सीएसआयआरकडून व्यावसायिक उत्पादन

मधुमेहावर वैज्ञानिक माहितीच्या आधारे सिद्ध करण्यात आलेले ‘बीजीआर ३४’ हे औषध वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) जारी केले आहे. त्यात काही वनस्पतींचा अर्क वापरलेला आहे. लखनौ येथील प्रयोगशाळेत ते तयार केले आहे.
नॅशनल बोटॅनिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिनल अ‍ॅण्ड अरोमॅटिक प्लॅण्ट्स या प्रयोगशाळांनी संयुक्तपणे काम केले असून एनबीआरआयच्या ६२ व्या वर्षपूर्तीनिमित्त मे. एमिल फार्मास्युटिकल्स या नवी दिल्लीच्या संस्थेने ते बाजारात आणले. त्यात आयुर्वेदात उल्लेख असलेल्या चार वनस्पतींचा अर्क असून ते सुरक्षित आहे. त्याचे अ‍ॅलोपथीप्रमाणे इतर वाईट परिणाम होत नाहीत, असे वरिष्ठ वैज्ञानिक एकेएस रावत यांनी सांगितले. हे औषध प्राण्यावर वापरून संशोधन केले असता ते सुरक्षित व ६७ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. या औषधामुळे प्रतिकारशक्ती वाढते ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. सध्या मधुमेहावर अनेक वनौषधीजन्य औषधे बाजारात असली तरी बीजीआर ३४ हे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झालेले औषध आहे. रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम त्यातून केले जाते. शिवाय ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही व रुग्णांना चांगले आयुष्य जगता येते. या औषधाचा व्यावसायिक वापर कालपासून सुरू करण्यात आला आहे. एमिल फार्मास्युटिकल्स ही उत्तर प्रदेशातील कंपनी या औषधाचे उत्पादन करीत असून पुढील पंधरा दिवसांत ते बाजारात येईल, असे कंपनीचे विपणन संचालक व्ही. एस. कपूर यांनी सांगितले. त्याच्या शंभर गोळ्या पाचशे रुपयांना मिळणार आहेत म्हणजे एक गोळी पाच रुपयांना आहे. गेल्या वर्षी विज्ञान भवनात हे औषध तयार केल्याची घोषणा विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात नवी दिल्ली येथे करण्यात आली होती, पण आता ते प्रत्यक्ष उपलब्ध होत आहे.

सीएसआयआरचे प्रशंसनीय संशोधन
बीजीआर ३४
उत्पादक- मे. एमिल फार्मास्युटिकल्स
प्रत्यक्ष संशोधन सीएसआयआरच्या तीन संस्था
चार आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क वापरला
रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवणार
किंमत – ५ रुपयांना एक गोळी