साडी म्हणजे तमाम स्त्री वर्गाचा विक पॉईंटच. अगदी बाळ असल्यापासून आईच्या पदराशी असलेलं मुलींचं नातं ती मोठी होत जाते तसं ‘माझी साडी’ यामध्ये बहरत जातं. मग कळत्या वयात शाळेची टीचर होताना ओढणीची केलेली साडी ते अगदी कपाट वाहेपर्यंत जमवलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या आणि प्रकारांच्या साड्या म्हणजे महिलांचं खास कलेक्शनच. यामध्ये अगदी रोजच्या वापरायच्या साड्यांपासून ते पारंपरिक, पार्टीवेअर, एखाद्या सेमिनारला जायचं असेल तर कॉटन किंवा खादीच्या साड्या असे अनेक प्रकार येतात. मात्र श्रावण आला की पारंपरिक साड्यांनाच सर्वाधिक पसंती असते. अगदी तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांच्याच अगदी जवळच्या असणाऱ्या या जरी-काठाच्या साड्या नेमक्या आल्या कुठून? त्यांची नावे कशी पडली? त्यांची वैशिष्ट्ये यांबाबत सांगण्याचा प्रयत्न…

नारायणपेट साडी

तेलंगाणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यात वसलेलं नारायणपेट हे गाव रेशीम उत्पादनासाठी व हातमागावर विणलेल्या साड्यांसाठी प्रसिध्द आहे. या गावाच्या नावावरून ओळखली जाणारी साडी म्हणजे नारायणपेट साडी. सुती किंवा रेशमाने विणलेली ही साडी विरोधी रंगाच्या काठा-पदरामुळे अधिकच उठून दिसते. साडी विणण्याच्या पध्दतीत तेलंगाणा तसेच महाराष्ट्राचा प्रभाव जाणवतो. ही साडी विशेषत: देवीला नेसवण्यासाठी वापरली जात असे.

२०१२ साली नारायणपेट साडीची नोंदणी भारत सरकारद्वारे भौगोलिक निर्देशकात करण्यात आली. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही कला आणि कारागीर हे फक्त नारायणपेट मध्येच सापडतात. सुती, रेशमी किंवा सुती व रेशीम यांच्या मिश्रणापासून बनवलेल्या या साड्या साधारणतः गडद रंगांमध्ये उपलब्ध असतात. उभ्या व आडव्या रेषांना जोडून तयार केलेले डिझाइन हे या साडीचे विशेष.

काठाचे नक्षीकाम

काठापदरावर केलेली जरीची कलाकुसर ही मंदिराच्या कळसाच्या नक्षीकामाप्रमाणे प्रेरित होऊन केल्याचे दिसते. गर्द हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची साडी व लाल रंगाच्या जरीच्या पदरामुळे ही साडी इरकल साडीशी काहीशी मिळतीजुळती वाटते. साडीचे काठ व पदर पारंपरिक पध्दतीने विणलेले असतात. पदरावर लाल व पांढरा पट्ट्या तर काठ गडद लाल रंगाने विणलेले असतात. नारायणपेट साडीमधे काठाचे विविध प्रकार असतात. काही पारंपरिक काठाचे प्रकार म्हणजे गुमीकाठ, कर्वती काठ, इरकल काठ, नेपाळी काठ, पैठणी काठ, रूद्र काठ, इत्यादी.

पदरावरचे कौशल्य

नारायणपेटीमध्ये काठाप्रमाणेच पदराचेही दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे गंधेरी पदर. यामध्ये पदरावर तीन गडद रंगांच्या व दोन पांढरा रंगांच्या पट्ट्या असतात. तसेच जरीची बारीकशी पट्टी असते. दुसरा प्रकार टोकपदर हा सोलापूरमधे पहावयास मिळतो. यामध्ये पदरावर तीन लाल रंगांच्या व दोन पांढऱ्या रंगांच्या पट्ट्या असतात. पांढऱ्या रंगांच्या पट्ट्यांवर जरीकाम केलेले असते.

काळजी कशी घ्याल? 

इतर सिल्कच्या साड्यांप्रमाणेच या साड्या सुती कपडयामध्ये बांधून ठेवाव्यात. तसेच दिर्घकाळी साड्या वापरात न आल्यास त्याच्या घड्या बदलून ठेवाव्यात. इतर साड्यांपेक्षा या साडीची काळजी घेणे सोपे आहे. थंड पाण्यात हलकीशी पावडर टाकून हाताने धुवावी. उन्हाने रंग फिका पडण्याची शक्यता असल्याने ही साडी उन्हात वाळवू नये.

पूर्वी लग्नासाठी वधूला ही साडी आवर्जून घेतली जात असे. नारायणपेट साडीचा रंग व जरीकाम वर्षानुवर्षे टिकून राहते. ही साडी सणावाराला आणि लहान-मोठ्या समारंभात नेसण्यासाठी उत्तम आहे. कडक इस्त्री आणि साधेसे मोत्याचे किंवा पारंपरिक दागिने यावर खुलून येतात. या साडीची किंमत १ हजार रुपयांपासून ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत असते.

 

वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर