नामदेव माळी यांची ‘छावणी’ ही ग्रामवास्तवाचे विदारक, पण ठाम चित्रण करणारी कादंबरी आहे. दुष्काळ महाराष्ट्राला नवा नाही. त्यात दरवेळी शेतीची आणि शेतकऱ्याची त्याच्या जनावरांसकट जी पडझड होत lok20असते ती विलक्षण दयनीय असते. या ‘छावणी’त गणपा नावाच्या कुणब्याच्या आत्महत्येच्या बातमीने उठलेला गदारोळ आणि त्यानिमित्ताने पुढे आलेले इथल्या गरीब माणसांचे, हिकमती धूर्त राजकारण्यांचे, डुखधऱ्या सावकारांचे, जगण्याचे कसलेच गांभीर्य नसलेल्या टग्यांचे आणि बेमौत मरून जाणाऱ्या माणसांचे आणि जनावरांचे नवेच जग आपल्यासमोर उलगडत जाते. गणपासारखा कुणबी मोठय़ा आशेने बाग लावतो, त्यापायी कर्ज काढतो, पण पाऊस दगा देतो. सावकारी कर्ज घेऊन टँकरने पाणी आणूनही एकीकडे बाग मरून जाते आणि दुसरीकडे त्याची आशाही. रंगातात्या नावाच्या पतसंस्थेच्या आडून खाजगी सावकारी करणाऱ्या माणसाच्या कर्जात गणपा बुडून जातो. दारची जनावरे, भंगारात बागेचे मांडव विकून पसे चुकते करतो. पण सावकारी हिशोब काही वेगळाच असतो. लोकांना अडचणीत पकडून त्यांच्या जमिनी लिहून घेऊन त्यांना देशोधडीस लावणारा तात्यासारखा माणूस गणपाच्या मरणावर टपून बसतो.
इथे दोन प्रकारचे रोग दिसतात. एक म्हणजे पिकावर येणारे पण किमती औषधे फवारूनही नष्ट न होणारे आणि दुसरे म्हणजे गावातल्या आपल्याच नेहमीच्याच माणसांना संपविणारे डावपेचाचे क्रूर रोग. गणपा म्हणतो, ‘‘गरिबीचा रोग आलाय. दांडगी लागण. सगळी गरीबं मारा. बागंवर फवारल्यागत फवारा अवशिद गरिबावर.’’ लेखकाने हत्तीची दंतकथा, धनगराने घातलेला हुमान, दिनकरच्या आईने सांगितलेल्या गोष्टी यांच्या आधारे कथानकाला गती दिली आहे.
दुष्काळाची नवी देणगी म्हणजेच जनावरांची ‘छावणी’. एकाच गावातले हे दुसरे नवे जग असते. गावापेक्षा इथे चतन्य अधिक तशा भानगडीही अधिक. तिथले सारे काळेबेरे व्यवहार चालविणारे, आमदारांच्या सावलीत राहणारे नागूजी, सयाजी यांच्यासारखी करामती माणसे गावात सरपंचाला चिकटून राहिलेली असतात. तपासणीच्या साहेबाला खूश करून छावणीतल्या शेणासकट सारे खाऊन टाकणारी ही माजोरी माणसे. छावणीच्या निमित्ताने गावावरून ओवाळून टाकलेली, सदैव भानगडी करणारी आणि नव्या भानगडीच्या मागावर राहणारी कफल्लक असलेली तरुण पोरांची ‘किलतान गँग’.. आधी नवऱ्यानं टाकलेली मग आईबापानं सोडून दिलेली तरुण वयाची राधी एका पाडीला घेऊन छावणीत सयाजीच्या आश्रयाला येते. त्याच्यावर जीव लावते आणि एक नवी कहाणी जन्माला येते. मजबुरी आणि तारुण्य यांच्या कोंडीत ती सापडते. पाडीला जगवणे आवश्यक असते म्हणून सयाजीलाही सांभाळावे लागते असा दुहेरी पेच दुष्काळाने तिच्यासाठी उभा केलेला आहे. भानासारखा चळवळ्या तरुण मोच्रे काढून, मेखमारो आंदोलन करून गावातल्या लोकांना दुष्काळात काम मिळवून देतो. त्यासाठी विरोधही पत्करतो, पण हा एकमेव आशेचा किरण असतो. जिथे सगळीकडूनच भ्रष्टाचाराची चटक लागलेल्या लोकांची झुंड टपून असते, तिथे एकटा भानातरी काय करणार? गावातले कत्रेपण ज्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले असते ते बाबुराव पाटीलही घरातल्या आणि गावातल्या संघर्षांने हळूहळू अस्वस्थ होत जातात आणि मग अबोल होऊन गजासोबत कोरडय़ा विहिरीच्या कडेला पडून राहतात. एके काळी कामाचा म्हणून प्रसिद्ध असलेला गजा दुष्काळाच्या तडाख्याने मोडून पडला आहे. कुणाचा तरी झेंडा हातात घेऊन तो सतत फक्त एवढचं बरळत असतो की, ‘पाणी पाहिजे गावाला, पाणी पाहिजे’.
गावाची वाताहत व्हायला अनेक घटक कारणीभूत आहेत. पण माणसांची बदललेली नियत हा सगळ्यात मोठा परिणामकारक घटक आहे. घर सारवायला शेणसुद्धा चोरून न्यावे लागते आणि समजा ही चोरी पकडलीच तर भलतीच नाचक्की होते. ऊसाच्या कांडक्यांनी जनावरांची तोंडे सोलून निघाली आहेत. पायाच्या नख्या वाढल्या आहेत, त्या नासल्या आहेत. ती आजारी पडली तरी ना डॉक्टर वेळेवर येतो ना औषधपाणी होते. बरीच जनावरे मरतात, पण बोगस जनावरांची संख्या दाखवून नोंदीचे मस्टर मात्र फुगतच राहते. पाणी बघायला मिळत नाही म्हणून माणसे कृत्रिम पावसाची वाट पाहतात. तो एकदा येतोही पण येऊन आणखीनच रोगराई सुरू होते आणि तो आला नसता तरी चालले असते असे वाटून जाते.
या कादंबरीचे मोठे बलस्थान म्हणजे तिची भाषा. लेखकाने अनेक वष्रे मेहनत घेऊन ‘छावणी’ची उभारणी केलेली आहे. विशेषत: यातल्या हौसामावशीसारख्या स्त्रियांची भाषा अविस्मरणीय आहे. बाईवर होणारा अन्याय भयानक असतो, पण त्याची साधी दखलसुद्धा कुणी घेत नाही. मोर्चामध्ये पुरुषांच्या बरोबरीने आपल्या जनावरांना घेऊन जाणाऱ्या बायका जन्मभर दु:ख सोसत राहतात आणि सोसणे हेच तिचे मोठेपण आहे हे ऐकत राहतात. हौसामावशीचा मुलगा धाब्यावरच्या दारूच्या बाटल्या चोरून आपल्या घरात लपवून ठेवतो हे लक्षात येताच दिनकरची आई आपल्या एकुलत्या एका मुलाला गावाबाहेर काढते. त्याला मामाकडे पाठवते. म्हणते, ‘‘बाळा, गरीब होऊन जग. पोटात भुकेपेक्षा दोन जादा भाकरी खपत्यात पण पायात दसुडी खपत नाही.’’ असे सांगून मोठय़ाच्या नादी लागायचं नाही हे सांगते. याच आईची कड घेऊन लेखक म्हणतो, ‘‘अशा आया हायत्या म्हणून आमचा देश अजून माणसात हाय. या दुष्काळात काष्टा घालून ती भांगलायला गेली. काष्टा घातलेली, हातात खुरपं घेतलेली आय लय साजरी दिसते. विधानसभेसमोर अशा आईचा पुतळा उभा कराया पाहिजे. मग या पुढाऱ्यास्नी जरा आठवण येईल आईची.’’
