मराठी सिनेमा चकचकीत होऊ लागलाय. पण, त्याचबरोबर हे माध्यम प्रेक्षकांची स्वप्नंही पूर्ण करू लागले आहेत. प्रेक्षकांच्या आकांक्षा, इच्छा सिनेमात प्रत्यक्ष उतरल्याचा आनंद देणारे सिनेमातले लोकेशन्स त्यांच्यासाठी ‘फिल गुड फॅक्टर’ठरताहेत.

तो ऑफिसमधून कसंबसं वेळेत बाहेर पडतो. संध्याकाळचा सातचा शो गाठायचा म्हणून गर्दीतून आपली वाट काढत थिएटपर्यंत पोहोचतो. तिकीट काढलेलं असतं म्हणून जरा दिलासा पण, डोक्यातून ऑफिस आणि तिथल्या कामाची दारं काही बंद झालेली नसतात. त्याचं विचारचक्र सुरूच असतं. उन्हाळ्याच्या दिवसात धापा टाकत, घामाने चिंब भिजलेला, डोक्यात अनेक विचार असलेला तो थिएटरमध्ये त्या अंधारात त्याच्या सीटवर जाऊन बसतो. सिनेमा सुरू होण्याआधीच्या सगळ्या जाहिराती त्याच्या चिडचिडेपणात भर घालतात. ‘जरा कुठे विरंगुळा हवा म्हणून आलो आणि या अशा जाहिराती. वैताग नुस्ता.’ असं स्वत:शीच मनात बोलतो. सिनेमा सुरू होतो. सुरुवातीची पंधरा मिनिटं बौद्धिक पातळीवरचे प्रसंग असतात. अजूनही तो थोडाफार वैतागलेलाच आहे. पण, नंतर अचानक एक छान रंगबेरंगी घर येतं आणि अखेर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. याचं कारण सिनेमातलं ते ताजंतवानं करणारं घर, त्यातले रंग, त्याची मांडणी. त्याच्यासारख्याच अनेक प्रेक्षकांसाठी अशा प्रकारची घरं, ऑफिस, कॉफी हाऊस, गार्डन्स ‘फिल गुड फॅक्टर’ ठरताहेत.
आता मांडलेलं ‘त्याचं’ उदाहरण हे प्रातिनिधिक आहे. पण, प्रेक्षकांना सिनेमातून दाखवल्या जाणाऱ्या घर, ऑफिस, कॉफी हाऊस, कॉम्प्लेक्स अशा विविध गोष्टी आवडू लागतात. त्यांच्या कल्पनेतील घर त्यांना सिनेमात दिसतं. त्यांच्या मनातलं कॉफी शॉप ते सिनेमातून अनुभवतात. सिनेमा चांगला असो वा वाईट; प्रेक्षकांची स्वप्नं सिनेमांतून दाखवण्याचा चांगला प्रयत्न सिनेमाकर्ते करताना दिसताहेत. हे चित्र हिंदी सिनेमात तसं जुनं आहे. हिंदी सिनेमातली घरं चकचकीत, भव्य असतातच. काही वास्तवदर्शी सिनेमांचे अपवाद वगळता हिंदी सिनेमा प्रेक्षकांची स्वप्नं सजवून त्यांच्याच पुढे मांडण्यात माहीर आहे. इतर अनेक गोष्टींप्रमाणे या गोष्टीचीही लाट मराठीकडेही वळली. अलीकडच्या काही मराठी सिनेमांमधली घरं, ऑफिस, विविध प्रयोग केलेली ठिकाणं असं सगळं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘हॅपी जर्नी’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘टाइमप्लीज’, ‘चिंटू’ ही अशा प्रकारच्या सिनेमांची काही ठळक उदाहरणं. ‘कॉफी..’मधलं जाई किंवा निषादचं घर असो, कॉफी शॉप किंवा त्यांचं ऑफिस; प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ‘प्रेमाची गोष्ट’मधली भारतीय बैठकव्यवस्थाही लक्षात राहते. ‘हॅपी जर्नी’मधली व्हॅनची क्रिएटिव्हिटीही पसंतीस उतरली.
