लडाख हे सध्या पर्यटनासाठी हॉट डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. कुटुंबं, मुलामुलींचे ग्रुप्स यांनी या दोन महिन्यांत लडाख गजबजून जातं. अर्थात पर्यटनाबरोबरच शॉपिंग हे अपरिहार्य झालं आहे. निसर्गसंपन्न लडाखमध्ये शॉपिंग करताना नेमकं काय करायला हवं, काय टाळायला हवं याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख.

लेह-लडाखचं नाव निघालं की, डोळ्यांसमोर येतात ते उंच डोंगररांगा, गोठवणारी थंडी, वळणावळणाच्या रस्त्यांवर गटागटाने फिरणारे बाईकस्वार आणि बर्फाच्छादीत डोंगर. पण याच नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात खास पहाडी वस्तू खरेदी करण्याचा आनंददेखील वेगळाच आहे. लडाखची सफर शॉपिंगवारी केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या

लेहचा मुख्य बाजार तेथील स्थानिक लोकांनी तयार केलेल्या नानाविध वस्तूंनी सजलेला असतो. पश्मिना शालींपासून ते टक्र्वाईश, कोरल स्टोनच्या ज्वेलरीपर्यंत, कार्पेट्सपासून ते डेकोरेटिव्ह शोपीसपर्यंत विविध वस्तू लेहच्या बाजारात पाहायला मिळतात. खऱ्या शॉपिंगप्रेमीला या बाजारात एकदा शिरल्यावर काय घेऊ आणि किती घेऊ असं झाल्याशिवाय राहवणारच नाही. विशेषत: तमाम महिला वर्गासाठी कपडय़ांपासून ते दागिने, बॅग्स यांचे असंख्य पर्याय लेहमध्ये उपलब्ध आहेत.

लेहच्या मुख्य मार्केटमध्ये सर्वसाधारणपणे तीन प्रकारची दुकाने असतात. बाजारात शिरल्यावर लगेचच किंमती स्टोन्स, चांदी, बारीक कलाकुसर केलेल्या वस्तू विकणारी महागडी बडी दुकाने त्यांच्या झगमगाटाने लक्ष वेधून घेतात. पण त्यांच्याकडील वस्तूंच्या किमतींनी आपले डोळे दिपून जातात. लडाखमध्ये ‘आर्ट गॅलरी’ नामक छोटेखानी दुकाने बाजारात पाहायला मिळतात. आपल्याकडे पैशांची गरज भासल्यास सोनाराकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याची पद्धत आहे, तशीच लडाखच्या आसपासच्या गावात राहणारे आदिवासी, कातकरी जमातीतील लोक पैशाची गरज भासल्यास त्यांच्याकडील दागिने या आर्ट गॅलरीमध्ये विकायला आणतात. त्या बदल्यात त्यांना तुटपुंजी रक्कम मिळते. जुन्या, काहीशा तुटलेल्या, चांदीच्या पण ऑक्सिडाइज झालेल्या दागिन्यांकडे आपण कदाचित ढुंकूनही बघणार नाही. पण येथे मात्र याच ‘अँटिक ज्वेलरी’ला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक या आर्ट गॅलरीतील वस्तूंसाठी हजारो डॉलर्स खर्च करायला सहज तयार होतात. या दुकानांमध्ये फेरफटका मारल्यास तुमच्या हातालाही एखादा अनोखा दागिना नक्कीच लागू शकतो. फक्त त्या वस्तूंच्या गर्दीतून योग्य वस्तू निवडता यायला हवी.

‘तिबेटीयन मार्केट’मध्ये तिबेटी स्थलांतरित लोकांनी तयार केलेल्या वस्तू पाहायला मिळतात. त्यांच्याकडे छोटे कानातले, ब्रेसलेट, कडे, नेकपीस, माळा असे अनेक दागिन्यांचे प्रकार विकायला असतात. तसेच प्रेयर व्हील, सिंगिंग बाऊल, बुद्धाच्या मूर्ती अशा धार्मिक वस्तूसुद्धा येथे मिळतात. तिबेटीयन मार्केटची खासियत म्हणजे येथे ग्राहकांसोबत विक्रेत्या या बहुतांशी महिलाच असतात. त्यांच्या टेबलावरचे बहुतेक दागिने त्यांनी स्वत: घडविलेले असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून, घासाघीस करताना येणाऱ्या स्वरातून त्या वस्तूबद्दलची आत्मियता तुम्हाला जाणवते.

काश्मीरप्रमाणेच पश्मीना शाली, सिल्कच्या शाली लेहमध्येही प्रसिद्ध आहेत. खरेदीसाठी पर्यटकांची पहिली पसंती यांनाच असते. याशिवाय टक्र्वाईश, कोरलसारख्या सेमी-प्रेशिअस स्टोन्सच्या दागिन्यांना येथे मोठी मागणी आहे. विशेषत: गावातल्या बायकांनी बनविलेल्या, पॉलिश नसलेल्या दागिन्यांना पर्यटक अधिक पसंती देतात. चांदीचे दागिनेसुद्धा या भागात प्रसिद्ध आहेत. काश्मिरी वर्क केलेल्या पर्स, शाल, जॅकेट, कुर्ते बाजारातील प्रत्येक दुकानात विकायला असतात. याशिवाय नातेवाईक, मित्रांना भेट देता येतील आणि लेहची आठवण म्हणून सहज नेता येऊ  शकणारे स्वतात मस्त असे एम्ब्रॉयडर किंवा प्रिंटेड टी-शर्ट्स दुकानात पाहायला मिळतात. कार्पेट, अँटीक लुकची घडय़ाळे, बारीक कलाकुसर केलेले शोपीस अशा घराच्या सजावटीसाठी वापरात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी या बाजारात पाहायला मिळतात. त्यामुळे यंदा लडाखला जाताना तेथून खरेदी करून आणलेल्या वस्तूंसाठी एक रिकामी बॅग नेण्यास विसरू नका.

