यंदाची निवडणूक अनेक अर्थानी वेगळी आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर हे या निवडणुकीचं वैशिष्टय़ आहेच, पण त्याचबरोबर राजकारणाशी संबंधित नसलेल्या अनेकांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत या निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे हे या निवडणुकीचं आणखी एक वेगळेपण. ज्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नाही अशा अभिनेत्यांपासून ते डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यापर्यंत अनेकजणांनी आपल्या व्यावसायिक रुटीनमधून बाहेर येऊन आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवारासाठी वेगवेगळी कामं हातात घेतली आहेत. कोण आहेत हे लोक? आणि ते निवडणुकीच्या रणधुमाळीत का उतरले आहेत? त्यांना या कामातून नेमकं काय मिळवायचं आहे?

संघर्षांसाठी निमित्त सापडलंय..

आदिती मोहन, वय ४० वर्षे,
निवृत्त मेजर
‘आप’चे बंगलोर येथील उमेदवार
व्ही. बालकृष्णन यांच्या कॅम्पेन मॅनेजर.

व्ही. शोभा

सात वर्षांची खुशी आणि पाच वर्षांची मुस्कान या आदिती मोहन यांच्या दोन मुली. आजकाल आपली आई आपल्याला फारसा वेळ देत नाही, ती या एका अंकलबरोबर सारखी का बाहेर जाते, या प्रश्नाने गोंधळलेल्या आहेत. त्यांना गोंधळात टाकणारा, त्यांच्या आईचा खूप वेळ खाणारा अंकल म्हणजे इन्फोसिसचे माजी सीईओ व्ही. बालकृष्णन. आम आदमी पार्टीचे बंगलोर सेंट्रल या मतदारसंघाचे उमेदवार. आदिती मोहन त्यांच्या कॅम्पेन मॅनेजर आहेत.
चाळीस वर्षांच्या आदिती मोहन लष्करात मेजर होत्या. त्यांनी तिथून निवृत्ती घेतली आहे. त्या खूप वक्तशीर आहेत. उत्साही आहेत. प्रचारादरम्यान आपचा झाडू हातात घेऊन त्या रस्त्यावर नाचायला सुरुवात करतात आणि प्रचाराचा सगळा मूडच पालटून टाकतात. आदिती खूपच ऑर्गनाइज्ड आणि कमिटेड आहे. तिच्यामुळे आमच्या प्रचाराला खूप चांगला वेग आलाय, बालकृष्णन सांगतात. त्यांच्या टीममध्ये आदितीबरोबर एक तमिळ तरुण आहे, एक लखनवी तरुणी आहे. ‘आम आदमी चुनिये, सही आदमी चुनिये’ असं ती प्रचारादरम्यान लखनवी लहेजाच्या हिंदीमध्ये सांगते. आदिती मोहन यांना बंगलोरमध्ये येऊन आठ वर्षे झालीत. त्यांना अजून नीट कन्नड येत नाही. पण त्याचा प्रचारादरम्यान फारसा फरक पडत नाही असं आदिती मोहन यांचं म्हणणं आहे. ‘तुम्ही लोकांना नीट मान द्या, अदबीने बोला, अदबीने वागा, ते तुम्हाला समजून घेतात. मग तुमची भाषा कोणती आहे, यामुळे काही बिघडत नाही, असं आदिती मोहन यांचं म्हणणं आहे.
आम आदमी पार्टीची भूमिका त्यांना पटते. ‘‘आमची चळवळ हा दुसरा स्वातंत्र्यलढाच आहे. पण तो अंतर्गत, छुप्या शत्रूशी आहे. आमच्यासारखे सामान्य लोक या लढय़ात सहभागी झाले आहेत.’’ आदिती मोहन सांगतात. बंगलोरच्या या जागेवरून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती, पण मिळाली नाही तेव्हा त्यांनी सोडून दिलं. त्यांला रायबरेलीमधून प्रचारमोहीम चालवण्याची इच्छा होती, पण पक्षाने त्यांना बंगलोरमधून बालकृष्णन यांची प्रचारमोहीम चालवायला सांगितली. ‘‘राजकारणात उतरायची माझी पुरेशी तयारी झाली आहे की नाही ते मला माहीत नाही. बालकृष्णन आणि इतर काहीजण मला पुढच्या वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभं राहायचा आग्रह करताहेत.’’ आदिती सांगतात. ‘‘पुढचं पुढे बघू. सध्या तरी मी बालकृष्णन यांच्या प्रचारमोहिमेवर सगळं लक्ष केंद्रित केलंय. त्यांना आमच्यासारख्या लोकांची गरज आहे आणि लोकांना त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे.’’
नेतृत्व करणं, लढायची तयारी करणं हे आदिती यांच्या रक्तातच आहे. त्या लष्करी पाश्र्वभूमी असलेल्या घरात वाढल्या. लष्करी अधिकाऱ्याशीच त्यांनी लग्न केलं. लष्करात नोकरी केली. तिथे काही वर्षे काढल्यावर त्या कॉपरेरेट क्षेत्रात गेल्या. त्यांनी जीई, अ‍ॅक्सेंटर, टिस्को या मोठय़ा कंपन्यांबरोबर प्रशासकीय पातळीवर काम केलं. आता त्यांना मुलींसाठी वेळ द्यायचाय. त्या म्हणतात, ‘‘मुळात मी एक सैनिक असल्यामुळे मी फार काळ घरात बसून राहू शकत नाही. आम आदमी पार्टीच्या रूपात मला संघर्ष करण्यासाठीचं एक निमित्त सापडलंय आणि म्हणून मी इथे आहे.’’

