भारतात सुमारे १० कोटी जनता मधुमेहाच्या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे आरोग्य विमा काढणाऱ्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मधुमेहग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, नवी दिल्ली या महानगरांमध्ये मधुमेहाचा विकार जडलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून या शहरांमध्ये आरोग्य विमा काढणाऱ्या मधुमेहग्रस्तांची संख्याही अधिक आहे.

जागतिक आरोग्य संस्थेकडून (डब्ल्यूएचओ) यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेह या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात येत आहे. भारतात १३१ कोटी लोकसंख्येपैकी ७.८ टक्के लोक मधुमेहग्रस्त असल्याने डब्ल्यूएचओने भारताकडे आपले लक्ष वळविले आहे. भारतात मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यांचा आरोग्य विमा काढण्याकडेही कल असल्याचे लक्षात आले आहे. भारतातील तब्बल दोन लाख मधुमेहग्रस्तींनी आरोग्य विम्यासाठी दावा केला असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

मधुमेह या आजाराकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र २०३० पर्यंत सर्वात जास्त मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या जगातील सातव्या स्थानावरील या आजाराकडे आता सरकार, समूह आणि वैयक्तिक स्तरावर पण गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे आग्नेय आशियाई देशांमधील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक पूनम सिंग यांनी सांगितले.

हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित आजार, मधुमेह हा स्वादुपिंडातून इन्सुलीनची निर्मिती किंवा शहरांच्या विस्कळीत जीवनशैलीमुळे शरीराकडून त्याचा योग्य प्रकारे केला जात नसल्याचे समोर आले आहे. आयसीआयसीआय लोमबार्ड यांनी दिलेल्या एका अहवालानुसार, मधुमेहाशी निगडित आरोग्यविषयक दावा करणाऱ्यांमध्ये सर्वसाधारणपणे ६० वर्ष वयोगटातील लोकांचा समावेश हा अधिक असतो, पण २०११-२०१५च्या आकडेवारीनुसार सद्य:परिस्थितीत वेगवेगळ्या वयोगटातील ७ हजार ९१५ लोकांनी देखील विम्याविषयक दावे केले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून विम्याविषयक दावे हाताळणाऱ्या विमा कंपनीनुसार, २०११ साली विम्या अंतर्गत मिळणाऱ्या संरक्षणाअंतर्गत मधुमेहग्रस्त असलेल्यांपैकी विम्यासाठी दावा करणाऱ्या ४ हजार १४० ज्येष्ठांसोबतच २५ वयोगटातील २३५ जणांनी, तर २६ ते ४५ वयोगटातील आणि ४६ ते ६० वयोगटातील अनुक्रमे १ हजार ५६४ आणि ३ हजार ४३३ लोकांचा समावेश आहे.