दुष्काळाचा फायदा घेऊन आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या खेळ्या करणारे आमदार, त्यांची तळी उचलणारे हस्तक, त्यांच्या एकमेकांतील कुरघोडय़ा पाहिल्या की मन विषण्ण होते. प्रत्येक गांजलेला माणूस हाच इथल्या शिकाऱ्यांचे सावज आहे. छावणी कुणाला चालवायला द्यायची इथपासून ते बोगस जनावरे, त्यांचा चारा कसा पचवायचा हा भ्रष्टाचार करण्यात सराईत असणारी यंत्रणा कादंबरीभर राजरोस वावरते. पाण्याविना सगळा गाव ठप्प झालेला. माणसे नुसतीच जिवंत आहेत. प्रत्येकजण श्वास राखण्याचा प्रयत्न करतो आहे. सुभाना, भरमाप्पा, गजा, बाबुराव पाटील, सयाजी, नागुजी, दिनकर, भाना, बाळू आणि इतर सारे पुरुष वेगवेगळ्या कारणाने लक्षात राहतात. सावित्री, हौसामावशी, राधी, शेवंता अशा कितीतरी बायका रोज मरत असतात.
इथे दु:ख आहे ते गणपाच्या आत्महत्येचे. त्याने ठरवून, गावभर फिरून ‘माझ्या घराकडे ध्यान ठेवा’ असे सांगून सारे घर, शिवार, गाव एकदा पाहून फार क्लेशाने बायकापोरांचा निरोप घेणारा गणपा हा सावकारी कर्जाच्या धसक्याने मरून मोकळा होतो. त्याचे मरणे मनाला जखम करणारे आहे आणि व्यवस्थेविषयी अपरंपार चीड आणणारे आहे. त्याच्या मरणाचेही शेवटी सरपंच, रंगातात्या, नागुजी राजकारणच करतात. पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करतात आणि स्वत:ची मान सोडवून घेतात. जिवंतपणी न्याय मिळालाच नाही आणि मेल्यावरही नाही याची चीड येऊन भाना विरोध करतो, पण गावापुढे त्याचे काही चालत नाही. हे वास्तवाचे दर्शन प्रखरपणाने कादंबरीकार घडवितो. गणपाचे मरण आणि छावणीतील एखाद्या जनावराचे मरण यात काहीच फरक नाही. थोडी हळहळ, थोडे उसासे एवढेच. त्याहून मोठा ओरखडा उठत नाही. मरणाऱ्यांच्या यादीत एक नाव समाविष्ट केले जाते एवढेच.
मुक्या जनावरांना आणि असहाय झालेल्या गावकऱ्यांना वेठीला धरून पसे कमावणारे हीन वृत्तीचे लोक याच गावातील आहेत. लेखक सुचवतो की, यांचा वेगळा इतिहास कुणीतरी लिहिला पाहिजे.
तसे तर कादंबरीमध्ये प्रदेशनिष्ठ इतिहास असतोच. कादंबरीच्या शेवटी कुणबीपणाचे वंशसातत्य टिकले पाहिजे हे पाटील बोलून दाखवितात. कुणब्याची जात संकटातूनच उभी राहते. मातीत गाडून घेते, उगवते. ती मातीला विसरत नाही, बिमोड होऊ देत नाही. हे सुचवत सुचवत ही कादंबरी पुन्हा पावसाची वाट पाहत असते. कधीतरी ही पिडा संपेल आणि बळीचे राज्य येईल या एकाच आशेवर.
ही कादंबरी ग्रामजीवनाचे भान आणून देणारी आहे.
‘छावणी’ – नामदेव माळी, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे – २००, मूल्य – २३० रुपये.    

Dr Amol Kolhe on Ajit Pawar karyasamrat
‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला