जंगल प्रत्येक ऋतूत सुंदर दिसतं, असं म्हणतात. मला हा अनुभव बोरिवली पूर्वला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत नेहमी आला आहे. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंत मी इथं गेले आहे. कधी घरच्यांसोबत, कधी शासकीय कामानिमित्ताने. काही दिवसांपूर्वी तर मी मुलुंड गेटने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री आठनंतर प्रवास केला, तब्बल आठ किलोमीटर आतून. दिवसा पाहिलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रात्रीची नवलाईही अनुभवायला मिळाली.

खरं तर मुंबई महानगरामध्ये वसलेलं १०३ चौ.कि.मी.चं हे जंगल आत गेल्याशिवाय कळत नाही आणि एकदा आत गेलो तर आपण मुंबईत आहोत असं अजिबात वाटत नाही इतकं हे राष्ट्रीय उद्यान मनावर गारूड घालतं. हे शहरातलं जंगल आहे. शहराच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवनाला मिळणारा हा समृद्ध आरोग्यदायी असा श्वास आहे. खरं तर याला मुंबईचं फुफ्फुसही का म्हणतात हे तिथे भेट दिल्यानंतरच कळतं.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार

पावसात चिंब भिजत रानमेवा खात उद्यानातून फिरण्याची मजा काही औरच आहे. पावसात ठिकठिकाणी वाहणारे झरे, ओलीचिंब झाडं, पावसाच्या प्रत्येक थेंबाला स्वत:वर झेलत अडकवून ठेवणारे काटवृक्ष, धुक्यात हरवलेलं वन आणि त्यातून फार दूरवर दिसणाऱ्या मुंबईच्या उंच उंच इमारती पाहणं खूपच उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यातली पानगळ आणि वसंताचा मोहोरही इथं जाऊन एकदा तरी अनुभवावा इतकी इथली वृक्षसंपदा सुंदर आहे. राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता विलक्षण चकित करणारी आहे.

अगदी महानगराला जोडून असलेल्या या उद्यानात सुमारे २७४ पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. उद्यानात १३०० पेक्षा अधिक वृक्ष प्रजाती आहेत. मुंगूस, उदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यत: करंज, साग, शिसव, बाभूळ, बोर, निवडुंग, बांबूची बेटं आपल्याला पाहायला मिळतात.

इथला केयूबी हा असा विभाग आहे ज्यात पर्यटनासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा आहेत आणि एसजीएनपीच्या (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) कामकाजाच्या वेळेत हा विभाग जनतेसाठी खुला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुलसी तलाव याच जंगलात आहेत. मुंबई शहराची वाढ झपाटय़ाने झाली असली तरी या जंगलाचा इतिहास फार जुना आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलाला इ.स.पूर्व चौथ्या शतकापासूनचा खूप प्राचीन इतिहास असल्याचे वनाधिकारी सांगतात. पार्कच्या मध्यभागी बौद्धकालीन कान्हेरी गुंफा आहेत. हे बौद्धकालीन महत्त्वाचे शिक्षण आणि तीर्थक्षेत्र होते, असं म्हणतात. या संरक्षित वास्तुशिल्पात १०० पेक्षा अधिक गुंफा आहेत ज्या ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या दगडात कोरलेल्या आहेत. कान्हेरी हा शब्द कृष्णगिरी या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ काळा पर्वत. बौद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या अप्रतिम मूर्तीचे अवशेष इथं पाहायला मिळतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुक्तविहार करणाऱ्या बिबटय़ांचाही अधिवास आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माणसांनी निर्माण केलेल्या सीमारेषा बिबटय़ांना समजत नाहीत म्हणून खबरदारीचे सर्व उपाय करणे हे आपल्याच हातात असल्याचे सांगताना बिबटे आणि इतर वन्यजीवांच्या बाबतीत आपण सतत सतर्क राहावे, नियमांचे पालन करावे अशा सूचना उद्यानात जागोजागी लिहिलेल्या दिसतात. या मार्गदर्शन आणि प्रयत्नांमुळेच मानव आणि वन्यजीव संघर्षांच्या घटनांवर आळा घालणे उद्यान प्रशासनाला शक्य झाले आहे.

वनाचा आनंद घेत सुरक्षित वन पर्यटन कसे करावे याचे सुंदर मार्गदर्शन इथल्या निसर्ग माहिती केंद्रातून मिळते. या केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. जसे रात्रीचे शिबीर, कार्यशाळा, निसर्गभ्रमंती सहल, पक्षिनिरीक्षण, फुलपाखरू निरीक्षण इ. पर्यटकांना निसर्गाचा समृद्ध अनुभव देण्यासाठी उद्यानातील तंबू संकुलामध्ये आरामदायी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यात कुटुंबासाठी तंबू आणि डॉर्मिटरीजची व्यवस्था उपलब्ध आहे. निसर्गकेंद्राशी संपर्क साधून हे तंबू भाडय़ाने घेता येतात. दहा किंवा अधिक व्यक्तींसाठी रात्रीच्या शिबिराचे आयोजन करता येते.

सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधीत उद्यान पर्यटकांसाठी खुलं असतं. राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला फिरायचे असेल तर उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सायकल भाडय़ाने मिळते. मुख्य प्रवेशद्वारापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक कृत्रिम तलाव आहे, ज्यात पेडल बोटीचा आनंदही आपण घेऊ शकतो. गांधी टेकडी ही महात्मा गांधीजींचे स्मृतिस्थळही इथे आहे. इथून सभोवतालच्या जंगलाचे सुंदर दृश्य पाहता येते.

वनराणी ही या जंगलाची राणी असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे हे सर्वात जुने आकर्षण आहे. अरुंद मार्गावरून धावणारी ही झुकझुक गाडी गांधी टेकडीच्या सभोवतालच्या टेकडय़ांमधून वाट काढत आपल्याला जंगल पर्यटनाचा मनसोक्त आनंद देऊन जाते.

इथं फुलपाखरू आणि सुगंधी वनस्पती उद्यानही साकारण्यात आले आहे. शिवाय सिंह आणि व्याघ्र सफारी हे पर्यटकांचे वाढते आकर्षणकेंद्र झाले आहे. सुरक्षित बंदिस्त वाहनातून वाघ आणि सिंहांना त्यांच्या नसíगक अधिवासात पाहण्याचा थरार मुंबईत राहून अनुभवण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळाली आहे. या उद्यानास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली हे स्थानक जवळचे आहे. तेथून उद्यानाकडे जाण्यासाठी बस व रिक्षा सहज उपलब्ध आहेत. एखादा रविवार किंवा सुट्टीचा दिवस कुटुंबीयांसमवेत घालवायचा असेल तर हे उद्यान अतिशय योग्य निवड ठरेल.

drsurekha.mulay@gmail.com