आपल्या अन्नपदार्थात मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मिठाशिवाय कुठल्याच खाद्यपदार्थाला चव येत नाही. कदाचित यातूनच ‘खाल्लेल्या मिठाला जाग’ असा वाक्प्रचार रूढ झाला असावा. आपण मिठाबाबत जागृत असू किंवा नाही. मीठ मात्र कायम आपण खात असलेल्या मिठाला जागत असते. मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. स्नायूंच्या आंकुचनात आणि मज्जातंतूच्या सुरळीत कार्यासाठी मिठातील सोडिअम महत्त्वाचे ठरते. शरीरामधील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यामध्येही मिठाचा उपयोग होतो. मीठ नियंत्रित प्रमाणात खाल्ले तर त्याचा शरीराला फायदाच होतो. मात्र अतिरिक्त मिठामुळे रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार उद्भवतात. मीठ खाण्याबाबत काही नियमांचे पालन केल्यास मिठामुळे खाद्यपदार्थाना मिळणाऱ्या रुचीचा आस्वाद घेता येईल, नाहीतर आहारातून मीठ बाद करण्याची वेळ येईल.

आपल्या शरीराला सेंद्रिय स्वरूपातील सोडियमची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता नैसर्गिकरीत्या समुद्रातून काढलेल्या मिठातून पूर्ण होत असते. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी मिठाची आवश्यकता असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका व्यक्तीने दिवसाला पाच ग्रॅम मीठ खावे, मात्र अनेकदा शरीराची आवश्यकता दोन ते तीन ग्रॅमची असते. सोडियम हे खनिज असून स्नायू मजबूत होण्यासाठी त्याची आवश्यकता असते. मीठ शरीरातील पाण्याचे नियमन करत असल्याने आहाराचे नियोजन करताना मिठाचा वापरही लक्षात घ्यायला हवा. अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्यास रक्तप्रवाहावर दाब निर्माण होतो. अतिरिक्त मीठ रक्तवाहिनीतील पाणी शोषून घेते आणि परिणामी उच्च रक्तदाबाचा त्रास संभावतो. रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका आणि हृदयाचे काम बंद पडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर रक्तदाब वाढल्यामुळे आणि शरीराच्या हालचाली कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. मिठातील सोडियममुळे मूत्रपिंडाच्या कार्यावरही परिणाम होतो. मूत्रपिंड हे शरीराच्या रक्तातील अशुद्ध घटक गाळून रक्ताला शुद्ध घटक मिळवून देणारा अवयव असतो. मात्र अतिरिक्त मिठामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊन रक्तात अशुद्ध घटक मिसळले जातात. ज्यादा मीठ खाण्याने त्वचेवरही परिणाम होतात. चेहरा, हात, पाय, विशेषत: मनगट सुजल्यासारखे होते.

आहारातून मीठ कमी कसे कराल?

अनेक जणांना जेवताना ताटामध्ये मीठ घालण्याची सवय असते. अनेकदा खाद्यपदार्थातील मिठाचे प्रमाण योग्य असतानाही सवयीपोटी जेवताना खाद्यपदार्थावरही मीठ घेतले जाते. अशा व्यक्तींनी ताट वाढल्यानंतर वरून मीठ घेण्याची सवय टाळावी. फळांवर किंवा फळांच्या रसात मीठ घालणे टाळावे. पदार्थ फार काळ टिकवून ठेवण्यासाठी मिठाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. रक्तदाब असलेल्या रुग्णांनी मुळातच असे साठवणीचे पदार्थ वज्र्य करावेत. मात्र ज्यांना रक्तदाबाचा त्रास नसेल अशा व्यक्तींनी तो होऊ  नये यासाठी असे पदार्थ नियंत्रित प्रमाणात खावेत. बटाटय़ाचे किंवा केळ्याचे वेफर्स, पॅकबंद रेडिमेड सूप, रेडी टू इट किंवा रेडी टू कूकचे पदार्थ, चीज, फास्ट फूड यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. अनेकदा या बाबी खाणाऱ्याच्या लक्षात येत नाही. सातत्याने हे पदार्थ खाणाऱ्यांना सामान्यांपेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय लागते. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयीप्रमाणे मीठ नसल्यास ते अतिरिक्त मीठ वाढून घेतात. त्याशिवाय लोणची, पापड, खारवलेले मासे या पदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणात मिठाचे प्रमाण असते. त्यामुळे हे पदार्थ प्रमाणात खावे.

बाजारात मिळणाऱ्या बारीक मिठापेक्षा नैसर्गिकरीत्या तयार केलेले जाड मीठ आरोग्यासाठी चांगले आहे. या मिठाला सैंधव मिठाचाही पर्याय दिला जातो. जाड मिठामध्ये सोडिअमचे प्रमाण जास्त असते. सोडिअम कमी खाल्ले जावे म्हणूनही सैंधव मीठ खाल्ले जाते. मात्र सैंधव मिठामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. आणि पोटॅशिअमच्या अतिरिक्त वापरामुळे स्नायू, हृदयविकाराचे त्रास संभवतात. त्यामुळे कोणतेही मीठ कमी प्रमाणात खाणेच उत्तम.

कॉटेज चीज – पनीर व चीजच्या एक कपमध्ये १००० मिलिग्रॅम सोडिअम असते. हे प्रमाण दिवसाच्या एकूण गरजेच्या तुलनेत २५ टक्के असते.

सूप्स – रेडी टू कूक सूप्सच्या पॅकेटमध्ये १००० ते १५०० मिलिग्रॅम सोडिअम आढळते. हे प्रमाण दिवसाच्या एकूण गरजेच्या तुलनेत २५ ते ४० टक्के असते.

पॅनकेक व हॉट चॉकलेट – यामध्ये १५०० ते २००० मिलिग्रॅमपर्यंत सोडिअम आढळते. हे प्रमाण दिवसाच्या एकूण गरजेच्या तुलनेत ४० ते ५० टक्के असते.

त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यास इतर पदार्थामधून शरीरात जाणाऱ्या मिठाचे प्रमाण कमी असेल याची दक्षता घ्यायला हवी.