पुदिन्याची पाने अन्नपचन, मुख आरोग्य, सर्दी यावर गुणकारी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. डाबर रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रमुख जेएलएन शास्त्री व सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ आयुर्वेद सल्लागार परमेश्वर अरोरा यांनी संशोधनाअंती पुदिन्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. त्यानुसार पुदिन्यात अँटीऑक्सिडंट व फायटोन्यूट्रिअंट असतात त्यातून पोटातील स्नायूंना आराम मिळतो. पुदिन्याच्या पानांमुळे अनेक रोग दूर होतात. पुदिना चटणी जर समोशाबरोबर सेवन केली तर त्यामुळे चवच वाढते असे नव्हे तर पचनही चांगले होते. पुदिना वनस्पतीमुळे पोटात शांत वाटते व आग होत नाही. शरीराचे तापमान वाढत नाही. या सगळ्याचा संबंध डोकेदुखी व अर्धशिशी यांच्याशी असतो. मुख आरोग्यात पुदिना गुणकारी असून त्यात जंतुनाशक गुण असतात, परिणामी तोंडातील घातक जिवाणू मारले जातात व जीभ, दात स्वच्छ राहतात. पुदिना कफ व सर्दीवर उपयुक्त आहे. त्वचारोगांवरही पुदिना उपयोगी असून त्यामुळे त्वचेची आग कमी होते व कीटकदंश, इतर अ‍ॅलर्जीने होणारे दुष्परिणाम टळतात. पुदिना ही पचनासाठी उपयुक्त वनस्पती असून त्यामुळे गॅस होणे टळते, अपचन, उलटय़ा व अतिसारापासून संरक्षण मिळते. पुदिन्याची पाने पाण्यात काही तास भिजवून नंतर खावीत व त्याचा अर्क जास्त उपयुक्त असतो.