लडाखी खानपान

लडाखला जायचं म्हणजे मोमोजवर ताव मारायचा हे ठरलेलं असतंच. रस्त्यालगत असलेल्या प्रत्येक हॉटेलमध्ये मोमोजची पाटी झळकलेली दिसते. व्हेज मोमो, फ्राईड मोमो, चिकन मोमो, चीज मोमो असे मोमोचे भरपूर प्रकार तुम्हाला लेहला चाखायला मिळतात. पण याशिवाय ‘तुत्पा’ हा सूप आणि नुडल्सचा प्रकार लेहमध्ये नक्कीच चाखायला हवा. वेगवेगळ्या भाज्या किंवा चिकन आणि नुडल्स यांना एकत्रित करून हे सूप बनविले जाते. सूपचा प्रकार असला, तरी त्यांच्या सूपच्या बाऊलचा आकार बघता तुत्पा मेन कोर्स ठरू शकतो. अति मसाल्यांचा वापर न केल्यामुळे दुपारी फिरल्यावर गरमागरम पण लाइट टेस्टचं जेवण हवं असल्यास तुत्पा चांगला पर्याय ठरू  शकतो.

दुपारच्या वेळी भटकंती सुरू असताना धाब्यावर सहज मिळणारी पालेभाज्यांची साग किंवा भाजी, दाल, भात आणि चपाती ही थाळी चाखायला हवीच. सोबत लडाखी चहा असेल तर प्रश्नच मिटला. चक्कू नावाची चहापत्ती आणि फुल उकळून त्यात दूध, मीठ आणि भरपूर बटर टाकून केलेला हा चहा कोणत्याही सूपला सहज टक्कर देऊ  शकतो. पण हा चहा प्यायचा असेल तर तुम्हाला ढाबाच गाठायला हवा. विशेषत: पलाँग लेकच्या आसपास झालेल्या ढाब्याच्या भाऊगर्दीत हा चहा तुम्हाला नक्कीच सापडेल. याशिवाय चमचमीत जेवायचं असेल तर लेहमध्ये चायनीज, इंडोनेशियन खाद्यपदार्थाची रेलचेल पाहायला मिळते. नुडल्सचे असंख्य प्रकार आहेतच. आलू पराठा हॉटेलमध्ये इतका पाहायला मिळतो की, पंजाबऐवजी तो लेहचा पारंपरिक पदार्थ आहे का? अशी शंका येते.

हे लक्षात ठेवा..

  • घासाघीस आणि किमतीच्या हिशोबाने तिबेटीयन मार्केट खरेदीसाठी उत्तम आहेत. इथे तुम्हाला वाजवी किमतीत सुंदर वस्तू मिळू शकतात. दुकानात त्याच वस्तूंसाठी दुप्पट किंमत मोजावी लागू शकते.
  • इअरिंग्जची किंमत १०० रुपयांपासून सुरू होते, तर नेकपीस, कडे २५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. सिंगिंग बाउलसारख्या धार्मिक वस्तू ५०० रुपयांपासून मिळतात. शालींची किंमत ३०० रुपयांपासून सुरू होते.
  • लडाखमध्ये बार्गेनिंग कौशल्य उत्तम असणे गरजेचे आहे. योग्य बार्गेन केल्यास दुकानदाराने सांगितलेल्या किंमतीच्या निम्म्या किमतीत तुम्हाला वस्तू सहज मिळू शकते.
  • दागिन्यांच्या बाबतीत प्रत्येक दागिना चांदीचाच असल्याचे दुकानदार सांगतो. पण त्यातली चांदी आणि पत्रा यातला फरक ओळखणे गरजेचे आहे.
  • तीनशेपासून तीन हजारांपर्यंत पश्मिना शाल मिळते. पण आपल्याला ओळखता येत असेल तरच त्यावर खर्च करावा अन्यथा त्या वाटेला जाऊ नये.
  • अ‍ॅण्टीकच्या नावावर अनेक वेळा मशिनमेड वस्तू विकल्या जातात. त्यामुळे जरा जपूनच.
  • सिंगिंग बाऊलच्या किमती दहा हजारांपर्यंत सांगितल्या जातात, पण चक्क निम्म्या किमतीत मिळून जातात.
  • कारगिल मेमोरियल, पेलाँग लेकच्या वाटेवरील लष्कराचे कॅम्प अशा ठिकाणी लोकरीच्या कानटोप्या व तत्सम वस्तू दर्जेदार गुणवत्तेच्या मिळतात. लष्कराची आठवण म्हणून येथे खरेदी करण्यास हरकत नाही.

mrunalbhagat2@gmail.com