आग्नेय आशियामध्ये अतिजलद गतीने पसरणाऱ्या ‘सुपर मलेरिया’ने जागतिक धोका निर्माण केला असून, या मलेरियाने औषध प्रतिरोधक होण्यापूर्वीच त्याला नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

कम्बोडियामध्ये उदयास आलेला मलेरियाचा हा धोकादायक परजीवी मुख्य मलेरियाविरोधी औषधांनी नष्ट होत नाही. मात्र आतापर्यंत तो थायलंड, लाओस आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये वेगाने पसरला आहे.

बँकॉकमधील ऑक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसिन रिसर्च युनिटच्या संशोधकांनी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध केलेल्या या संशोधनामध्ये ‘सुपर मलेरिया’बाबत माहिती देण्यात आली आहे. या सुपर मलेरियामध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या मलेरियाच्या औषधाला प्रतिरोध करण्याची क्षमता असल्याने त्याचा प्रसार जगभर वेगाने होऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

आम्हाला वाटते हा एक गंभीर धोका आहे. हा मलेरिया संपूर्ण प्रदेशामध्ये अतिशय वेगाने पसरत असून, अफ्रिकेमध्ये तो मोठय़ा प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे, असे ऑक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसिन रिसर्च युनिटचे प्राध्यापक अर्जेन डॉनड्रॉप यांनी म्हटले आहे.

या सुपर मलेरियाला रोखण्यासाठी सामान्य मलेरियाची औषधे देण्यात आली, मात्र त्याला रोखण्यात अपयश आले.

क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरियाविरोधी औषधे वापरली जातात. मात्र या औषधांना या सुपर मलेरियाने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. उपचारामध्ये अपयश येण्याचे प्रमाण कम्बोडियामध्ये सुमारे ६० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे या सुपर मलेरियाला तात्काळ रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक वर्षी २१२ दशलक्ष लोकांना मलेरियाची लागण होते. अ‍ॅनॉफिलस जातीचे डास चावल्यामुळे मलेरियाची लागण मोठय़ा प्रमाणात होते. मलेरियामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो.