आशुतोष, त्याची बायको, मुले, सारे नटूनथटून हजर झाले, तर आशा आणि तिचा नवरा आणि त्यांची मुलेही अत्यंत झकपक पोशाखात समारंभासाठी आली. वारकऱ्याला बिचाऱ्याला सकाळपासूनच्या धावपळीत स्वत:कडे पाहायला वेळच मिळाला नव्हता. त्याला त्याच्या गबाळ्या कपडय़ांवरून भावंडांनी फैलावर घेतले. ‘चारचौघांत लाज घालवू नकोस आमची, काल आम्ही आणून दिलेले कपडे घालून ये’ म्हणून फर्मावले..
पर्वतेआजींना तीन मुलं, दोन मुलगे आणि एक मुलगी. मोठा आशुतोष, मुलगी आशा आणि वारकरी. वारकरी हे त्याचं अर्थातच ठेवलेलं नाव. खरं नाव श्रीपाद. आशुतोष आणि आशा अतिशय बुद्धिमान, पण श्रीपाद मात्र कसाबसा ऑक्टोबर-मार्च करत मॅट्रिक झाला म्हणून पर्वते कुटुंबीयांनी त्याचं नाव ठेवलं ‘वारकरी’! पण वागण्या-बोलण्यातही तो अगदी वारकरीच होता.
आशुतोष शहरातील नामांकित सर्जन, तर आशाचा नवरा मोठय़ा कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर. ही दोन्ही मुले बुद्धिमान होती, परंतु पैशाची अत्यंत लोभी. त्याची खंत पर्वतेआजींना नेहमी वाटे. आशुतोष व आशा शहरातच, पण दुसरीकडे आपल्या कुटुंबीयांसह राहात होते. लोकांना दिसेल इतपत आजींची काळजी घेत होते.
पर्वतेकाकांच्या निधनानंतर घरात आता पर्वतेआजी आणि श्रीपाद म्हणजेच वारकरी, दोघेच. पर्वते आजोबांच्या प्रदीर्घ आजारपणात आणि नंतर पर्वतेआजींना वारकऱ्याचाच आधार होता. घरातील जबाबदाऱ्यांसह त्याने आजूबाजूच्या परिसरांतील सात-आठ देवळांमध्ये पुजारी म्हणून काम स्वीकारले होते. आजूबाजूच्या नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये त्याला चांगला मान होता. लोक त्याला आपणहून सन्मानाने दक्षिणेच्या रूपात पैशांची मदत करत. सोसायटीतील लोकांचा तर तो गळ्यातला ताईत होता. कुठल्याही कामाला तो नाही म्हणत नसे आणि कोणाकडूनही कसली अपेक्षाही करत नसे. तरीही त्याला काहीही कमी पडत नसे. गेल्या काही वर्षांतील अनुभवावरून पर्वतेआजींना मनोमन जाणवायला लागले होते, ज्याला आपण कुचकामी ठरविले होते तोच मुलगा आज आपल्या वृद्धापकाळी मोठा आधार ठरला आणि ज्यांच्या हुशारीबद्दल आपल्याला फार कौतुक होते ती आपलीच मुले स्वार्थी निघाली.
त्या दिवशी पर्वतेआजींचा ७५ वा वाढदिवस होता. आशुतोष आणि आशूने वारकऱ्याला सर्व सूचना देऊन सर्व तयारी करून ठेवायला सांगितले होते. दुपारपासून घर सजावट करणारे, बाहेर ऑर्डर देऊन मागवलेले खाद्यपदार्थ आणि खाण्यापिण्याची व्यवस्था पाहाणारे कॅटरर, सगळ्यांना एकटा वारकरी तोंड देत होता, त्यांना सर्व मदत करत होता, येणाऱ्या फोनना उत्तरे देत होता आणि मुख्य म्हणजे आपल्याकडून कुठलीही आर्थिक चूक होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होता, कारण एका रुपयाची चूकदेखील त्याला महागात पडली असती. त्याला भावंडांची बोलणी खावी लागली असती, तो लबाड ठरला असता.
