सतत मिनिटा-मिनिटाला त्याचे किंवा तिचे येणारे फेसबुक नाही तर व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट्स तपासता-तपासता आपल्या मित्रमैत्रिणींचं, जिवलगांचं काही बिनसलं नाहीये ना.. याची काळजी घ्यायची जणू सगळ्यांना सवयच लागली आहे. काल रात्रीचं त्याचं व्हॉट्सअ‍ॅपवरचं स्टेट्स असंच अस्वस्थ करणारं होतं खरं.. वेळीच विचारलं असतं तर.. पण तो इतकं टोकाचं पाऊल उचलेल याची कल्पना नव्हती, असे संवाद अनेक ग्रुप्समध्ये आत्तापर्यंत घडून गेलेत. त्यामुळेच की काय आपल्याच मित्रमैत्रिणींच्या छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून घडलेल्या आत्महत्येच्या घटनांनी सावध झालेल्या तरुणाईने या सोशल मीडियाच्या ‘खिडकी’तूनच त्यांच्या मनात डोकावण्याचा मार्ग तयार केला आहे.

फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम यांसारख्या मीडियावर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाचे ‘अपडेट्स’ आपण देत असतो. अशाच एखाद्या मीडियावर आपण कोणती दु:खी पोस्ट सहज शेअर केली तरी ‘काय झालं’, ‘बरा आहेस ना’ ते ‘चल भेटूया’ अशा पोस्ट धडाधड पडायला सुरुवात होते. अलीकडेच आत्महत्या केलेल्या अनेक तरुणांनी प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी फेसबुकवर दु:खी असल्याची, जगाचा निरोप घेत असल्याची किंवा सगळ्यांना बाय करत शेवट करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्या पोस्टमागची भावना लक्षात घेऊन त्यावर मित्रमैत्रिणींनी काही प्रतिक्रिया देण्याआधीच या घटना घडून गेल्या होत्या. सुरुवातीला अशा पोस्ट्सना अनेक ग्रुप्समधून गांभीर्याने घेतलं जात नव्हतं. मात्र गेल्या एक-दोन वर्षांमध्ये सातत्याने अशा घटनांमध्ये वाढ झालेली असल्याने नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा सोशल मीडियावरून का होईना प्रत्येक जण आपल्या मित्रमैत्रिणींच्या ‘अपडेट्स’वर जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला लागला आहे. आपल्या ओळखीच्या माणासाने नेहमीपेक्षा जरा कुठे वेगळी कमेंट किंवा पोस्ट टाकलेली दिसली की लगेचच त्याला तिथल्या-तिथे विचारणा केली जाते. ज्यांना सगळ्यांसमोर विचारणं आवडत नाही ते स्वतंत्रपणे मेसेज करतात. तर काही सरळ फोन करून किंवा घरी जाऊन खातरजमा करायलाही कमी करत नाहीत.

अलीकडेच एका अभिनेत्रीने तिच्या गूढ मालिकेच्या प्रसिद्धीसाठी एक व्हिडीओ चित्रित केला. आणि तो व्हिडीओ सोशल मीडियांतून ‘व्हायरल’ करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तिच्या जिवाला असणाऱ्या धोक्याबद्दल काही गूढ संवाद चित्रित करण्यात आले होते. अत्यंत गुणी, सुजाण, विचारी आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असल्याने तिचा असा व्हिडीओ पाहणं प्रेक्षकांना फारसं रुचलं नाही. अनेकांनी स्वाभाविकपणे तिच्या काळजीपोटी तिच्या फेसबुक अकाऊंटवर प्रश्नांचा भडिमार केला. इतकंच नाही हा जाहिरातीसाठीचा व्हिडीओ असेल हे लक्षात येऊनही अनेकांनी ‘काय गरज होती?, याशिवाय दुसऱ्या कोणत्या पद्धतीने जाहिरात करता आली नसती का?’, अशा भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.  या सगळ्यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की सोशल मीडियावरचं अकोऊंट हे त्या त्या व्यक्तीचा आरसा असल्यासारखंच मानलं जातं. त्यामुळे या आरशात त्याच्या मनातील कुठलाही वावगा विचार डोकावला की त्याच्या जवळच्या माणसांच्या मनात त्याचा चरा उमटतो. त्यामुळे कोणत्याही सुज्ञ माणसाने थट्टा म्हणून, सहज म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणाने अशा प्रकारच्या पोस्ट करणं लोकांना सहन होत नाही. हे केवळ सेलेब्रिटींपुरते मर्यादित राहिलेले नाही तर आपल्या ‘फ्रेंडलिस्ट’मध्ये कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची काही पोस्ट करताना दिसली तर लगेच सगळे मित्र सावध होतात आणि पुढच्या अपडेट्सवर, हालचालींवर बारीक लक्ष ठेवतात.

तरुण वयात घरचे, नातेवाईक, आई-बाबा यांच्यापेक्षाही मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटत असतात. रोज भेटणारे, बाजूला राहणारे, कॉलेज-क्लासचा ग्रुप, शाळेपासूनचे मित्रमैत्रिणी अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाई आपलं मन मोकळं करत असते. अनेकदा आई-बाबांनाही माहीत नसलेल्या गोष्टी मित्रमंडळींना मात्र इत्थंभूत ठाऊक असतात. प्रत्यक्ष न भेटताही अनेक माध्यमांतून अनेक गोष्टी मित्रांशी बोलल्या जातात. संवादाची अनेक माध्यमं आणि सोशल मीडिया या सगळ्यांतून प्रत्येकाचं मित्रमंडळ विस्तारलं असून प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा सतत ऑनलाइन असल्याने जिथल्या तिथे मन मोकळं करणं अनेकांच्या अंगवळणी पडलं आहे. सहजपणे मनाच्या तारा जुळलेल्या अशा माणसांची मैत्री भेटून होणाऱ्या मैत्रीपेक्षाही दृढ असते. आणि म्हणूनच ऑनलाइन पडणाऱ्या प्रत्येक अपडेट्सचा गांभीर्याने विचार केला जातो.

ताणतणाव, मानसिक छळ, मानसिक असंतुलन अशा पायऱ्या पार करत माणूस अखेरीस निराश होऊन आत्महत्येसारखा भयानक पर्याय निवडतो. मात्र इतक्या पराकोटीच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच जर मित्रमंडळी त्या व्यक्तीला मदत करू शकले तर अशा अनेक आत्महत्या वेळीच रोखता येतील. आपल्या माणसांची काळजी घेताना आजकाल त्यांच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवणं हे फार गरजेचं आणि एका अर्थाने सोयीचंही झालेलं आहे. काही वेळा माणूस सोशल मीडियावर वेगळा आणि प्रत्यक्षात वेगळा वागत असला तरीही त्याच्या मन:स्थितीचे पडसाद त्याच्यावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे अशा पोस्ट्सवर आपलं बारकाईने लक्ष असलं तर एखाद्याला अशा टोकाच्या निर्णयापासून नक्कीच परावृत्त करता येईल, या जाणिवेने ‘अपडेट्स’वर लक्ष ठेवणाऱ्या संवेदनशील तरुणाईचं प्रमाण वाढतं आहे.

viva@expressindia.com