आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात. प्रत्येकात सांगण्यासारखा, लक्षात राहणारा एखादा तरी गुण असतो. कुणाचा परोपकारी स्वभाव, कुणाची अविरत धडपड, कुणाचं निखळ माणूसपण. रमेश उदारे हे गृहस्थ साहित्यिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात अखंड भ्रमंती करणारे. मुळात माणसांची प्रचंड आवड असलेले. त्यामुळे हिंदी चित्रपटांतील देव आनंद असो की मराठी साहित्यिक-कवी असो; त्याला जाऊन थेट भिडण्याची त्यांची हौस दांडगी. त्यातून झालेल्या तात्कालिक ओळखीतून हा माणूस त्यांच्याशी जानपहचान वाढवण्यात वाकबगार. यात त्यांचा हेतू काही स्वार्थ साधण्याचा असतो असंही नाही. त्यांना माणसांचा शौक आहे. सतत माणसांत वावरण्याच्या त्यांच्या या सोसातून असंख्य माणसं त्यांच्या गोतावळ्यात सामील झाली आहेत. त्यांच्यावर प्रसंगपरत्वे लिहिण्यात उदारेंना आनंद मिळतो. माणसांच्या या ध्यासातूनच त्यांचं नवं पुस्तक ‘ऋणानुबंध’ जन्माला आलं आहे. आपल्याला वेगवेगळ्या वाटांवर भेटलेल्या स्त्रियांसंबंधी त्यांनी यात लिहिले आहे. या स्त्रिया साध्या-सरळ आयुष्य जगणाऱ्या सामान्य स्त्रिया आहेत. काही अपवादात्मक नाववाल्याही आहेत. पण त्या अपवाद म्हणूनच. आपल्या आईपासून सुरुवात करून वेगवेगळ्या कारणपरत्वे भेटलेल्या स्त्रियांची शब्दचित्रं उदारे यांनी यात रेखाटली आहेत. कुणी खानदेशातली, कुणी लेखक कुठल्याशा कामानिमित्त एखाद्या गावी गेले असताना अचानक ओळख झालेली. बहुविकलांग प्रसाद घाडीची आई शरयू घाडी वा चित्रकार ज्योत्स्ना कदम यांच्यासारख्या परिचित असलेल्या स्त्रियांवरही त्यांनी यात लिहिले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावलेले पैलू ते या पुस्तकात चितारतात. पुस्तक तसं छोटंसंच आहे, परंतु त्याचं संपादन नीट होणं गरजेचं होतं. ही त्रुटी चांगलीच खटकते.

‘ऋणानुबंध’- रमेश उदारे, अनघा प्रकाशन, पृष्ठे- १२८,

मूल्य- १४० रुपये.