वकिली पेशातून रणधुमाळीत

अमन पवार, वय २५ वर्षे,
दिल्ली उच्च न्यायालयात वकील.
काँग्रेसचे नवी दिल्ली येथील उमेदवार
अजय माकन यांचे सोशल मीडिया मॅनेजर.

रूही बसीन

दिल्लीत ग्रेटर कैलासच्या पूर्व भागाजवळच्या गर्ही चौपाल इथं उत्सवी वातावरण आहे. सगळ्या घरांवर काँग्रेसचे झेंडे फडकताहेत. लोक घोळक्या घोळक्याने जमून अजय माकन यांनी वाट बघताहेत. ते येतात तेव्हा नगारा वाजतो. त्यांच्यावर फुलं उधळली जातात. त्यांना फेटा बांधला जातो. त्यांच्या मागे एक पंचविशीचा तरुण आहे. त्याचं नाव आहे, अमन पवार. तो माकन यांचं सोशल मीडिया कॅम्पेन सांभाळतो. माकन यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून तो प्रत्येक ठिकाणी सावलीसारखा त्यांच्याबरोबर आहे. तो जणू त्यांचे कान आणि डोळे झाला आहे.
अमन गेलं वर्ष संपेपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. आणि आता एकदम तो माकन यांचा सोशल मीडिया मॅनेजर झाला आहे. हे कसं घडलं? अमन सांगतो, ‘‘मी युवा काँग्रेसचा सदस्य आहेच. माकनजी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते तेव्हापासून मी त्यांच्याशी जोडला गेलो होतो. त्यामुळे आता मी त्यांच्या सोशल मीडिया टीमचा भाग झालो आहे. मी आमच्या मतदारसंघातल्या लोकांना कायद्याच्या मदतीची तातडीची गरज असते तीपण देतो, त्यामुळे मी माझ्या मूळच्या क्षेत्राशीही जोडला गेलो आहे.
अमन पवार माकन यांचं फक्त सोशल मीडियाचं कॅम्पेनच बघत नाही तर पदयात्रा, माकन यांचं ऑफिस हेही पाहतो. दुपारच्या वेळेपर्यंत पत्रकं काढणं, ती माध्यमांना पाठवणं हे काम तो पाहतो तर दुपारनंतर प्रचार मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या समन्वयाचं काम पाहतो. त्याने सात कम्युनिटी रिपोर्टर्स तसंच युवा काँग्रेसचे सदस्य असलेल्या काही कॉलेज तरुणांना घेऊन छोटे छोटे व्हिडीओ बनवले आहेत. ते व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तसंच प्रचार करणाऱ्या वाहनांवर लावले आहेत. या छोटय़ा छोटय़ा व्हिडीओमध्ये माकन यांचं काम चित्रित केलं आहे. माकन यांनी आणलेली तरुण अ‍ॅथलेटस्साठीची ‘या आणि खेळा’ ही योजना, गॅस पाइपलाइन योजना यांची माहिती त्यात आहे.
माकन यांची वेबसाइट रिडिझाइन करायला आम्ही भरपूर संशोधन केलं. अमन सांगतो, ‘‘सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलं जाणं आता अनिवार्य आहे. व्यक्त होणं, तरुणांबरोबर कल्पनांची देवाणघेवाण, यासाठी हे महत्त्वाचं माध्यम आहे. माझी मीडिया टीम खूप छान पद्धतीने काम करते आहे.’’
पंचविशीचा अमन रोज माकन यांच्याबरोबर प्रचारासाठी पंधरा ते अठरा किलोमीटर चालतो. तो सांगतो, ‘‘आराम करायला थोडाही वेळ मिळत नाही. प्रचार संपवून रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही ऑफिसला पोहोचतो. पण त्यानंतर मग दुसऱ्या दिवसाचं नियोजन करायचं असतं. या कामात कमालीच्या शिस्तीची, लक्ष केंद्रित करण्याची, गांभीर्याची गरज असते. कुणाकुणाच्या वाढदिवसासारख्या घरातल्या अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण हा काय जेमतेम महिनाभराचा तर प्रश्न आहे.’’ असं असलं तरी निवडणुका संपल्यानंतर आपण काय करणार ते माहीत नाही हेसुद्धा तो सांगून मोकळा होतो.

