दुग्धजन्य पदार्थातील चीजचे सेवन हे शरीराची जाडी वाढवत नाही व त्यामुळे एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटिन) वाढत नाही, असा निष्कर्ष संशोधनात काढण्यात आला आहे. नेहमीच्या समजापेक्षा लोण्याचा परिणाम बॉडी मास इंडेक्स कमी करण्यात होत असावा, असाही आयरिश संशोधनातील दावा आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनच्या संशोधकांनी दूध, चीज, दही, क्रीम (मलई), लोणी यांचा शरीराच्या जाडीशी संबंधित मार्करवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. त्यात १९ ते ९० वयोगटांतील १५०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. चीज सेवन केल्याने मेद वाढत नाही. तसेच एलडीएल कोलेस्टेरॉल वाढत नाही.  दुग्धजन्य पदार्थामुळे मेद, रक्तदाब, कमरेचा घेर, बॉडी मास इंडेक्स वाढत नाही. असा त्यांचा दावा आहे.

जे लोक कमी मेदाचे दूध, दही खातात ते जास्त कबरेदके घेत असतात. त्यामुळे त्यांच्यात उलट एलडीएलचे प्रमाण वाढत असते. चीजचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास संपृक्त मेदाम्ले जास्त घेतली जाऊन एलडीएल कमी होते, असा दावा युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनच्या डॉ. एम्मा फिनी यांनी केला आहे. यात अन्नसेवनाच्या सवयी, पोषके यांचा विचार करण्यात आला आहे. ‘जर्नल न्यूट्रिशन अ‍ॅण्ड डायबेटिस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.