lp43‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचंही खूप कौतुक झालं. आता पाच वर्षांनंतर ‘एलिझाबेथ एकादशी’ हा त्यांचा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. यानिमित्ताने अनेक मुद्दय़ांवर त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

‘‘पण, एलिझाबेथ म्हणजे काय?’’
‘‘टिकाऊ.. इंग्लंडची ती राणी खूप र्वष टिकली ना..!’’

‘‘ए गरम बांगडय़ा.. गरम बांगडय़ा..’’

‘‘मला गणितात १०० पैकी ४२ होते.’’

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

हे संवाद सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत, तर काहींच्या स्टेट्सची जागा पटकावली आहे. याचं कारण, ‘एलिझाबेथ एकादशी’ हा आगामी सिनेमा. या सिनेमाची चर्चा होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचे दिग्दर्शक परेश मोकाशी. पाच वर्षांपूर्वी प्रेक्षकांना ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा देणारे परेश मोकाशी आता पुन्हा एका नव्या विषयाचा सिनेमा घेऊन येतायत. ‘हरिश्चंद्राची..’ या लोकप्रिय सिनेमानंतर मोकाशी या नव्या सिनेमातून काय दाखवणार आहेत याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ या नावातली गंमत अजूनही उलगडली नसल्यामुळे ही उत्सुकता सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत तशीच टिकून राहील असं वाटतंय. पोस्टरवर शीर्षकासह सायकलचं चित्र, एलिझाबेथ हे नाव, प्रोमोमध्ये दाखवलेली लहानग्यांची टोळी, अशा सगळ्यामुळे सिनेमाविषयीचं कुतूहल वाढत चाललं आहे; पण दिग्दर्शक मोकाशी यांनी सिनेमाचा पडदा काहीसा उघडला आहे, असं म्हणायला हरकत नाही. ते सांगतात की, ‘‘या सिनेमाची कथा माझ्या बायकोला सुचली. तिचं माहेर पंढरपूरचं. ती नेहमी तिच्या बालपणीच्या गमतीजमती, किस्से, घटना सांगत असते. त्यातून याचा एक सिनेमा होऊ शकतो ही कल्पना पुढे आली. सिनेमा पंढरपुरातल्या एका गरीब कुटुंबात घडतो. त्यातही त्या कुटुंबातली भावंडं आणि त्यांचे मित्र यांची मुख्य कथा आहे.’’ सिनेमाच्या नावाविषयीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. एलिझाबेथ आहे सिनेमातल्या लहान मुलाची म्हणजेच ज्ञानेशच्या वडिलांनी तयार केलेली अनोखी सायकल. आपल्या वडिलांची आठवण असलेली ही सायकल ज्ञानेश आणि त्याची बहीण झेंडूचा जीव की प्राण. या एलिझाबेथला वाचवण्यासाठी ही भावंड आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने एकादशीच्या उत्सवात एक खेळ मांडतात त्याचीच कथा म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट. कोणताही सिनेमा तयार करताना आर्थिक गणितांची आखणी सर्वप्रथम होते. सिनेमाचा विषय मास अपील की क्लास अपील म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांना झेपेल की काही लोकांनाच समजेल, प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघतील का, बॉक्स ऑफिसवर किती कमाई होईल, सिनेमाचं बजेट जेवढं आहे तेवढं तरी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर कमवू का, असे नाना प्रश्न सिनेमा करणाऱ्या टीमला असतात; पण परेश यांच्यासाठी हे सगळे दुय्यम असल्याचं ते सांगतात. ‘‘बॉक्स ऑफिस हिट, फ्लॉप असा विचार करून मी सिनेमा करत नाही. अर्थात हे विचार नसतातच असंही नाही; पण माझ्यासाठी सिनेमा, त्याच्या कथेला प्राधान्य असतं. हे विचार दुसऱ्या स्थानावरचे असतात. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा करतानाही असा विचार केला नव्हता. तरी त्या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. मला वाटतं, कमर्शिअल सिनेमा करायचा असा दृष्टिकोन ठेवला, तर वेगळ्या धाटणीचे सिनेमे होऊ शकत नाहीत. अनेकदा कमर्शिअल सिनेमेही पडतातच. आर्थिक मुद्दे महत्त्वाचे असतातच; पण माझ्या लेखी तो मुख्य उद्देश नसतो.’’ परेश त्यांचा मुद्दा पटवून देत होते. अलीकडे सिनेमा ‘देखणा’ असणं फार गरजेचं मानलं जातं. हिंदीतली ही गरज आता हळूहळू मराठीकडे सरकतेय. त्यासाठी सिनेमा चकचकीत केला जातो, त्यात बडय़ा स्टार्सची हजेरी लागते. सिनेमाला मोठा स्टारडम असला, की सिनेमा हिट होतो, असं एक ढोबळ गणित असतं. मोकाशी मात्र हे नाकारतात. ‘‘सिनेमात ‘स्टार्स’ असायलाच हवेत असं नाही. उत्तम अभिनय करणारे कलाकार अशी सिनेमाची गरज असते. सिनेमाचा हिरो त्यातला नायक किंवा नायिका नसून त्याचा विषय, कथा हेही असू शकतात,’’ असं स्पष्ट मत ते व्यक्त करतात.

