झिकाच्या प्रादुर्भावानंतर जन्माला येणाऱ्या बाळांच्या मेंदूचा आकार लहान असतो, त्याला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्याचबरोबर इतरही अनेक जन्मदोष निर्माण होतात. पण आता वैज्ञानिकांनी अशी लस शोधून काढली आहे, जी गर्भवतीला दिल्यास जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये हे दोष आढळत नाहीत. झिकावर लस तयार करण्याचे प्रयत्न अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात सुरू असून त्याच्या चाचण्या प्राण्यांवर करण्यात आल्या आहेत. ग्लॅव्हस्टन येथील टेक्सास विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाने ही लस तयार केली असून त्यामुळे झिकाच्या परिणामांपासून संरक्षण मिळते. यात दोन प्रकारच्या लसी तयार करण्यात आल्या असून त्यात आईकडून झिकाचा प्रसार नवजात बालकात होत नाही. उंदरांवर याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत, असे या विभागाचे प्राध्यापक पेई योंग शी यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे आता लसीची क्षमता स्पष्ट झाली असून त्यात झिकामुळे निर्माण होणाऱ्या जन्मदोषांपासून संरक्षण मिळणार आहे. प्रौढांमध्ये झिकाचा प्रादुर्भाव झाला, तर फार मोठी लक्षणे दिसतच नाहीत पण नवजात बालकांना झिकाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांचे डोके लहान राहाते व इतरही रोग होतात. त्यामुळे हा सर्वात घातक प्रकार या लसीमुळे टाळता येणार आहे. ज्या महिलांना झिकाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत. थेट जन्माला येणाऱ्या बाळातच त्याचे वाईट परिणाम दिसतात.

माता व बाळाचे झिकापासून संरक्षण करणारी ही लस सार्वजनिक आरोग्यात वरदानच ठरणार आहे. ‘सेल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.