स्मार्टफोन आता दैनंदिन गरजेची गोष्ट झाला आहे. फोटो काढण्यापासून ते गेम्स खेळण्यापर्यंत. मेसेज पाठवण्यापासून ते बातम्या वाचेपर्यंत सगळ्याच कामांसाठी आता स्मार्टफोन गरजेचा झाला आहे. पण नक्की कुठला स्मार्टफोन घ्यायचा हा आपल्यापुढचा मोठा प्रश्न असतो. जाहिराती तर बऱ्याच दिसतात पण त्यातला कुठला स्मार्टफोन आपल्याला उपयोगी पडेल याचे आडाखे बांधणं कठीण असतं. तेव्हा वाचा स्मार्टफोन खरेदी करताना खाली दिलेले मुद्दे लक्षात ठेवून हँडसेटची निवड करा.

स्क्रीन साईझ
आपल्याकडे स्क्रीन साईझची क्रेझ मोठी आहे. जेवढी मोठी स्क्रीन तेवढा फोन चांगला असंच सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही कुठल्या कारणासाठी स्मार्टफोन घेत आहात यावरून तुमची स्क्रीन ठरते. तुम्ही सिनेमा पाहायला किंवा गेम्स खेळण्याच्या दृष्टीने स्मार्टफोन घेणार असाल तर ५.५ इंच ते ६ इंची स्क्रीन असणारे फोन्स तुम्ही घेऊ शकता. तु्म्ही ऑफिसच्या कामासाठी किंवा फक्त ई मेल्स पाहण्यासाठी तुमच्या फोनचा वापर करणार असाल तर ५ ते ५.५ इंचाची स्क्रीन पुरेशी ठरू शकते. ६ इंचापेक्षा जास्त स्क्रीनसाईझचे फोन्स हातात धरायला फारच गैरसोयीचे ठरू शकतात.

कॅमेरा
फक्त जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा म्हणजे चांगला कॅमरा असं असतंच असं त्याचा अॅपर्चर स्पीडही पाहावा लागतो. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर तुम्ही १६ मेगापिक्सेलचा आणि f/2.0 अॅपर्चर असलेला कॅमेराफोन घेऊ शकता. जर तुम्ही जास्त फोटो काढत नसाल तर ८ ते १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरेसा ठरू शकतो.

बॅटरी
बॅटरीची निवड तुमच्या वापराप्रमाणे करावी. जर तुमच्या स्मार्टफोनचा वापर हेवी असेल म्हणजेच तुम्ही खूप अॅप्स आणि गेम्स खेळत असाल तर ३५०० mAh बॅटरी असलेला फोन तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. जर तुमचा सेलफोन वापर मर्यादित असेल तर मात्र ३००० mAH कपॅसिटी असलेला फोन तुम्ही वापरू शकता.

ऑपरेटिंग सिस्टिम व्हर्जन
तुम्ही जर अँड्रॉईड फोन घेणार असाल तर अँड्रॉईड ६.० किंवा त्याच्या थोड्याच आधीची ऑपरेटिंग सिस्टिम असलेला फोन सिलेक्ट करा. अँड्रॉईड ७ चा फोन घेणं शक्य असेल तरच तो नक्कीच घ्यावा.

स्पीकर्स
जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फिल्म्स आणि व्हिडिओज् बघणार असाल तर हँडसेटच्या पुढच्या भागात स्पीकर्स असावे. यामुळे तुम्ही लँडस्केप मोडमध्येही व्हिडिओ चांगल्याप्रकारे पाहू शकता.

प्रोसेसर
जर तुम्ही अनेक गेम्स खेळणार असाल तसंच मोठ्या कपॅसिटीचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणार असाल तर स्नॅपड्रॅगन ६५२ किंवा ८२०/८२१ चा प्रोसेसर असणारा फोन विकत घ्या.

सध्याचा काळ फक्त जाहिरातींना भुलून स्मार्टफोन घ्यायचा नाही. तुमच्या गरजेनुसार अनेक स्मार्टफोन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या स्पेसिफिकेशन्सचा अभ्यास करून जर मोबाईल निवडला तरच तो तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो.