची स्वत:ची सुसूत्र अशी समज नक्कीच आहे.

‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ – योगिनी सातारकर-पांडे,  कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.

पृष्ठे- १०४ , मूल्य- १२० रुपये

दा. गो. काळे