अ‍ॅक्टिंग ते राजकारण..

सहदेव सलारिया,
मॉडेल आणि अ‍ॅक्टर
भाजपच्या चंदिगढ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार किरण खेर यांचा कॅम्पेन मॅनेजर.

चितलीन के सेठी

दाढी-मिशा आणि गॉगलने त्याचा देखणा चेहरा झाकून गेला आहे. त्याच्या कपाळावर लाल रंगाचा तिलक लावलेला असतो. पांढरा कुर्ता- पायजमा आणि त्यावर जॅकेट हा त्याचा पेहराव असतो. ‘हॅपी गो लकी’ हा त्याचा पहिला पंजाबी सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. असा हा सहदेव सलारिया, बावीस वर्षांचा मॉडेल कम अभिनेता चंदिगढमधल्या दादू माजरा नावाच्या गावात काय करतोय? तो भाजपच्या इथल्या उमेदवार किरण खेर यांचा प्रचार साहाय्यक आहे.
शहरातल्या पक्षकार्यकर्त्यांना वाटत होतं की इथल्या तीनपैकी एका नेत्याला तिकीट मिळेल. पण किरणजींची निवड झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सहदेव सांगतो, ‘‘मीही एक अभिनेता आहे, त्यामुळे आमचे दोघांचे सूर चांगले जुळले.’’
‘‘मतदारसंघात किरण खेर यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून आणि अंडी फेकून झालं. आम्हाला तो धक्काच होता. पण किरणजी फारच धाडसी आहेत. त्यांनी ते सगळं उमदेपणानं घेतलं आणि त्या म्हणाल्या की इथल्या प्रत्येकाशी बोलणार.’’ सहदेव सांगतो.
सहदेवने बॅरी जोन्स अ‍ॅक्टिंग स्कूलमधून डिप्लोमा केला आहे. तो वर्षभरापूर्वीपर्यंत मुंबईमध्ये मॉडेलिंग करत होता. हातात कामं असतानाही त्याने परत यायचा निर्णय घेतला. ‘‘मी पठाणकोटचा आहे आणि माझे वडील बराच काळ संघाचं काम करत होते. कुटुंबाबरोबर राहायचं म्हणून मी चंदिगढला परत आलो. इथे आल्यावर मी एक फिल्मही केली.’’ तो सांगतो.
अभिनय आणि राजकारण परस्परपूरक आहे, असं सहदेव सांगतो. त्याच्या प्रचारमोहिमेला सेलिब्रिटी स्टेट्स असल्यामुळे लोक खूश आहेत असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा सिनेमा यायचा असला तरी किरण खेर यांच्याबरोबर प्रचारात सहभागी झाल्यामुळे तो या मतदारसंघात आधीच हीट झाला आहे. चंदिगढमधल्या खेडय़ात प्रचारासाठी फिरताना तो किरण खेर यांची काळजी घेतो. कुणी त्यांच्या फार जवळ येऊन त्यांना त्रास देणार नाही हे पाहतो. माध्यमांकडून येणारे प्रश्न, त्यांचे संदर्भ किरण खेर यांना समजावून सांगतो. कोणत्याही अवघड प्रसंगातून त्यांना सहीसलामत बाहेर काढतो.
मोहीमप्रमुख बनणं हे तसं अवघड काम आहे. सहदेव सहा वाजता उठतो आणि सात वाजता किरण खेर यांच्या घरी पोहोचतो. दिवसभराचा सगळा कार्यक्रम आखलेला असतो. लोकांबरोबर मीटिंगज् असतात. रॅली असतात, रोड शो असतात. निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा दिवसभरातला काही मिनिटांचा विश्रांतीचा वेळही कमी होत चालला आहे. ‘‘किरणजींबरोबर काम करायला मलाही आवडतं आहे. त्यांचे स्टारझमचे नखरे नसतात.’’ असं सहदेव सांगतो.

