रोमच्या गर्दीत हरवलेल्या पर्यटकाला सुखद दिलासा देणारे व्हॅलीनफ्रेडा हे गाव. ज्याला रोमन आदरातिथ्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि रोमच्या आसपासचे निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल त्याने व्हॅलीनफ्रेडाला नक्की भेट द्यावी.

व्हॅलीनफ्रेडा. इटलीच्या लॅझिओ भागात वसलेले हे गाव. हे रोमच्या ईशान्येला साधारण ५० किलोमीटरवर असून रोमच्या महानगर हद्दीत येते. समुद्रसपाटीपासून २८५० फूट उंचीवर असलेले अवघ्या १६.८२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे हे एक छोटे गाव. संरक्षित वनाने वेढलेला हा भूप्रदेश अत्यंत रमणीय आहे. नाना प्रकारच्या वनस्पती तसेच प्राणी-पक्षी इथल्या नैसर्गिक विविधतेची साक्ष देतात.

d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण

व्हॅलीनफ्रेडा गावात साधारण चौथ्या-पाचव्या शतकात पहिल्यांदा वस्ती झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. एक कृषिप्रधान गाव म्हणून व्हॅलीनफ्रेडाची भरभराट झाली. सामंतशाही अस्तित्वात असेपर्यंत हे गाव बऱ्याच वेगवेगळ्या संस्थानिकांच्या ताब्यात जात राहिले. इटलीच्या एकत्रीकरणाचा मुख्य प्रणेता असलेल्या गॅरीबाल्डीचे स्मारक या गावात आहे. गॅरीबाल्डीचे सन्य १८६७ मध्ये रोमच्या दिशेने वाटचाल करीत असताना या गावातून गेले होते, याची ही आठवण.

गावाची रचना एखाद्या गढीप्रमाणे आहे. पायऱ्या आणि नागमोडी पायवाटा हे या गढीपर्यंत पोहोचायचे मार्ग. गावात एक छोटे चर्चही आहे. साधारण १७ व्या शतकात बांधून पूर्ण झालेल्या या चर्चचा आतील भाग अनेक चित्रे आणि कलाकुसरीमुळे दर्शनीय झाला आहे.

गावची वस्ती साधारण ३०० च्या आसपास. बरेचसे लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने रोमसारख्या मोठय़ा शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांची कुटुंबेही त्यांच्याबरोबर शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. गावात प्रामुख्याने उरले आहेत निवृत्त झालेले लोक. त्यातही बरेचसे उन्हाळ्यात सुट्टी घालवण्यासाठी व्हॅलीनफ्रेडाला येणारे. पण गावातील लोक मनमिळावू आहेत. गावात नवीन लोक आलेले पाहून त्यांना आनंद होतो. त्यांचे आदरातिथ्य हे स्थानिक तेवढय़ाच मनापासून करतात.

गावचे वैशिष्टय़ म्हणजे इथला सान्ये हा पास्त्याचा प्रकार. पिठात पाणी आणि मीठ मिसळून हा पास्ता बनवला जातो. मिश्रण एकत्र मळताना त्यात बऱ्याचदा अंडीसुद्धा घातली जातात. या पास्त्याचा एक विशेष आकार असतो. साधारण छोटय़ा एक सेंटिमीटर रुंदीच्या चपटय़ा पट्टय़ा यात बनवल्या जातात. गावात आलेल्या पर्यटकांना हा पास्ता बनवायला शिकवण्याचे काम तिथल्या आज्या आनंदाने करतात. जरी त्या इटालियन भाषेत समजावत असल्या तरी कृतीकडे लक्ष दिल्यावर भाषेचा फारसा अडथळा जाणवत नाही. इथे पास्ता विथ बीन्स लोकप्रिय आहे आणि ही या भागातील पारंपरिक पाककृती आहे. पास्त्याबरोबरच गावात बनवलेल्या चीज आणि इतर पदार्थाचा आस्वादही पर्यटकांना घेता येतो.