फँटसी नावाची संकल्पना नकळतपणे माणसामध्ये रुजत असते. ‘असं असायला हवं’, ‘तसं झालं तर किती मजा’ अशी वाक्य प्रत्येक जण त्याच्याच नकळत कित्येकदा उच्चारत असतो. मग ती फँटसी नोकरी, ऑफिस, कामाचं स्वरूप अशा कशाही संदर्भात असेल. ‘घरबसल्या काम असतं तर किती बरं झालं असतं’, ‘दहा मिनिटांवर ऑफिस असतं तर किती वेळ वाचला असता’ किंवा ‘आपल्या घरातही पुस्तकांच्या संग्रहासाठी एक छोटी खोली असायला हवी’ अशी दिवास्वप्नं अनेकांची रोजची झाली आहेत. तीच नेमकी प्रत्यक्षात उतरताना दिसतात पण, सिनेमांतून. खऱ्या आयुष्यातल्या ‘जर-तर’ च्या गोष्टी सिनेमातून अनुभवता येत असल्यामुळे प्रेक्षक खूश असतो. अशा प्रकारे सिनेमे प्रेक्षकांना ‘फिल गुड फॅक्टर’चा आनंद देताना दिसताहेत. फँटसी या विषयाचा ‘हॅपी जर्नी’ हा सिनेमा फ्रेश लुक घेऊन आला. वेगळ्या विषयाच्या या सिनेमातली लक्षात राहिली ती व्हॅन. सिनेमाचे कला दिग्दर्शक तेजस मोडक याबाबत सांगतो की, ‘सिनेमाच्या कथेत फँटसी होती. त्यामुळे पडद्यावरही ती तशी उतरवली गेली पाहिजे, हा विचार पहिल्यापासून मनात होता. त्यामुळे तशा प्रकारे त्याचं डिझाइन केलं गेलं. रोज आपण जे आयुष्य जगू शकत नाही किंवा आपल्या अवतीभवती ते घडत नाही ते अनुभवण्यासाठी प्रेक्षक सिनेमा बघतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनाचाही विचार केला जातो.’
दहा ते सहा नोकरी, रोजचा घर ते ऑफिस असा तणावपूर्ण प्रवास, आयुष्य अधिकाधिक सोयीचं करण्याची धडपड असं आयुष्य असणाऱ्या कोणाचंही घराबाबतचं एक स्वप्न असतं. काहींचं ते लवकर पूर्ण होतं, काहींसाठी थोडा वेळ लागतो तर काहींसाठी ते कठीण असतं. पण, त्यांचं हे स्वप्न सिनेमातून त्यांना दिसतं. काही वेळा घराबाबतच सर्जनशील संकल्पना सिनेमातून त्यांना मिळते. अशी स्वप्नांची देवाणघेवाण सुरू असते. थोडं मागे गेलो तर लक्षात येईल असं चकचकीत घर ‘मातीच्या चुली’ या सिनेमात दिसलं होतं. कॉम्प्लेक्समध्येच असणारं त्यांचं घर दोन बेडरूमचं. तेही तितक्याच खुबीने सजवलं होतं. त्यात दोघेही म्हणजे नवरा-बायको नोकरी करणारे होते. पण, आज दोघेही नोकरी करणारे असले तरी काही टक्के लोकांचीच अशी ऐसपैस, सजवलेली घरं दिसतात. तसं घर असावं असं स्वप्न सगळ्यांचंच असतं. पण, प्रत्यक्षात ते उतरायला अवधी असतो. म्हणूनच प्रेक्षक त्यांची स्वप्न सिनेमातून जगत असतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जान्हवी केदारे याबाबत सांगतात, ‘कोणालाही सुबत्ता, आपल्यापेक्षा आणखी चांगलं काही तरी हे बघायला आवडतंच. सुखसोयींची ओढ प्रत्येकालाच असते. आयुष्यात पुढे जाण्याची आस असणं हे प्रगतीचं लक्षण हे आहे. वन बीएचकेतून टू बीएचकेमध्ये जाण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. प्रेक्षकांचीच ही स्वप्न त्यांना पडदय़ावर दिसतात. सिनेमाचा अनुभव घेताना त्यांच्या आकांक्षा प्रत्यक्ष पडद्यावर उतरलेल्या दिसतात. सिनेमातले असे दृश्य प्रेक्षकांना आवडणं अगदी साहजिक आहे.’
लेखक म्हटला की, लांब झब्बा, झोळी, चष्मा वगैरे असं चित्र डोळ्यांपुढे येतं. त्यांच्या राहणीमानाविषयी विशिष्ट अशा काही समजुती आहेत. काही प्रमाणात त्या खऱ्याही आहेत. पण, यातही आता लाक्षणिक बदल झालेला आहे. लेखकांचं राहणीमान बदललं असलं तरी त्यांची घरं तशी साधीच असतात. त्यातही एखाद्याचं काम जोरात सुरू असेल आणि त्याचा योग्य तो मोबदला त्याला मिळत असेल तरच त्याची घराची संकल्पना बदलत जाते. या बदलणाऱ्या संकल्पनेत फार मोठय़ा गोष्टी नसतात पण, दोन बेडरूमचं घर असावं, जागा मोठी असावी वगैरे माफक अपेक्षा असतात. ‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमातला नायक लेखक दाखवला आहे. सिनेमा लक्षात राहिलाच आहे पण, त्यातलं नायकाचं घरही विसरले नाहीत. त्याच्या घरातली काम करताना खाली बसायची पद्धत, झोपाळा (बंगई म्हणुया का?) अशा प्रकारच्या घराचा समस्त लेखक मंडळींना हेवा वाटला असेल.