बँकर ते पक्ष कार्यकर्ती

मनीषा लथ गुप्ता,
अ‍ॅक्सिस बँकेच्या निवृत्त अतिरिक्त उपाध्यक्ष
आपच्या निधी संकलक

पार्थ सारथी बिस्वास

आम आदमी पार्टीच्या पुंजीची काळजी करतच मनीषा लथ गुप्ताचा दिवस सुरू होतो. अ‍ॅक्सिस बँकेची ही निवृत्त अतिरिक्त उपाध्यक्ष (मार्केटिंग, इलेक्ट्रॉनिक बँकिंग आणि रिटेल लायबिलिटीज) आम आदमी पार्टीसाठी निधी संकलन करते आहे, त्यासाठी ऑनलाइन कॅम्पेन चालवते आहे आणि हे सगळं ती करते ते गांधी टोपी घालून. ‘कॉपरेरेट क्षेत्रात तुम्ही सोन्याच्या पिंजऱ्यात वावरत असता. पण अनेक प्रस्थापितांना अंगावर घेऊन वादळ निर्माण करणाऱ्या पक्षाचे निधी संकलक म्हणून काम करताना तुम्हाला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं’ त्या सांगतात.
बँकेच्या क्षेत्रातल्या वरच्या वर्तुळातून एका पक्षाच्या निधी संकलक बनणं हा मनीषा गुप्ता यांचा प्रवास त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, सहकाऱ्यांना अचंबित करणारा ठरला. ‘नोकरी सोडण्याचा माझा निर्णय मी जाहीर केला तेव्हा काहीजणांनी मला पाठिंबा दिला. पण बऱ्याच जणांनी प्रतिक्रियाच दिली नाही. मी नंतर त्यांना आपची निधी संकलक म्हणून भेटले तेव्हाची गोष्ट तर एकदम वेगळीच होती.’ मनीषा लथ गुप्ता सांगतात. आयआयएमच्या पदवीधर असलेल्या मनीषा मूळच्या मुंबईच्या. त्या निधी संकलनाबरोबरच त्या उत्तर-पूर्व मुंबईच्या आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांचा प्रचारही करत आहेत.
मनीषा गुप्ता यांनी राजकारणात पूर्ण वेळ सक्रिय व्हायचं असं ठरवलं. कारण त्यांना असं वाटतं की, २०१४ च्या या सार्वत्रिक निवडणुका देशाच्या इतिहासात टर्निग पॉइंट ठरणार आहेत. ‘मला माझ्या नवऱ्याने पूर्ण पाठिंबा दिला. सुरुवातीला माझी मुलं थोडी नाखूष होती. कारण त्यांना त्यांच्या आईच्या कापरेरेट स्टेट्सचा फार अभिमान वाटत होता. त्या सांगतात. पण आता आपला मिळणारा तरुणांचा पाठिंबा बघून त्यांची मुलंही त्यांना सांगतात, ‘‘ममी यू आर कूल.’’
देशातल्या सगळ्यात मोठय़ा कॉपरेरेट कंपनीच्या नेतृत्वाला शिंगावर घेणाऱ्या आणि खूपच नव्या अशा राजकीय पक्षाच्या निधी संकलकाचं काम अर्थातच अवघड असणार. ‘‘कॉपरेरेट क्षेत्रात मूलभूत तत्त्वं खूप महत्त्वाची असतात. तशीच ती सरकारमध्येही असावीत असा आमचा आग्रह आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कुणालाही कॉपरेरेट क्षेत्रात नोकरी मिळणार नाही तर मग अशा घटकांना आपण आपल्यावर राज्य तरी का करून द्यायचं?’’ मनीषा विचारतात.
मनीषा लथ गुप्ता पक्षाचं ऑनलाइन कॅम्पेन चालवतात आणि निधी संकलनासाठी नेटवरून उच्चस्तरीय लोकांचा समन्वय करतात. निधी संकलन करताना त्यांना एकीकडे श्रीमंत कुटुंबांकडून थंड प्रतिसाद मिळाला आहे तर दुसरीकडे गरीब कुटुंबं आपला एक दिवसाचा पगार द्यायला स्वत:हून पुढे आली आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र आणि हरियाणामधल्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांना कामाला लागायचं आहे.