आशुतोष, त्याची बायको, मुले, सारे नटूनथटून हजर झाले, तर इकडे आशा आणि तिचा नवरा आणि त्यांची मुलेही अत्यंत झकपक पोशाखात समारंभासाठी आली. वारकऱ्याला बिचाऱ्याला सकाळपासूनच्या धावपळीत स्वत:कडे पाहायला वेळच मिळाला नव्हता. त्याला त्याच्या गबाळ्या कपडय़ांवरून भावंडांनी फैलावर घेतले. ‘चारचौघात लाज घालवू नकोस आमची, काल आम्ही आणून दिलेले कपडे घालून ये’ म्हणून फर्मावले. आशुतोष आणि आशाने आईसाठी महागडी इम्पोर्टेड आरामखुर्ची आणली होती. फ्लोरिस्टकडून सजवूनही घेतली होती, सोबत आईसाठी भरजरी साडी. एखाद्या सिनेमात दाखवावे तसे आशुतोष आणि आशूने दोन्ही बाजूंना धरून आईला सन्मानपूर्वक चालवत आणली आणि त्या सजविलेल्या खुर्चीत अलगद बसवली. वारकरी मात्र पाहुण्यांची सरबराई करण्यात गुंतला होता. थोडय़ा वेळाने ७५ चा आकडय़ाच्या रूपातील छान केक कापण्याचा कार्यक्रम झाला. आईला आशुतोष, आशा आणि नातवंडांनी केक भरवला. त्यांचे हसतमुख चेहऱ्याचे किती तरी फोटो काढण्याचा सोहळा पार पडला. नंतर कधी तरी वारकऱ्याची सर्वाना आठवण झाली. आजींनी वारकऱ्याला हाक मारली. गर्दीतून कशीबशी वाट काढत वारकरी आईजवळ आला आणि त्याने आईला केक भरवला. आईच्या चेहऱ्यावर त्या वेळी आनंदाचे भाव होते. त्यांचाही एक फोटो काढला गेला आणि पर्वतेआजीने सर्वाच्या देखत वारकऱ्याच्या हातात एक लखोटा ठेवला, त्यात पर्वतेआजींनी आपली राहती जागा आणि बँकेतील शिल्लक वारकऱ्याच्या नावावर केल्याचे मृत्युपत्र होते. वारकऱ्याने तो लखोटा पर्वतेआजोबांच्या फोटोसमोर ठेवला आणि आपल्या कामात गुंतला. इकडे आशुतोषला आणि आशाला त्यांच्यावर आईने मोठा अन्याय केल्यासारखे जिव्हारी लागले. त्यांनी चडफडत तेथून काढता पाय घेतला. घरी गेल्या गेल्या आशुतोष आणि आशाने एकमेकांना फोन करून कायदेशीर मार्गाने आईने केलेल्या अन्यायाला उत्तर कसे देता येईल यावर खल केला. दोघांनी आई-वडिलांसाठी आत्तापर्यंत काय काय खर्च केला त्याचा तपशील असणारी कागदपत्रे नीट जपून ठेवली होती.
वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडल्यावर जो तो आपापल्या घरी निघून गेला होता. वारकऱ्याने एकटय़ाने सर्व आवराआवर केली. आईची रात्रीची सर्व औषधे दिली. त्याही दिवसभराच्या दगदगीने थकून गेल्या होत्या. पडल्या पडल्या त्यांना गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशी वारकरी नेहमीप्रमाणे पहाटे उठून देवळातील पूजा वगैरे उरकून सकाळी ८ वाजता घरी आला. त्याला जाणवले, आई उठलेली नाही. त्याने आईला हळूच हाक मारली, प्रतिसाद शून्य. शेवटी त्याने हात हलवून जागे करावे म्हणून पाहिले तर आईचा हात निर्जीवपणे खाली पडला. त्याला काही तरी विपरीत आहे इतकेच जाणवले. त्याने समोरच्या अण्णांना हाक मारली, त्यांना आजी गेल्याचे जाणवले. त्यांनी वारकऱ्याकडून आशुतोषचा नंबर मागून घेतला. त्याला फोन करून कल्पना दिली. आशुतोषने अण्णांना सांगितले, मी ताबडतोब येतो. तुम्ही कोणालाही आधी फोन करू नका, आशालाही नको. थोडय़ाच वेळात आशुतोष बायकोसह हजर झाला. तो स्वत:च डॉक्टर असल्यामुळे त्याला काय ते कळून चुकले. त्यांनी पाहिले काल आईने वारकऱ्याला दिलेला लखोटा तेथेच पडून होता. त्यांनी तो चटकन उचलून आपल्या बायकोच्या स्वाधीन केला आणि त्यांनी नंतर ही घटना सर्वाना कळविली. वारकऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्णपणे अनाथ झाल्याची त्याला जाणीव झाली. मोठय़ा मंडळींनी त्याला समजावला, धीर दिला. काळजावर दगड ठेवून त्याने पुढचे सर्व कार्य पार पाडले.  
दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लवकर येऊन आशुतोषने प्रथम कपाटाच्या चाव्या ताब्यात घेतल्या. आजींनी आपल्या दिवसवाराच्या खर्चाची तजवीज आधीच करून ठेवली होती. नवव्या दिवशी सकाळी आशुतोषच्या बायकोने वारकऱ्याला फोन करून सांगितले की, अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आशुतोषला शहराबाहेर जावे लागल्याने दहाव्याच्या पिंडदानाच्या कार्याला तो येऊ शकणार नाही.
त्या रात्री उशिरा टीव्हीवर सर्व वृत्तवाहिन्यांवरून बातमी झळकली, ‘शहरातील नामांकित सर्जन डॉ. आशुतोष पर्वते यांना बेकायदा किडनी विक्री प्रकरणात अटक’. वारकऱ्याला जो तो त्या बातमीसंबंधी विचारत होता. आकाशाकडे बघत वारकरी इतकेच म्हणाला, ‘‘तो सर्व पाहतो आहे.’’
 दोन दिवसांनंतर दामले वकील दोन लखोटे घेऊन घरी आले. एका लखोटय़ात पर्वतेआजींनी फ्लॅटची मालकी श्रीपादला  देण्यासंबंधीची पूर्ण केलेली कायदेशीर कागदपत्रे होती आणि एकात दामलेंच्या मुलीसाठी घातलेली मागणी होती. त्यांची मुलगीही फार शिकली नव्हती, परंतु समजूतदार, काटकसरी आणि परोपकारीदेखील. वारकऱ्याची पत्नी शोभेल अशीच. पर्वतेआजींच्या इच्छेनुसार वारकऱ्याचे भविष्य आता मार्गी लागले होते.