lp44‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाच्या प्रोमोमध्येच बालकलाकारांनी धमाल केली आहे. त्यांचा अभिनय हा अगदी नैसर्गिक वाटत असल्याच्याही प्रतिक्रिया प्रोमो बघितल्यावर अनेकांनी दिल्या. याचं एक गुपित मोकाशी यांनी सांगितलं. ‘या सिनेमातल्या बालकलाकारांना अभिनयाची पाश्र्वभूमी नाही. यापैकी फक्त मुख्य भूमिकेत असलेला श्रीरंग महाजनव्यतिरिक्त इतर सगळ्यांनी पहिल्यांदाच सिनेमात काम केलं आहे. श्रीरंगनेही याआधी एक-दोन सिनेमांमध्येच काम केलंय. त्यामुळे त्या सगळ्यांचा अभिनय हा खूप नैसर्गिक झाला आहे,’ मोकाशी सांगतात. अभिनयाची पाश्र्वभूमी नसणाऱ्या कलाकारांना घेण्याचं विशेष कारणंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘पंढरपुरातली गंमत सिनेमाच्या माध्यमातून दाखवताना तिथलीच मुलं ती उत्तम प्रकारे रंगवू शकतात. म्हणून आम्ही तिथल्याच म्हणजेच पंढरपूरच्याच मुलांना प्राधान्य द्यायचं ठरवलं. म्हणून त्यातील काही जण हे पंढरपूरचेच आहेत.’’ या सिनेमाच्या शूटच्या वेळची एक गंमतही त्यांनी सांगितली. ‘‘सिनेमात खरोखरची वारी दाखवायची होती. त्यामुळे त्याच दिवसांमध्ये शूट करणं हे आलंच. पण, इतक्या गर्दीत शूटिंग करण्याचं मोठं काम आम्ही पूर्ण केलं. गंमत अशी की वारीतल्या काही लोकांचे आम्हाला नैसर्गिक हावभाव, वारीतलं चालणं, भजन, ओव्या म्हणत पुढे जाणं हे सगळं हवं होतं. ते मिळवण्यासाठी आम्ही कँडिड कॅमेराने शूट करायचो. लोकांना कळायचंही नाही आणि आम्हाला हवे तसे शॉट्स मिळत गेले.’’

आजकाल कलाकार आणि सोशल मीडिया हे नातं अगदी घनिष्ठ झालंय. आता थेट कलाकारांकडून त्यांच्या सिनेमांचं प्रमोशन होत असतं. त्यामुळे एखाद्याने सिनेमाचा प्रोमो पाहिला नाही तरी त्याच्यापर्यंत नव्या सिनेमाची खबर पोहोचते. याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. अनेक कलाकार आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. परेश मात्र या सगळ्यापासून फार दूर आहेत. ‘मी कोणत्याही सोशल साइट्सवर नाही. माझं कुठेही अकाऊंटच नाही. प्रत्येकाचा एकेक स्वभाव असतो. मी फार गप्पिष्ट, बोलघेवडा नाही. मी मितभाषी आहे. प्रश्न राहिला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तर ते काम त्यासाठी नेमून दिलेली विशिष्ट टीम पार पाडतेच,’ असं मोकाशी बिनधास्त कबूल करतात.

