‘आपले भुवन आपले नाविक’ हे शनिवारचे संपादकीय (३० एप्रिल) वाचले. त्यातील सी-डॅकच्या ‘भारत’ या संगणक संचालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) चा उल्लेख माझ्यासारख्या अल्पसंख्य भारतीय संगणक वापरकर्त्यांच्या मनात वेदनेची कळ उठवून गेला. देशप्रेमाच्या उथळ प्रतीकांचा सदोदित िडडिम पिटणाऱ्या आपल्या सर्वपक्षीय सरकारांना आरसा दाखविण्यासाठी या उल्लेखावर टिप्पणी होणे आवश्यक आहे.बॉसलिनक्स(भारत ऑपरेटिंग सिस्टिम सोल्यूशन्स) ही एक भारतीय रूपरंग असणारी स्वदेशी व संपूर्णपणे मोफत अशी ऑपरेटिंग सिस्टिम असून ती ‘डेबियन’ या जगद्विख्यात व आद्य लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे. सी-डॅकसारख्या भारतातील उच्चतम तांत्रिक संस्थेने अतिशय कौशल्याने तयार केलेली ही ऑपरेटिंग सिस्टिम सर्व सोयीसुविधांच्या बाबतीत ‘मायक्रोसॉफ्ट िवडोज्’ आणि लब्धप्रतिष्ठित ‘अ‍ॅपल ओएस एक्स (मॅक)’ ऑपरेटिंग सिस्टिम्सच्या तोडीस तोड आहे. विशेष करून या दोन्ही व्यावसायिक ऑपरेटिंग सिस्टिम्स न परवडणाऱ्या सामान्य व ग्रामीण भारतीयांसाठी तर ‘बॉसलिनक्स’ हे वरदान म्हणावे लागेल. पण आपल्याकडे संगणकाच्या शालेय पाठय़क्रमात अक्षरश: पहिलीपासून ‘िवडोज्’ एके ‘िवडोज्’च असते. केवळ िवडोजवर आधारित पाठय़पुस्तके वापरून आपल्याकडे संगणक शास्त्राचे बाळकडू पाजले जाते. त्यामुळे संगणक घ्यायचा म्हटला की त्यावर चोरीची (पायरेटेड) का असेना पण ‘िवडोज’च बसविण्याचा हट्ट धरला जातो. पसे देऊन वापराव्या लागणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम्सना त्यांच्या तोडीस तोड आणि मोफत पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत याची माहितीदेखील जनतेपर्यंत पोचू देऊ नये? हे काम शासनाने करणे अगत्याचे आहे. कारण बॉसलिनक्सला तात्त्विक आणि आíथक टेकू आहे तो साक्षात केंद्र शासनाचा! पण किती केंद्र किंवा राज्य शासकीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली बसवली जाते? सी-डॅकसारख्या आपल्याच तंत्रसंस्थेने बनविलेल्या सिस्टिम्स आपण नाही वापरणार तर कोण वापरणार? अमेरिकी जनता? एकीकडे ‘भारतमात की जय’चा शंखनाद करायचा आणि व्यवहारात ‘परदेसी, परदेसी..’ची धून वाजवायची याला काय अर्थ आहे?
– सचिन बोरकर, विरार

 

उशिरा का होईना पण उमगले..
अनिल शिदोरे यांचा ‘जलयुक्त लातूर : काही प्रश्न’ हा लेख (रविवार विशेष, १ मे) वाचला. त्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न सयुक्तिक वाटले. नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करताना ‘माथा ते पायथा’ आदी तांत्रिक बाबी सर्रास दुर्लक्षिल्या जातात. तांत्रिकदृष्टय़ा अयोग्य झालेल्या कामांचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. लेखातील ‘सरकारला जे जमले नाही..’ हा उल्लेख खटकला. कारण राज्य सरकार ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबवू पाहत असून त्यांचे प्रयत्नदेखील समाधानकारक आहेत. दुष्काळावरील उपाययोजनांसाठी सरकार आणि लोकसहभाग यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. लोकसहभागातून लातूरमध्ये भरपूर कामे झाली असून काही चालू आहेत. दुसरी एक बाब, मांजरा नदीच्या खोली-रुंदीकरणात आ. देशमुख यांनी घेतलेला सहभाग उल्लेखनीय आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत ३-४ साखर कारखाने चालवणे म्हणजे जनतेला दुष्काळातून तीव्र दुष्काळाकडे नेणे आणि मग त्यावर आपणच जनतेचे कैवारी असल्याचे दाखवून उपाययोजना करणे हे अनाकलनीय आहे. विधिमंडळात सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या आरोपामुळे की पुढील वर्षी ऊस उत्पादन कमी होईल या भीतीने, जास्त पाण्याच्या पिकांसाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य करा अशी याचिका आ. देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. विरोधी बाकावर बसल्यावर का होईना जाग आली हे बरे..
– लक्ष्मीकांत भोसीकर, नांदेड</strong>

 

‘आदर्श’चा विधायक वापर करावा
‘आदर्श’ इमारत पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असला तरी खर्च झालेल्या मनुष्य श्रमाचे मोल मोठे वाटते. कायद्याने रीतसर आणि जास्तीत जास्त जबर शिक्षा गुन्हेगारांना व्हायला पाहिजे. शिवाय त्यांच्याकडून जबरदस्त दंड वसूल करायला पाहिजे. पण इमारत पाडून काय होणार? बांधलेल्या अशा इमारतीमध्ये खूप काही करता येईल. अनेक सरकारी कार्यालयांना सध्या जागा अपुरी पडते. तेथे काही कार्यालये हलवता येतील. चांगले इस्पितळ, कॉलेज तेथे सुरू करता येईल असे वाटते. इमारत पाडून टाकण्याने नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना जरब बसेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ही इमारत पाडण्यासाठीदेखील अनेकांना प्रचंड श्रम करावे लागणार आणि त्याचे मोल शून्य असणार. निघालेला कचरा आणि डेब्रिजची बाजारात काहीच किंमत नाही. उलट तो काढण्याचा हकनाक भरुदड बसेल. पुन्हा तो कोठेही नेऊन टाकला तरी त्याचा पर्यावरणाला धोकाच आहे. असे काही विपरीत कृत्य करण्याऐवजी या इमारतीचा विधायक उपयोगच झाला पाहिजे असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.
– डॉ. मोहन देशपांडे, पुणे</strong>
वय वाढवले, जागा कधी वाढणार?
शासनाने सरकारी नोकरीसाठी वयवाढीचा निर्णय घेतला, पण नोकरभरती कपात चालू केली आहे त्याचे काय? चालू वर्षांतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमधील रिक्त जागांची ही माहिती बघा. राज्यसेवा- १०९, वनसेवा- ५५, विक्रीकर निरीक्षक- ६२, सहायक कक्ष अधिकारी- ४३ जागा भरणार आहेत. पोलीस उपनिरीक्षकपदाची दोन वर्षांपासून जाहिरात नाही. शासनाने येत्या वर्षांतील नोकरभरतीचे धोरण तात्काळ जाहीर करावे. वयोमर्यादा वाढवल्यानंतर तरी सरकार उमेदवारांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवेल का?
– सुभाष शेळके

 

पिंजऱ्यातील बहुरूपी पोपट मृतवत आहेत..
‘पिंजऱ्यातील पोपटांची पैदास’ हा मालेगाव बॉम्बस्फोटाविषयी भाष्य करणारा अग्रलेख (२७ एप्रिल) अस्वस्थ करणारा आहे. बरोबर त्याच्या आदल्या दिवशी या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयच्या संचालकांनी संसदीय समितीसमोर बोलताना जर रिक्त पदे भरली नाहीत तर सीबीआय संपूर्ण कोसळेल अशी भीती व्यक्त केली होती. हा सर्वोच्च न्यायालयाने पिंजऱ्यातील पोपट म्हटलेल्या वरील यंत्रणेच्या सध्याच्या तब्येतीचा निर्देशांक आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाच्या नंतर गेल्या जवळजवळ तीन वर्षांमध्ये आम्ही कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस, महाराष्ट्र एटीएस, मुंबई पोलीस, महाराष्ट्र सीआयडी, एनआयए आणि सीबीआय या तपास यंत्रणांचा विदारक अनुभव अत्यंत जवळून घेतला आहे. त्या अनुभवामधून अत्यंत गांभीर्याने आणि नाइलाजाने असे म्हणावेसे वाटते की, या देशात केवळ सीबीआय हाच एक पिंजऱ्यातील पोपट नसून, वर उल्लेख केलेल्या बहुतांश यंत्रणा कमीअधिक प्रमाणात तशाच आहेत.
पिंजऱ्यातील पोपटाची उपमा पुढे न्यायची असेल तर असे म्हणावे लागेल की हे काही साधेसुधे पोपट नाहीत तर हे बहुरूपी पोपट आहेत. काही वेळा, ते मालक सांगेल ते बोलतात तर काही वेळा ते स्वत:च्या जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग यांच्या सोयीचे बोलतात. आणखी काही वेळा ते मालकाच्या नावाखाली स्वत:च्या सोयीचे बोलतात तर काही वेळा मालक आणि पोपट मिळून तुम्हाला मूर्ख बनवतात. तर इतर वेळा ते , ‘तू मार मी रडतो’ असा खेळ खेळतात. आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला नक्की काय चालले आहे ते समजेपर्यंत ते रूप बदलतात. असे सारखे रूप बदलून बदलून त्यांना आता आपले खरे रूप कोणते हे कळेनासे झाले आहे का, असा गंभीर प्रश्न पडतो. या सगळ्यामध्ये केवळ खेळावर लक्ष्य केंद्रित करून त्यांनी स्वत:च्या तब्येतीची मोठी हेळसांड केली आहे. पिंजऱ्याचे दार उघडले तरी ते उडू शकतील का नाही याची खात्री नाही. पोलीस दलातील एक अतिवरिष्ठ पदावरील अधिकारी एकदा आम्हाला म्हणाले , ‘डॉ. दाभोलकरांच्या खुनाचे सोडा, आमच्या पोलीस दलातील अतिवरिष्ठ व्यक्तीला जरी काही झाले तरीही आम्ही नीट तपास करू शकू की नाही, अशी मला शंका वाटते.’ त्यामुळे या बहुरूपी पोपटाची सध्याची तब्येतपण फारशी चांगली नाही. काही अधिकारी, काही वेळा, अशा परिस्थितीतदेखील निकराने आपली मूल्ये सांभाळून यंत्रणेत किंवा यंत्रणेबाहेर राहून वर्दीची शपथ पाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात, पण यंत्रणा त्यांना शक्यतितकी हाणून पाडण्याचा प्रयत्न करते.
माझी मनापासून अशी इच्छा आहे की राज्याच्या पोलीस महासंचालकांनी किंवा गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सीबीआय किंवा एनआयएच्या प्रमुखांनी आम्हाला हे पटवून द्यावे की आमचे अनुभवाधिष्ठित निष्कर्ष चुकीचे आहेत. असे घडले तर आमच्याइतके आनंदी आम्हीच असू .पण त्यासाठी त्यांना काही प्रश्नांची उत्तरेदेखील द्यावी लागतील.
डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या वेळी पोलीस चौकीत झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई झाली? त्या वेळचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ ज्यांनी तपासात प्लान्चेटचा वापर केल्याविषयी पुरावे होते, त्यांच्यावर काही कारवाई झाली का? एकाच प्रकारचे विचार मांडणाऱ्या लोकांचे एकाच पिस्तुलातून गोळ्या घालून दिवसाढवळ्या खून होतात, त्यांच्या विचारांना हिंसक विरोध करणाऱ्या शक्ती सर्व समाजला दिसतात त्या पोलिसांना कधी दिसणार? पानसरे खून प्रकरणामध्ये समीर गायकवाडला अटक करून महिने उलटले, त्याच्या खुनाच्या कटातील सहभागाविषयी भक्कम पुरावे आहेत असे शासनाने दाखल केलेली चार्जशीट म्हणते. मग त्याचे साथीदार कुठे आहेत? त्यांनी वापरलेली गाडी, पिस्तूल हे कधी मिळणार? लोकांना उघडपणे मॉर्निग वॉक करण्याची धमकी देणाऱ्या ज्ञात आणि धमकीची पत्रे पाठवणाऱ्या अज्ञात लोकांना तुम्ही आणखी किती दिवस मोकळे सोडणार? पानसरे खून खटल्यातील विशेष तपास पथकामधील सर्व अधिकाऱ्यांवर बाकीच्या इतक्या जबाबदाऱ्या असताना ते समीर गायकवाडचा पुढे तपास कधी नेणार आणि जर तो अर्धवट तपासामुळे सुटला तर त्याची जबाबदारी कोणाची ? मडगाव बॉम्बस्फोटातील गेल्या सहा वर्षांपासून फरार आरोपी असलेल्यांची नावे या खटल्यात परत परत येतात त्यांना तुम्ही कधी पकडणार? एवढेच नाही असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत ज्याची उत्तरे त्यांना हवी आहेत. जर दाभोलकर आणि पानसरेंच्या वाटय़ाला असा तपास येत असेल तर सामान्य माणसाच्या प्रश्नांचे काय? आणखी किती दिवस येथील क्राइम रेट कमी करत असल्याचे कागदी घोडे आपण नाचवणार?
पिंजऱ्यातील पोपटाचा, दूध आणि पाणी वेगळे करण्याची क्षमता असणारा राजहंस कसा करायचा याचा शोध आपण सर्वानी मिळून घेतला पाहिजे. तूर्तास पिंजऱ्यातील बहुरूपी पोपट मृतवत आहे इतकेच.
– हमीद दाभोलकर, पुणे