योगा आणि दीर्घ श्वास घेण्याच्या वर्गाला आठवडय़ातून दोन वेळा उपस्थिती लावल्यामुळे आणि त्याचा घरी सराव केल्यामुळे उदासीनतेची लक्षणे प्रभावीपणे कमी होत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून आले आहे.

औषधे घेऊन उपचार करण्यापेक्षा योगाधारित उपचार केल्यामुळे उदासीनपणा दूर होण्यास मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आले, असे संशोधकांनी सांगितले.

हे संशोधन उदासीनता घालवण्यासाठी जे लोक योगा आणि संबंधित उपचार घेतात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जे लोक उदासीनता घालवण्यासाठी नियमित औषधांचा डोस घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी योगा हा उत्तम उपाय ठरेल, असे अमेरिकेतील स्कूल ऑफ मेडिसीन बोस्टन विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक ख्रिस स्टीटर यांनी म्हटले आहे.

मुख्य औदासीन्य आजार (एमडीडी)हा सामान्य, वारंवार येणारा, तीव्र आणि अक्षम करणारा आहे. इतर आजारांच्या तुलनेत या आजारामुळे रुग्णांची अनेक वर्षे वाया जातात. जरी रुग्णावर ४० टक्के उपचार केले तरी त्यातून हा आजार बरा होण्यास मदत होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

उदासीनता घालवण्यासाठी ९० मिनिटांचे योगा वर्ग केल्यामुळे तसेच योगाचा घरी सराव केल्यामुळे त्यांच्यामधील उदासीनता कमी होण्यास मदत होते. तसेच योगा करण्यामुळे औषधांचे शरीरावर होणारे परिणाम दूर होण्यास मदत होत असल्याचे ख्रिस यांनी सांगिते. हे संशोधन ‘अल्टरनेटिव्ह अ‍ॅण्ड कॉम्पलेमेन्टरी मेडिसीन’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.