सिनेमात प्रदर्शित होण्यापूर्वी तो हिट होईल की सुपरहिट की अव्हरेज जाईल याचा अंदाज बांधला जातो. तसा अंदाज या सिनेमाविषयी परेश यांनी बांधला आहे का याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘‘याबाबत मी विचार केलाच नाही असं नाही. पण, हे विचार प्राधान्याने माझ्या मनात येत नाहीत. असे विचार प्राधान्याने येऊ न देता सिनेमा करणं हे धाडस असतं. मास अपील आहे का, बॉक्स ऑफिसवर चालेल का अशी भीती, काळजी बाजूला ठेवून धाडस करायला हवं आणि हे धाडस प्रेक्षकांनी स्वीकारलं की तो आनंद वेगळा असतो.’’ मोकाशी यांचा हा मुद्दा त्यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमातून सिद्ध केलाच आहे. ‘फॅक्टरी’नंतर त्यांनी मधल्या काळात कोणताच सिनेमा का केला नाही हा प्रश्न ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाच्या निमित्ताने चर्चेत आलाय. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये त्यांच्या सिनेमाव्यतिरिक्त आणखी एका आवडीचा खुलासा होतो. ‘‘मधली काही र्वष मी माझ्या वैयक्तिक कामांमध्ये होतो. तसंच प्राचीन गोष्टींवर माझं संशोधन सुरू होतं. अजूनही सुरू आहे. मी प्राचीन ग्रंथ, उपनिषद, ऐतिहासिक वस्तू, ग्रंथांचा काळ, तो आपल्यापर्यंत कसा पोहोचला, युद्ध कशी व्हायची, नगररचना कशा झाल्या याबाबतचा वस्तुनिष्ठ अभ्यास करतोय,’’ असं ते म्हणाले. यासंबंधीच्या अभ्यासात्मक टूरलाही ते सतत जात असल्याचं सांगितलं.

सिनेक्षेत्रात आज काम आहे तर उद्या नाही. कामाची खात्री इथे नाही, असा विचार करत इंडस्ट्रीतले अनेक कलाकार आपला बॅकअप प्लॅन तयार ठेवून आहेत. बॅकअप प्लॅनबाबत मोकाशी यांची काहीशी वेगळी प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात की, ‘‘सुदैवाने माझ्यावर अजून बॅकअप प्लॅन आखण्याची वेळ आली नाही. माझ्या पहिल्या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आणि नव्या सिनेमालाही देतील. वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्ये या सिनेमांची निवड झाली आहे. मुळात इतिहास संशोधन माझं मुख्य वेड आहे. त्यामुळे यामध्ये माझा अभ्यास, काम सतत सुरू असतं. म्हणून बॅकअप प्लॅनचा विचार कधी डोकावला नाही.’’ परेश यांची सुरुवात नाटक क्षेत्रापासून झाली. गेल्या काही वर्षांत मात्र त्यांनी सिनेमाकडे आपली गाडी वळवली आहे. याबाबत ते सांगतात की, ‘‘सुरुवातीची दहा-बारा र्वष मी नाटकं केली. ते करताना ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’चा विषय सुचला. तो लिहिला. त्याचा सिनेमाही झाला. आता पुन्हा नवा सिनेमा येतोय. आता सिनेमाची लिंक लागली आहे. कधी नाटकाचा विषय सुचला तर नाटकही जरूर करेन.’’ त्यांनी काही नाटकांमध्ये अभिनयही केला आहे. पण, ते दिग्दर्शन आणि निर्मितीत जास्त रमत असल्याचं सांगतात.

नाटक असो वा सिनेमा परेश मोकाशी हे नाव म्हटलं की, काही तरी वेगळं, चांगलं असणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. ती अपेक्षा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सिनेमातून पूर्ण झाली होती. आता ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाकडूनही अशीच अपेक्षा..!