सखा सह्यद्री हा कोणत्याही ऋतूमध्ये हिंडावा. तो सतत आनंद तर देत राहतोच, परंतु प्रत्येक ऋतूमध्ये तो आपली नवनवीन रूपे दाखवत असतो. एकच ठिकाण निरनिराळ्या ऋतूमध्ये बघितले तर ते संपूर्णपणे वेगळेच दिसते. भंडारदरा परिसरातील किल्ले रतनगडच्या पायथ्याची रतनवाडी आणि तिथे असलेले अमृतेश्वर महादेवाचे प्राचीन देवालय हे त्याचे अगदी ठसठशीत उदाहरण होय. ऐन धो धो पावसात जाण्यासाठी हा सगळाच परिसर अत्यंत आकर्षक असा आहे. नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे वसलेला हा परिसर. इथे जाण्यासाठी संगमनेर-अकोलेमाग्रे जावे लागते. पूर्वी भंडारदरा जलाशयातून नावेने इथे जायला लागायचे. आता मात्र इथपर्यंत डांबरी सडक झालेली आहे. पाबरगडाच्या पायथ्यावरून जाणारा सुंदर रस्ता आपल्याला रतनवाडीत नेऊन सोडतो. पाठीमागे उत्तुंग रतनगड ऐन पावसाळ्यात अतिशय रांगडा दिसतो. रतनवाडीत एक पाषाणसौंदर्य उभे आहे. अंदाजे इ.स. च्या तेराव्या शतकात बांधलेले हे मंदिर ऐन पावसाळ्यात पाहणे यासारखे दुसरे सुख नाही. जलधारांनी निथळताना हे पाषाणसौंदर्य अवश्य न्याहाळावे. मंदिरावर असलेली विविध शिल्पे तर प्रेक्षणीय आहेतच, परंतु या मंदिराला असलेले दोन मुखमंडप म्हणजे पोच्रेस आणि त्याच्या छतावर केलेले सुबक कोरीव काम अवश्य पाहावे. मंदिराच्या शेजारीच असलेली देखणी पुष्कर्णी आणि त्यामध्ये देवता मूर्ती ठेवण्यासाठी असलेले विविध कोनाडे या मंदिराची अजून शोभा वाढवतात. सर्वत्र गर्द हिरवी झाडी आणि मधोमध उभे असलेले हे काळ्या पाषाणातील सुडौल मंदिर ऐन पावसाळ्यात मुद्दाम पाहिले पाहिजे.

उत्तुंग दुर्गाडी

पुणे जिल्ह्यच्या भोर तालुक्याच्या पश्चिमेला असलेला वरंध घाट हा जसा पावसाळ्यात हिंडायला उत्तम ठिकाण आहे, तसेच त्या परिसरात अजून काही सुंदर ठिकाणे ऐन पावसाळ्यात आपली वाट पाहात उभी आहेत. त्यातले एक म्हणजे दुर्गाडीचा डोंगर किंवा काहीजण त्याला किल्ला असेही म्हणतात. भोरवरून वरंधकडे जायला लागले की नीरा देवघर जलाशयाच्या कडेकडेनी तो रस्ता हिडरेशीला जातो. तिथून पुढे एक रस्ता डावीकडे वळतो. तो रस्ता दुर्गाडी शिखराच्या पायथ्याशी आपल्याला नेऊन सोडतो. पायथ्याला एक सुंदर छोटेखानी देऊळ आपले लक्ष वेधून घेते. देवळाच्या जवळूनच नीरा नदी वाहत असते. या मंदिराच्या समोरच डोंगरावर चढणारा रस्ता दिसतो. त्या रस्त्याने डोंगर चढू लागले की आपण एका धारेवर येऊन पोचतो. इथून सह्याद्रीचे रांगडे रूप अतिशय सुंदर दिसते. हा रस्ता सरळ आपल्याला डोंगरमाथ्यावर असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिराशी घेऊन जातो. वाटेत दगडात खोदलेली खांबटाकी बघण्यासारखी आहेत. या शिखरावरून दिसणारा आसमंत निव्वळ देखणं आहे. एकीकडे वरंध घाट, कावळ्या किल्ला, मंगळगड तर दुसरीकडे तोरणा-राजगड हे बेलाग किल्ले, इथपर्यंतचा सगळा परिसर नजरेस पडतो. ऐन पावसाळ्यात तर सगळ्या परिसरावर ढग जमा झालेले असतात. खाली ढग आणि त्यावर आपण असे अवर्णनीय दृश्य इथून अनुभवता येते. ढग बाजूला झाल्यावर परिसरात दिसणारे असंख्य धबधबे आणि सर्वत्र पसरलेला हिरवा रंग आपल्याला तिथून हलू देत नाही. पायथ्यापासून डोंगरमाथ्यावर पोचायला १ तास पुरेसा आहे, मात्र पावसाळ्यात काळजीपूर्वक जायला हवे. नीरा नदीचा उगम असलेले नीरबावी हे ठिकाण इथून जवळच आहे.

ठाणाळे लेणी

अनेक ठिकाणे ही सुप्रसिद्ध ठिकाणच्या सान्निध्यामुळे झाकोळून गेलेली असतात. ठाणाळे लेणींच्या बाबतीत हेच झालंय. अष्टविनायकातील सुप्रसिद्ध गणपती पालीच्या जवळ ऐन सह्यद्रीच्या कुशीत विसावलेले हे ठिकाण खरे तर तितकेच प्रसिद्ध व्हायला हवे होते. बौद्ध लेणी हे इथले मोठे आकर्षण. त्याचसोबत ऐन पावसाळ्यात या सर्व भटकंतीला रंगत येते ती इथे कोसळणाऱ्या धबधब्यामुळे. खरे तर गणपती पालीच्या आजूबाजूला भटकंतीसाठी अनेक सुंदर ठिकाणे वसलेली आहेत. जसे की सरसगडचा किल्ला, उन्हाळे इथली गरम पाण्याची कुंड, सुधागडचा किल्ला आणि या सगळ्या परिसरातून घाटमाथ्यावर जाणाऱ्या विविध घाटवाटा. ठाणाळे इथली लेणी अशीच एका घाटमार्गाच्या तोंडाशी आणि सुधागडच्या कुशीत विसावलेली आहेत. पाली, धोंडसेमाग्रे ठाणाळे अंतर जेमतेम १८ किमी भरेल. ठाणाळे गावापासून लेणीपर्यंत मात्र पायी जावे लागते. हा चालण्याचा टप्पा फारच सुंदर आहे. आजूबाजूला घाटमाथ्याचे उंचचउंच डोंगर, सुधागडचे सान्निध्य आणि ऐन पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणारे धबधबे. ठाणाळे इथे असलेल्या लेणीमध्ये चत्य, विहार, स्तूप बघायला मिळतात. यातली क्रमांक ७ ची लेणी आवर्जून बघण्यासारखी आहे. या लेणीच्या भिंतींवर विविध शिल्पकला केलेली पाहायला मिळते. पावसाळ्यात इथे येण्याचे अजून आकर्षण म्हणजे इथेच असलेला सुंदर धबधबा. अर्थात सगळ्याच ठिकाणांसारखे इथे पण मोठय़ा प्रमाणावर निसरडे झालेले असते. विशेषत पावसाळ्यात या परिसरात जपून वावरावे.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com