नॉर्वेचे ओस्लो हे राजधानीचे शहर. हे ‘जगातील सर्वात सुखी शहर’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले आहे. या शहराचे एकूणच स्वरूप अत्यंत कलात्मक, संस्कृतीसंपन्न, आणि कुणालाही मोहिनी घालणारे आहे. तिथला वेगळ्या धाटणीचा असा नॉर्वेजियन ऑपेरा, निरनिराळी बॅलेनृत्ये, नाटके, विविध कला-वास्तुकलांची संग्रहालये, चित्रे, शिल्पे यांनी हे शहर कायम लखलखत असते. नॉर्वेतील या ओस्लो शहरात विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला घडलेली एक गोष्ट आहे. या शहरात एका छोटय़ा घरात एक होतकरू शिल्पकार राहात होता. १९२१ साली त्या शहरात नगरपालिकेने सार्वजनिक वाचनालयाची एक इमारत उभी करण्याचे ठरवले. त्यासाठी जागा हवी म्हणून त्या शिल्पकाराचे घर पाडून टाकले गेले. बिचारा शिल्पकार आपल्या साऱ्या कलाकृतींसह थेट रस्त्यावर आला. त्यामुळे काही काळ मोठे वादंग माजले. मग, नगरपालिकेने त्या शिल्पकाराला सर्व सोयींनी युक्त असे एक नवे घर शहराच्या फ्रॉगनर मॅनॉरच्या जागेत बांधून देण्याचे ठरवले. शिल्पकाराला १९२४ मध्ये ते नवे घर ताब्यात मिळाले. तेव्हा त्या उपकाराची परतफेड म्हणून शिल्पकाराने ओस्लो शहरासाठी काही शिल्पांची निर्मिती फ्रॉगनरच्या त्या जागेत सुरू केली. ब्राँझ, बिडाचे लोखंड आणि ग्रॅनाइटचा दगड यांचा वापर करून त्याने २१२ नग्न मानवी पुतळे बनवले. गुस्ताव्ह व्हिगेलँड हे त्या शिल्पकाराचे नाव. हा एक अत्यंत कल्पक असा शिल्पकार होता. दैनंदिन व्यवहारांत निरनिराळी कामे करीत असताना वेगवेगळ्या वयाच्या स्त्री-पुरुषांच्या शरीरांच्या ज्या हालचाली होतात, त्याप्रमाणे मानवी पुतळे हुबेहूब घडवण्याचा प्रयत्न गुस्ताव्ह व्हिगेलँडने केला. ज्या काळात नॉर्वेमध्ये हिटलरच्या नाझी सन्याचे अत्याचार सुरू होते त्या काळात या शिल्पकाराने रात्रंदिवस मेहनत करून अजोड अशी मानवी शिल्पे निर्माण केली. हर्ष, उन्माद, दु:ख, आश्चर्य, कणव, क्रोध, अगतिकता या साऱ्या मानवी भावना देहबोलीतून व्यक्त करणारे हे पूर्णाकृती पुतळे होत. ही अद्वितीय अशी सगळी शिल्पे पूर्ण होताच व्हिगेलँडने ती ओस्लो शहराच्या नगरपालिकेस भेट दिली. त्यानंतर या शिल्पकाराच्याच देखरेखीखाली ती शिल्पे शहरातील फ्रॉगनर पार्क या खासगी उद्यानात स्थलांतरित केली गेली. १९व्या शतकात या फ्रॉगनर पार्कमध्ये लहान-थोरांच्या करमणुकीसाठी निरनिराळे खेळ, चित्रविचित्र दालने, चक्राकृती पाळणे, झोके या गोष्टी बसवलेल्या होत्या. या पार्कमुळेच वॉल्ट डिस्ने या सुप्रसिद्ध अमेरिकन सिनेदिग्दर्शकाला डिस्नेलँड ही करमणूकनगरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणतात. १८९६ मध्ये हे पार्क सार्वजनिक म्हणून घोषित केले गेले. नंतर १९३९ मध्ये गुस्ताव्ह व्हिगेलँडची शिल्पे या उद्यानात बसवण्याचे सुरू झाले. ते काम १९४९ मध्ये संपले. परंतु, दुर्दैवाने त्या आधीच गुस्ताव्ह व्हिगेलँड याची जीवनयात्रा संपलेली होती. स्वत:च्या कल्पनाविलासातून साकारलेले शिल्पोद्यान पूर्णत्वाला गेलेले पाहण्याची संधी या गुणी कलाकाराला मिळालीच नाही.

नॉर्वे दौऱ्यात आम्ही जेव्हा ओस्लो शहरात पोहोचलो, तेव्हा आम्ही या फ्रॉगनर पार्कला भेट देऊन ती सारी जिवंत वाटणारी शिल्पे पाहिली. चालणाऱ्या, धावणाऱ्या, हातात हात घेऊन बसलेल्या, तान्ह्य बाळांना कुशीत घेणाऱ्या, स्वप्नरंजनात मग्न असणाऱ्या, क्रोधभरात मुठी वळणाऱ्या त्या पूर्णाकार मानवी आकृती पाहून एका अद्भुत जगात प्रवेश केल्यासारखे वाटले. त्यांत एकमेकांच्या मिठीत मग्न अशी प्रेमी युगुले होती, आपल्या मुलांना समजावणारे आईबाप होते, वार्धक्याने वाकलेले पुरुष होते, कधी वास्तवपूर्ण तर कधी आभासी अशा मानवी आविर्भावांची अनुभूती देणाऱ्या अनेक आकृती तिथे साकार झालेल्या होत्या. स्त्री-पुरुषांच्या या साऱ्या आकृती नग्न असल्या तरी त्यात कामुकतेचा किंवा बीभत्सतेचा लवलेशही नव्हता. अत्यंत प्रमाणबद्ध अशा त्या नग्न शरीरांचे निरनिराळे आविर्भाव स्थळकाळाच्या पलीकडे जाऊन मानवी मनाच्या सुप्त अवस्थांचे लोभस दर्शन घडवणारे होते. या शिल्पांपकी एकशे एकवीस मानवी शरीरांच्या आकृतींपासून साकार झालेला ४५ फूट उंच मनोरा, चार नवजात बालकांना अंगाखांद्यांवर खेळवणाऱ्या पुरुषाचा अतिवास्तव भासणारा पुतळा, चार मानवी आकृतींच्या हातांतील उंचावलेल्या बाऊलमधून उडणारे कारंजे, आणि खेळताना एकमेकांच्या अंगावर पडून अंगांचा डोंगर उभा करणारी छोटी मुले, ही शिल्पे अप्रतिम आहेत. माणसाची जगण्याची धडपड, अनंताकडे झेपावण्याची इच्छा, दैनंदिन जीवनातला उदात्त भाव आणि जीवनचक्राच्या विविध अवस्था यांचे मनोज्ञ दर्शन ओस्लो शहराच्या फ्रॉगनर पार्कमध्ये शिल्पकार गुस्ताव्ह व्हिगेलँड यांच्या या मनस्वी शिल्पकृतींतून होते.

विजय दिवाण

vijdiw@gmail.com