व्हाइट हाऊसची माहिती

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा योगा हे भारताने जगाला दिलेली देणगी आहे. दररोज योगासने केल्याने आरोग्य उत्तम राहते, हे केवळ भारतातच नव्हे, तर जगालाही कळले आहे. अमेरिकेतील लाखो नागरिक दररोज योगासने करतात. योगामुळे भारत आणि अमेरिका या देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील व्हाइट हाऊस प्रशासनाने व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर व्हाइट हाऊसने योगासनाचे महत्त्व विषद केले. अमेरिकेतील लाखो लोक नियमित योगासने करत असून त्याचा त्यांना अतिशय फायदा झालेला आहे. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्य योगामुळे सुधारत असल्याने नियमित योगासने करणाऱ्यांनी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, असे व्हाइट हाऊसचे प्रसिद्धीप्रमुख जोश अर्नेस्ट यांनी सांगितले.

योगामुळे भारत आणि अमेरिका या देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. योगामुळे भारताच्या प्राचीन संस्कृतीला समजून घेता आले, असे अर्नेस्ट यांनी सांगितले.

२१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात यावा याला अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाने मान्यता दिली आहे. डिसेंबर २०१४मध्ये अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या १७७ सदस्यांनी संमती देऊन यासंदर्भातील विधेयक संमत केले. अन्य देशांनीही हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात मान्यता दिलेली आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)