अमेरिकेतून थेट अमेठीत

ा प्रदीप सुंदरियाल, झेनसर टेक्नॉलॉजीज्चे निवृत्त वरिष्ठ संचालक आणि उपाध्यक्ष.
अमेठी मतदारसंघातील आपचे उमेदवार कुमार विश्वास यांचे कॅम्पेन मॅनेजर.

हमझा खान

अमेरिकास्थित झेनसर टेक्नॉलॉजीज् या आयटी सेवा देणाऱ्या कंपनीचे वरिष्ठ संचालक आणि उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा देऊन प्रदीप सुंदरियाल आले आणि आपच्या मदतीला लागले याला जवळ जवळ दोन महिने झाले. आपला आयटी क्षेत्रातला अनुभव ते आपचं अमेठीतलं कमांड सेंटर चालवण्यासाठी कामी लावत आहेत. ते माहिती गोळा करणं, ती हाताळणं, कार्यकर्त्यांना कामं ठरवून देणं, निवडणूक आयोगासारख्या यंत्रणेशी संवाद साधणं, आपच्या राज्य तसंच देश पातळीवरील टीमशी समन्वय, तसंच आर्थिक आणि कायदेशीर गोष्टींवर लक्ष ठेवणं ही कामं करतात. सुंदरियाल ही सगळी कामं लीलया पार पाडतात. ते उत्तराखंडमधल्या गढवालचे. पौरी हे त्यांचं गाव. जिथे शाळेत टेबल-खुच्र्याही नव्हत्या अशा शाळेत ते शिकले. ते थेट सनफ्रॅन्सिस्कोच्या बे एरियात जवळ जवळ दशकभर राहिले आणि आता ते अमेठीत आले आहेत.
पक्षाच्या कार्यालयात ते जीन्स आणि टी-शर्टवर बसलेले असतात आणि त्यांचं या सगळ्या वातावरणाशी कसं नातं आहे हे अमेरिकन धाटणीच्या इंग्रजीमध्ये सांगतात. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपच्या प्रचारात मदत केली होती. ते ज्या भागात प्रचार करत त्या पटेल नगरमधल्या स्त्रिया पाणी भरण्यासाठी पहाटे साडेतीन वाजता उठत. ‘तर गढवालमध्ये पाणी आणण्यासाठी काही किलोमीटर तेही डोंगर चढत उतरत जावं लागतं. त्यामुळे तिथे तर आंघोळ करणं ही चैनच असायची.’
त्यांचे वडील उत्तर प्रदेशात इलेक्ट्रिसिटी बोर्डात काम करत होते तर आई शिक्षिका होती. आता ते मुरादाबादमध्ये राहतात. अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दिल्लीत सुरू झालं तेव्हा ते त्यात सहभागी झाले होते. दिल्लीतील निवडणुकांसाठी ते तीन आठवडय़ांची सुट्टी घेऊन आले. २००६ मध्ये त्यांची एका मित्राच्या माध्यमातून कुमार विश्वास यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये कुमार विश्वास यांना भेटले. कुमार विश्वास यांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतून प्रचारासाठीची आमंत्रणं होती. त्यांना माध्यमांकडूनही सतत बोलावणं येत होतं. त्यांना मदतीला कुणीतरी हवं होतं. आपण ‘आप’साठी काहीतरी काम करू इच्छितो असं सुंदरियाल यांनी कुमार विश्वास यांना सांगितलं. सामान्य माणूस मूलभूत गरजांसाठी झगडतो आहे हे बघून त्यांना काहीतरी करावं असं वाटलं.
‘आप’ने दिल्लीत २८ जागा जिंकल्या, त्यानंतर ते अमेरिकेत परतलेच नाहीत. त्यानंतर अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये अनेकांना रस वाटायला लागला. ‘एका अमेरिकी रेडिओ स्टेशनच्या आरजेने मला विचारलं की, तुम्ही वेळ आली तर मातृभूमीची निवड कराल की कर्मभूमीची? मी म्हटलं की, दोन्ही एकत्रच असेल तर अधिक चांगलं.’ सुंदरियाल सांगतात. या दोन्हीसाठी एकत्र काम करायची संधी त्यांना या जानेवारीत मिळाली. कुमार विश्वास यांनी राहुल गांधींविरोधात अमेठीतून उभं राहायचं ठरवलं तेव्हा पक्षाला पुन्हा सुंदरियाल यांची गरज निर्माण झाली. ‘‘मी माझ्या पत्नीशी चर्चा केली. मला असं वाटत होतं की मी अमेठीत असायला हवं. कुमार विश्वास यांच्यासाठी नाही तर देशासाठी. आणि यावेळी मला सबॅटिकल मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी नोकरी सोडली आणि आलो.’’ सुंदरियाल सांगतात.
पाच दिवसांचा आठवडा, दोन दिवसांची सुट्टी असं काम करणाऱ्या सुंदरियाल यांनी अमेठीच्या रणसंग्रामात उडी घेतली. आता त्यांचा प्रत्येकच दिवस धावपळीचा असतो. त्यांचं काम सकाळी सातला सुरू होतं आणि मध्यरात्रीनंतरही ते कम्प्युटरसमोरच असतात. त्यांची पत्नी आणि लहान मूल अमेरिकेतच आहे. ‘‘अरविंद केजरीवाल आणि ‘आप’मुळे माझ्यासारखा माणूस राजकारणात येऊ शकला. एरवी गुंड, पैसेवाले किंवा राजकारणी यांनीच राजकारणात यायचं अशी परिस्थिती होती.’’ ते सांगतात.
मेच्या शेवटच्या आठवडय़ात ते अमेरिकेला परतणार आहेत. त्यानंतर ते भविष्यात काय करायचं याचा विचार करणार आहेत.

मुख्यमंत्री आणि मुस्लिमांमधला दुवा

इम्रान इद्रिस, डॉक्टर
समाजवादी पार्टीच्या बदौन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धर्मेद्र यादव यांचे कॅम्पेन मॅनेजर.

