एखाद्याच्या ‘फेसुबक’ अकाऊंटवर फ्रेंडलिस्टमध्ये असणाऱ्यांची संख्या कितीही असली, तरी त्यापैकी जास्तीत जास्त २०० जणच खरेखुरे मित्र असू शकतात. बाकीचा नुसताच गोतावळा असतो, असे लंडनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीतून निष्पन्न झाले. मित्र म्हणून तुम्ही कितीही जणांना फेसबुकवर जोडत असला, तरी मैत्रीचे नाते निभावण्यासाठी यापैकी निवडकच पुढे येऊ शकतात, असेही या पाहणीतून दिसून आले.
ऑक्सफर्डमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रत्यक्ष जीवनात साधारणपणे कोणत्याही व्यक्तीचे २०० पेक्षा अधिक जवळचे मित्र असू शकत नाहीत. ही संकल्पना व्हर्चुअल विश्व असलेल्या फेसबुकमध्येही लागू पडते. मानवी मेंदूची रचनाच अशी असते की तो १०० ते २०० मित्रमंडळींच्या समूहापर्यंतच कार्य करू शकतो. या समूहातील मित्रमंडळींमधील आठवणी जपतानाही त्यावर वेळेचा परिणाम होतोच. मात्र, सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट, ट्विट्स, छायाचित्रे यामुळे सातत्याने मैत्रीला उजाळा मिळत असतो. त्यामुळे प्रत्यक्ष संपर्क नसला तरी या माध्यमातून आठवणींना उजाळा मिळतो. ऑक्सफर्डमधील संशोधकांनी सुमारे ३३०० विद्यार्थ्यांची पाहणी केली. इंटरनेटमुळे २०० पेक्षा अधिक जवळच्या मित्रांना लक्षात ठेवणे शक्य होते का, हे या पाहणीतून अभ्यासण्यात आले. त्यातून असे दिसले की सोशल मीडियाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्तीलाही फेसुबकवर सुमारे १५५ इतकेच जवळेच मित्र असतात आणि त्यांनाच लक्षात ठेवता येते. यामध्येही महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक मित्र-मैत्रिणी असतात, असेही आढळले. जुन्या पिढीतील युजर्सपेक्षा नव्या पिढीतील युजर्सना अधिक मित्र-मैत्रिणी असल्याचेही यात आढळून आले.