सायकलचे शिफ्टर्स म्हणजेच सायकलच्या हँडलबारवर तुमच्या दोन्ही हाताजवळ गिअर्स बदलण्यासाठी असणारे नॉब्स याविषयी आपण मागच्या भागात माहिती घेतली. यावेळी आपण कसेट्स, फ्रीव्हिल्स, ड्राईव्हट्रेन, केडन्सविषयी माहिती घेणार आहोत. साध्या सायकलला पुढे पेडलजवळ एक मोठी आणि मागच्या चाकाजवळ एक छोटी अशा दोनच दातेरी चकत्या (ज्या दोन्ही चेनच्या साहाय्याने एकत्रित फिरण्याचे कार्य करतात) असतात. परंतु आधुनिक सायकलींमध्ये पेडलच्या बाजूला वेगवेगवेगळ्या आकाराच्या दोन किंवा तीन आणि मागच्या चाकाला एकापेक्षा अधिक म्हणजे सात, आठ किंवा नऊ चकत्या असतात. या चकत्या नेमकं काय आणि त्यांचं कार्य कसं चालतं हे आपण यावेळी जाणून घेणार आहोत. गिअर्सची सायकल घेताना गिअर्सच्या भागांविषयी माहिती असणंही गरजेचं आहे. तसंच सायकलला दिलेल्या प्रत्येक गिअरचं वेगळं काम आणि महत्त्व आहे. ते एकदा लक्षात आलं की, आवश्यक असताना त्याचा योग्य वापर करून सायकिलगचा आनंद लुटता येतो.
कसेट्स म्हणजे काय?
सायकलच्या मागच्या (रिअर) चाकाजवळ असलेला दातेरी चकत्यांचा समूह म्हणजे कसेट्स होय. फ्रीहबच्या वर ते बसवण्यात आलेले असतात. तुमच्या सायकलच्या स्पीडवर (म्हणजे ती किती स्पीडची आहे) यावर दातेरी चकत्यांची संख्या ठरलेली असते.आधुनिक सायकलींमध्ये मागच्या चाकाजवळ नऊ, दहा किंवा अकरा दातेरी चकत्यांचा समूह असलेला आढळतो. हा समूह म्हणजे चकसेट्स वेळोवेळी स्वच्छ करणंही आवश्यक आहे. त्यावर साचलेल्या माती आणि तेलाच्या थरामुळे गिअर्स बदलताना जास्त कष्ट पडू शकतात आणि कसेट्सचं आयुष्यही कमी होतं. लांब पल्ल्याच्या सायकलींमध्ये दर दिवशी कसेट्स गरजेनुसार सुक्या ब्रशने किंवा डब्लू डी-४०च्या साहाय्याने स्वच्छ करावी. चढणीवर अचानक गिअर्स बदलताना त्याचा ताण कसेट्च्या दातांवर येतो आणि त्याचा आकार बदलत असतो. त्याचा परिणाम म्हणून सायकलची चेन सतत दात्यांवरून घसरते. म्हणून लांब पल्ल्याच्या सायकल सफरीवर जाण्यापूर्वी कसेट्स तपासून घ्यावी. कारण कसेट्च्या डिझाईनचा विचार करता कसेट्समधील एखादी चकती बदलता येत नाही. संपूर्ण कसेट्स बदलावी लागते आणि दुर्गम भागात तुमच्या सायकलच्या मॉडेलची कसेट्स मिळेलच असं नाही.
फ्रीव्हिल्स
फ्रीव्हिलमध्ये दातेरी चकत्यांचा समूह म्हणजेच कसेट्स बसवण्यासाठी हबवरच स्क्रू बसवण्यासाठी जसे आटे असतात तशी संरचना केलेली असते. दरम्यान फ्रीव्हिल हा प्रकार आता कालबाह्य़ होत चालला आहे आणि आता ते सहा, सात आणि आठ स्पीडच्या सायकलमध्येच आढळतात. फ्रीव्हिल जनरेशनच्या पुढील आधुनिक सायकलींमध्ये फ्रीहब बॉडी हा प्रकार आता जास्त प्रचलित होत आहे.
ड्राइव्हट्रेन हा काय प्रकार आहे?
मागचे (रिअर) गिअर्स, पुढचे (फ्रंट) गिअर्स, डिरेलर आणि चेन या सर्व अवयवांच्या मिश्रणाला ड्राइव्हट्रेन म्हणतात आणि हे सर्व अवयव एकत्रितपणे सायकलला गती देतात. पेडल फिरवून पुढच्या दिशेने चेन फिरायला लागली की सायकलला गती प्राप्त होते आणि मग यामध्ये चढणीवर तुमच्या पायांना अधिक त्रास होऊ नये म्हणून गिअर्सची उपाययोजना केलेली असते. दरम्यान, प्रत्येक सायकलमध्ये हब, कसेट्स, डिरेलर आणि चेन हे चारही अवयव एकमेकांना पूरकच (योग्य आकार आणि प्रकार) असावे लागतात, तरच ड्राइव्हट्रेन योग्य पद्धतीने काम करते. अन्यथा तुमच्या सायकलचे गिअर्स योग्य रीतीने काम करू शकणार नाहीत.
केडन्स म्हणजे काय?
केडन्स हे RPM ( Revolutions per minute ) मध्ये मोजतात. एका मिनिटाच्या कालावधीमध्ये एका पायाचे जितके वर्तुळ होतात त्याला दोन या संख्येने गुणले असता जो आकडा येतो तो म्हणजे तुमचा केडन्स होय. सपाट रस्त्यावर सायकल चालवून तुम्हाला हा प्रयोग करता येईल. कुठला गिअर कधी आणि कसा बदलायचा ते आपल्या केडन्सवरून ठरते. वरच्या गिअर मध्ये फढट कमी भरतात, तर खालच्या गिअरमध्ये फढट जास्त भरतात.
तुम्हाला एकदा चढ-उतारांचा अंदाज आला की तुमचे पायच तुमच्यासाठी गिअरची
निवड करत असतात. येथे अनुभव तुमचा मार्गदर्शक ठरतो.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
दुचाकीवरून : गिअर बदलताना..
सायकलच्या मागच्या (रिअर) चाकाजवळ असलेला दातेरी चकत्यांचा समूह म्हणजे कसेट्स होय.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 25-05-2016 at 03:34 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to shift bicycle gears