हे गाव तसे आडवाटेला आहे. त्यामुळे इथे फारसे पर्यटक दिसत नाहीत. पण शाळांच्या सहली आणि स्काऊट कॅम्प्स यानिमित्ताने बरेच विद्यार्थी आणि तरुण मंडळी गावाला भेट देतात. गावातले मार्गदर्शक गावात फेरफटका मारताना त्यांना आसपासच्या वनस्पतींची, विशेषत त्यांच्या औषधी गुणधर्माची माहिती देतात. त्यांच्यासाठी विविध प्रकल्प आयोजित केले जातात.

इथला एक आगळावेगळा प्रोजेक्ट म्हणजे जिओकॅचिंग (geocaching). जिओकॅच ही एखादी छोटी वस्तू जी ठराविक ठिकाणी, काहीशी आडबाजूला ठेवली जाते. आणि GPS च्या साहाय्याने ती वस्तू शोधणे हा हेतू. साधारणत पाण्यापासून सुरक्षित राहील असा एक डबा आणि त्यात एक नोंदवही आणि पेन/पेन्सिल अशी या कॅचची रचना आहे. जो कोणी हा कॅच शोधेल त्याने त्यात स्वतचे नाव आणि कधी शोधला त्याची तारीख लिहून ठेवावी, म्हणजे त्याने खरेच ती वस्तू शोधली याचा हा पुरावा. काही ठिकाणी वेगवेगळ्या छोटय़ा वस्तूसुद्धा या डब्यात सापडतात. आपल्याला हवी ती वस्तू घेऊन आपल्याजवळची वस्तू त्यात ठेवता येते. मुलांसाठीच नव्हे तर सगळ्याच वयोगटांसाठी हा खेळ रंजक आहे. जगभरातच जिओकॅचिंग फार लोकप्रिय आहे. व्हॅलीनफ्रेडामध्ये सुद्धा असे काही कॅच आहेत.

या गावाचा भर निसर्गपर्यटनावर आहे. लोकांना वेगवेगळ्या वनौषधींची माहिती मिळावी, नाना वृक्षप्रकारांची वैशिष्टय़े समजावीत यासाठी विविध माहितीपूर्ण सदरे, वनौषधींपासून बनवलेली उत्पादने इत्यादींच्या माध्यमातून इथे इको-टुरिझमचा प्रसार केला जातो. व्हॅलीनफ्रेडाजवळच रोम युनिव्हर्सिटी ‘La Sapienza’ च्या High Energy Cosmic Group – SCAE ची एक वेधशाळादेखील आहे. तिथे शाळा आणि ग्रुप्ससाठी टूर्स तसेच खगोलशास्त्राविषयी लेक्चर्स आयोजित केली जातात.

ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे स्वर्गच. निसर्गाची विविध रूपे व्हॅलीनफ्रेडाच्या आसपासच्या परिसरात पाहायला मिळतात. या भागात काही नेचर पार्क्‍ससुद्धा आहेत. इतिहास, पुरातत्त्व विषयात रस असलेल्यांना पोर्टकिा या जवळच असलेल्या ठिकाणी गेल्यास पूर्व-मध्ययुगीन काळातील वसाहतीचे काही अवशेष दिसतील.

इथे पोहोचण्यासाठी SS Tiburtina – Valeria ही ट्रेन अर्सोलीपर्यंत घेऊन पुढे बसने व्हॅलीनफ्रेडाला जाता येते. पण दिवसातून काही ठरावीकच बस असल्याने वेळ आधी खात्री करून घेणे कधीही चांगले. उन्हाळ्यात इथले सौंदर्य अधिक चांगले अनुभवता येते. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि ट्रेकिंग तसेच काही तरी वेगळा अनुभव घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी व्हॅलीनफ्रेडा हे उत्कृष्ट ठिकाण आहे. Listen to the stories, taste the flavours, meet the people हे इथले ब्रीदवाक्य आहे आणि याची प्रचीती व्हॅलीनफ्रेडाच्या भेटीत नक्कीच येते.

श्रद्धा भाटवडेकर shraddha.6886@gmail.com