फैजल फरीद

सकाळी सहाचा गजर होतो आणि डॉ. इम्रान इद्रिस घाईघाईने उठून समाजवादी पार्टीच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरच्या छोटय़ाशा खोलीत उठून आवरायला लागतात. त्यांची ही गडबड कुठल्या इमर्जन्सीसाठी नसते तर एखाद्या राजकीय मीटिंगसाठी असते. कानपूरचे हे अ‍ॅनेस्थेशिस्ट डॉक्टर समाजवादी पार्टीच्या धर्मेद्र यादव यांच्या प्रचारासाठी गेले पंधरा दिवस बदौनमध्ये मुक्काम ठोकून आहेत. धर्मेद्र यादव हे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत आणि त्यांना पुन्हा तिकीट मिळालंय. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नातेवाईकही आहेत.
सौम्य स्वभावाच्या, बत्तीस वर्षीय डॉक्टर इद्रिस यांनी लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केलं. कानपूरच्या राज्य सरकारी कॉलेजमधून त्यांनी आपलं अ‍ॅनेस्थेशियामधलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. २००८ मध्ये त्यांची अखिलेश यादवशी भेट झाली, तोपर्यंत त्यांना राजकारणाचा गंध नव्हता आणि राजकारणात जायची इच्छा पण नव्हती. ‘‘मी सैफेईच्या रुरल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल कॉलेजचा इंटर्न होतो. अखिलेश खासदार होते. ते त्यांच्या वडिलांना घेऊन आले होते. मुलायम यांचं बोट तुटलं होतं.’’ इद्रिस सांगतात. तेव्हा ते मुलायम यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये होते. त्यानंतरही ते अखिलेश यांच्या संपर्कात राहिले.
वर्षभरापूर्वी अखिलेश यांनी त्यांची मदत मागितली. बदौनमधून खासदार म्हणून निवडून येऊनही धर्मेद्र यादव यांना मुस्लिमांचा म्हणावा तसा पाठिंबा मिळत नव्हता. एवढंच नाही तर त्यांच्या मतदारसंघातून तीन विधानसभेच्या जागा हातातून गेल्या होत्या. त्यामुळे बदौनमधून २०१४ ची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी यादव पितापुत्रांनी डॉ. इद्रिस यांची मदत मागितली होती. त्यांनी मुस्लिमांमध्ये जाऊन प्रचार करायचा होता. ‘खरं तर हे आश्चर्यजनकच होतं. कारण एरवी समाजवादी पार्टी हा पक्ष मुस्लीमधार्जिणा मानला जातो आणि बदौनमध्ये मात्र मुस्लीम इतरांना मतं देत होते’ इद्रिस सांगतात. त्यांनी काय करायचं हे त्यांना स्पष्टपणे माहीत होतं. मुस्लिमांकडे जाऊन समाजवादी पार्टीसाठी म्हणजेच धर्मेद्र यादव यांच्यासाठी मतं मागायची.. काही आठवडय़ातच मुस्लीमबहुल विभागांमध्ये लोक इद्रिस यांना ओळखायला लागले. अनौपचारिक बैठकांच्या माध्यमातून त्यांनी धर्मेद्र यादव आणि मतदारांमधले पूल सांधायला सुरुवात केली. ‘‘मुस्लिमांना त्यांच्या मुलांच्या भवितव्याची खूप काळजी वाटते. मी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमात सामावून घ्यायचा प्रयत्न केला’’ डॉ. इद्रिस सांगतात.
समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या या डॉक्टरला आपल्यात सामावून घेतलं. ‘‘इम्रानसारखे डॉक्टर पक्षात असले पाहिजेत. ते चांगले शिकलेले आहेत. त्यांचं लोकांशी बोलणं फार प्रभावी आहे.’’ पक्षाचे जनरल सेक्रेटरी यासिन उस्मान सांगतात.
इद्रिस यांचा समाजवादी पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाशीही चांगला संवाद निर्माण झाला आहे. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. लोकांना ते त्यांच्या आयुष्याबद्दल, मुलांबद्दल, मुलांच्या शिक्षणाबद्दल विचारतात. इतरही प्रश्नांची चर्चा करतात. ‘‘त्यांच्यातले बहुतेक जण फारसे शिकलेले नाहीत. मी डॉक्टर आहे, राजकारणी नाही हे ऐकल्यावर त्यांना माझा अभिमान वाटतो.’’ इद्रिस सांगतात.
महिनाभराच्या सुट्टीनंतर डॉ. इद्रिस परत आपल्या कामावर रुजू होतील. त्यांचं परत पहिल्यासारखं आयुष्य सुरू होईल. पण या कामामुळे त्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा अजिबात जाग्या झालेल्या नाहीत. ‘‘अखिलेश यादव यांच्याशी असलेले संबंध एवढंच माझं राजकारणाशी नातं आहे.’’ ते सहजपणे सांगून जातात.
(‘एक्स्प्रेस आय’मधून)