सिनेमात अतुल कुलकर्णीचं घर बघून आपलंही असं घर असायला हवं असं लेखकांना वाटलंच असेल. किंबहुना तसं घर असण्याचं स्वप्नं त्यांनी तो सिनेमा येण्याआधीत बघितलं असेल. मात्र ते या सिनेमाच्या माध्यमातून प्रत्यक्षात दिसलं.
‘हॅपी जर्नी’ या सिनेमातली व्हॅन लक्षवेधक ठरली. सिनेमा बघून झाल्यावर कोणालाही त्याबाबत कुतूहल वाटू शकेल. एखाद्या व्हॅनमध्ये अशा सोयी-सुविधा असणं हे वाटणंच खूप उत्साहवर्धक आहे. कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अशा प्रकारच्या सगळ्या सुखसोयी असतात. पण, एखाद्या सर्वसामान्य माणसाने अशी व्हॅन घ्यायचा विचार केला किंवा अशी सजवायचा तर त्यात गैर काहीच नाही. सामान्य माणसाचं हेच स्वप्न सिनेमात चपखलपणे उतरवलं गेलंय. ज्यांनी अशा प्रकारचा काही विचार केला नसला तरी सिनेमा बघून ‘अशी व्हॅन असेल तर मजा येईल’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. ‘सिनेमा हा भारतीयांच्या आयुष्याचाच एक भाग झालाय. ते सिनेमाचा मनमुराद आनंद घेतात. ‘हॅपी जर्नी’मधली व्हॅन बघून एखाद्याला ‘पाच वर्षांत मला अशी गाडी तयार करायची आहे’ असं वाटू शकतं. मनोरंजन, तणावापासून मुक्ती याव्यतिरिक्त प्रेक्षकांच्या मनात विचार सुरू करून देण्याचंही काम करणं महत्त्वाचं आहे’, तेजस सांगतात.
सिनेमात एक तर बंगला नाही तर चाळ अशी दोन टोकं होती. पण, आता या चित्रात बदल होताहेत. सोसायटी, कॉम्प्लेक्समधलीच घरं पण, सुटसुटीत मांडणीसह सिनेमात ती सजावटीने सादर केली जातात. या वर्गातील ‘मातीच्या चुली’, ‘टाइमप्लीज’, ‘धागेदोरे’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘लग्न पाहावं करून’ हे सिनेमे प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. या सिनेमांतली घरं कॉम्प्लेक्स, सोसायटीमधली दाखवल्यामुळे प्रेक्षकांना ती अपील होतात. मात्र सिनेमांतली घरं अधिक आकर्षक दिसतात. तशी घरं आपलीही असावी अशी सुप्त इच्छा त्या प्रेक्षकांना असते. पण, रोजच्या धकाधकीच्या जीवनात, तणावपूर्ण आयुष्यात ती पूर्ण करताना दमछाक होते. मग ती इच्छा स्वप्नात रूपांतरित होत जातं. हे स्वप्न अशा सिनेमांमध्ये बघितल्यावर प्रेक्षकांना आनंद मिळतो आणि ते त्यांच्या स्वप्नाचा अनुभव घेतात.
‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमातली सगळी ठिकाणं लक्षात राहण्यासारखी आहेत. नायक-नायिकांची घरं, त्यांच्या खोल्या, ऑफिस, कॉफी शॉप अशा मोजक्या आणि साध्या लोकेशन्सवर सिनेमाच्या टीमने चांगली क्रिएटिव्हिटी केली आहे. या सिनेमाच्या कला दिग्दर्शक पूर्वा पंडित सांगतात, ‘सिनेमातल्या मुख्य कलाकारांचे स्वभाव लक्षात घेतले. नायिकेचा, जाईचा स्वभाव विविध रंगांसारखा आहे. तर निषाद तिच्या एकदम विरुद्ध आहे. त्यामुळे तिची खोली तयार करताना विविध रंग वापरले आहेत. तर निषादच्या खोलीसाठी काही मोजकेच. त्यांच्या ऑफिसचे क्युबिकल्समधूनही त्यांचा स्वभाव डोकावतो. आमच्या टीममध्येच एकमेकांना विचारत, त्यांचा प्रेक्षक म्हणून मत घेत आम्ही सेट तयार केला.’ हा सिनेमा सुरू होतो कॉफी शॉपपासून आणि त्याचा शेवटही होतो तिथेच. सिनेमा बघताना असं कॉफी शॉपबद्दल कुतूहल निर्माण होत जातं. ‘एका हॅण्डीक्राफ्ट स्टोअरचं कॉफी हाऊसमध्ये रूपांतर केलंय. आजच्या तरुणाईला गोवन स्टाइलचे कॅफे आवडतात म्हणून त्याचा तसाच लुक तयार केला. अँटिक वाटावं यासाठी प्रयत्न केला. म्हणून त्याला फार ग्लॅमराइज केलेलं नाही,’ असं पूर्वा सांगतात. आजचा तरुणवर्ग व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यातला असला तरी सगळ्यांनाच कॉफी शॉपची पायरी चढता येतेच असं नाही. त्यामुळे ही पायरी चढण्याचं ज्याचं स्वप्न, इच्छा आहे ते या सिनेमातल्या गोवन स्टाइलच्या शॉपमध्ये जाऊन सुखावले.
