शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरणाऱ्या मोकाट डुकरांमुळे शहरात स्वाइन फ्लूने थमान घातले असून बालाजी वार्डातील गोपाल चौधरी (५५) यांच्या रूपाने स्वाइन फ्लूच्या पाचव्या बळीची नोंद घेण्यात आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनपा आयुक्तांनी शहरातील मुख्य चौकात मोकाट डुकरांच्या तक्रारी करण्याचे जाहीर आवाहन केले असले तरी डुकरे पकडण्याची मोहीम थंडावल्याने आजार बळावला आहे.
विदर्भात नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने थमान घातले असून सर्वाधिक पाच बळींची नोंद या जिल्ह्यात घेण्यात आलेली आहे. गेल्या आठवडय़ात घुग्घुस पोलीस ठाण्यातील अशोक मुणके (५२) या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी, फेब्रुवारीत  सावली येथील शिक्षक संतोष पगडपल्लीवार (४२) व देवराव येलमुले (४२) या दोघांचा मृत्यू, तर राजुरा येथे एक जण दगावला होता. स्वाइन फ्लूच्या भीतीने ब्रह्मपुरी शासकीय तंत्रनिकेतनमधील हजारावर विद्यार्थी वसतीगृहातून निघून गेले होते. ही पाश्र्वभूमी असताना जिल्हा आरोग्य विभाग व महापालिका, नगर पालिका व ग्राम पंचायतींनी स्वच्छतेसंदर्भात विशेष काळजी घेण्याची गरज होती. मात्र, सावली व ब्रम्हपुरी या दोन ठिकाणी आरोग्य शिबिर लावून प्रत्येक रुग्णांची तपासणी करण्यात आली, पण त्यापुढे आरोग्य विभागाने काहीही केले नाही. त्याचा परिणाम शहरातील सर्व ३३ प्रभागातील गल्लीबोळात डुक्कर मोकाट फिरत आहेत. डुकरांमुळे स्वाइन फ्लू बळावला असून येथील बालाजी वार्डातील गोपाल चौधरी यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. चौधरी यांना ७ मार्चला एका खासगी रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मुनघाटे यांच्याशी संपर्क साधला असता मृत्यू झाल्याची माहिती दिली. चौधरी यांचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचीही आरोग्य तपासणी केली जाईल, अशीही माहिती दिली. दरम्यान, स्वाइन फ्लूचा पाचवा बळी गेला तरी महापालिकेचे आयुक्तांचे डुक्कर भगाओ अभियान थंडावले आहे. स्वाइन फ्लू हा आजार डुकरांमुळे होतो. त्यामुळे शहरातील डुकरे बाहेर हाकला, असे आदेश जिल्हा प्रशासनाने मनपाला दिलेले आहेत. याचे पालन करताना मनपाच्या स्वच्छता विभागाने डुकरांचे पालन पोषण करणाऱ्या शहरातील १५ जणांना नोटीस बजावली होती. मात्र, याचे पुढे काय झाले, हे मनपा अधिकाऱ्यांनी बघितलेच नाही. परिणामत: शहरातील प्रत्येक उकिरडय़ांवर, तसेच कचरा कुंडीवर डुकरांच्या झुंडीच्या झुंडी बघायला मिळत आहेत.
मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी  रोगराई पसरू नये म्हणून डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी मनपाने पथक गठीत केलेले नाही, तसेच शहरात डुकर पकडताना मनपाचे सफाई कर्मचारी दिसत नाहीत. त्यामुळेच शहरात डुकरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. आज ठक्कर कॉलनी, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर, बालाजी वार्ड, रहमतनगर या भागात डुकरांचे बरेच प्रस्थ आहे. तेव्हा मनपाने डुक्कर भगाओ अभियान राबवावे व आरोग्य विभागाने प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिर सुरू करून स्वाइन फ्लू तपासणी सुरू करावी, अशीही मागणी आहे.