स्पर्धा, आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची धडपड, नोकरी-कुटुंब दोन्ही समान लक्ष देण्याची कसरत, रोजचा प्रवास या सगळ्यामुळे लोकांमधला ताण दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या तणावाची तीव्रता वाढत असतानाच त्यांची स्वप्नं मात्र धूसर होऊ लागली आहेत. ती पूर्ण करण्याची त्यांची ओढाताणही दिसून येते. पण, जेव्हा सेव्हंटी एमएमवर ते करमणूक म्हणून सिनेमाचा पर्याय निवडतात तेव्हा मात्र त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण झाल्यासारखी वाटतात.

lp50नेत्रसुख महत्त्वाचं
सुबत्ता, प्रगती, विकास, सोयीसुविधा या सगळ्याची सर्वसामान्य माणसाला ओढ असतेच. त्यामुळे प्रेक्षकांच्या इच्छा, आकांक्षा त्यांना पडद्यावर उतरताना दिसू लागतात. त्यांच्यासाठी ते सुखकारक असते. नेत्रसुख मिळाल्याने ताणतणाव कमी करण्यास मदत होते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी नेत्रसुख महत्त्वाचं ठरतं. आपल्या आकांक्षा प्रत्यक्षात सिनेमात बघताना त्यांना आनंद होतो. ‘माझ्या स्वप्नातलं घर असं आहे’ असं त्यांना वाटू शकतं. वातावरणनिर्मितीतून माणसाला काही सुख देणं हे काही अंशी स्ट्रेसबस्टर म्हणून बरोबर आहे. पण, ताण हा केवळ वातावरणनिर्मितीतून नाहीसा होतो असं नाही. सिनेमात एक मोठं घर दाखवलं असेल पण, त्याच घरातला संघर्षही मोठा दाखवला तर ते बघून ताण कमी न होता उलट तो वाढेल. त्यामुळे केवळ वातावरणनिर्मितीतून ताण कमी होतो असं म्हणता येणार नाही. सिनेमाकर्तेही या सगळ्याचा विचार करतात. पण, त्यांचं प्राधान्य त्यांच्या टारगेट प्रेक्षकांना असतं. कथेची गरज म्हणून सिनेमाची टीम ठरावीक गोष्टी दाखवतात. तशी वातावरणनिर्मितीही करतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनाचा विचार करणं ही सिनेमाकर्त्यांची मानसिकता यातून लक्षात येते.
डॉ. जान्हवी केदारे, मानसोपचारतज्ज्ञ

lp51दृकमाध्यमाचा फायदा
ऐकल्यापेक्षा बघितल्यावर एखाद्या गोष्टीचा परिणाम होतो. दृकश्राव्य माध्यम असताना ते चांगलं झालंच पाहिजे. जेव्हा एखाद्या संकल्पनेवर सिनेमा केला जातो तेव्हा तो पडद्यावर चांगलाच दिसावा यासाठी प्रयत्न असतो. सिनेमा बघून ‘मला हे करायला आवडेल’ असा विचार प्रेक्षकांच्या मनात रुजायला हवा. हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा आकर्षक पद्धतीने ते सिनेमांतल्या दृश्यांमधून दिसेल.
– तेजस मोडक,
कला दिग्दर्शक, हॅपी जर्नी

lp52आम्हीही प्रेक्षकच
कला-दिग्दर्शन करताना प्रेक्षकांचा विचार नक्कीच केला जातो. पण, थेट प्रेक्षकांशी संवाद न साधता सिनेमाच्या टीममधल्याच सहकाऱ्यांसोबत चर्चा करायचो, एकमेकांच्या आवडीनिवडीविषयी बोलायचो. असा अभ्यास करत कला-दिग्दर्शन केलं. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आम्ही प्रेक्षकही होतो. – पूर्वा पंडित, कॉफी आणि बरंच काही.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com