ज्येष्ठ नाटककार, गूढकथाकार रत्नाकर मतकरी यांनी १७ नोव्हेंबर रोजी अमृतमहोत्सवी वर्षांत पर्दापण केलं आहे. त्यानिमित्तानं काल त्यांचं ‘रंग-रूप’ हे १०१वं पुस्तक प्रकाशित झालं. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित भाग..
आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं पाहण्याचा आनंद विलक्षण असतो! मला हा आनंद शंभरहून अधिक वेळा मिळाला. कारण १०० मूळ पुस्तकांच्या यादीमधल्या संग्रहातल्या कथांची आणि ललित लेखांची पुर्नसकलनंही झाली. शिवाय वेगळ्या प्रकाशकांनी मूळ पुस्तकांच्या नव्या रूपातल्या नव्या आवृत्त्याही काढल्या. म्हणजे एकूण पुस्तकं १०० पेक्षाही कितीतरी अधिक झाली. मात्र हा आनंद केवळ मुखपृष्ठावर आपलं नाव पाहण्याचा नव्हता. बऱ्याच पुस्तकांमागे हे पुस्तक निघालं नाही तर यातला मजकूर केवळ दिवाळी अंकांमध्ये पडून राहील, कालांतरानं कुणालाच उपलब्ध होणार नाही, ही काळजी होतीच. कथा, एकांकिका, लेख हे कधीही हाती लागावेत यासाठी संग्रहित होण्याची फार गरज असते. नाटकाचे प्रयोग थांबले तरी साहित्य म्हणून ते टिकून राहावं यासाठी ते पुस्तकरूपानं प्रकाशित व्हावं लागतं. नंतर प्रयोग करणाऱ्यांसाठीही ते उपयोगी ठरतं. मात्र माझी रंगभूमीवर अनेक प्रयोग झालेली नाटकं, एकांकिका आणि लेख यांचे संग्रह, असा सुमारे ४० पुस्तकांचा ऐवज अजूनही अप्रकाशित आहे.
माझं पहिलं पुस्तक ‘मधुमंजिरी’, ५९ साली मुंबई मराठी साहित्य संघानं रंगभूमीवर आणलेलं नाटक. काही महिनेच आधी दिवंगत झालेल्या माझ्या बहिणीच्या स्मृतीसाठी ‘कुमुद प्रकाशन’तर्फे मी ते काढलं. त्या वेळी मी बी.ए.(अर्थशास्त्र)नंतर बी.कॉम. करीत होतो, म्हणून आईकडून पैसे घेऊन मी ते पुस्तक काढलं. (पुढे अर्थात नोकरीला लागल्यानंतर मी तिचे पैसे परत केले. फक्त २० वर्षांचा असताना केलेला हा उद्योग मी पुढे चालू ठेवला असता, तर मराठी साहित्याला एक प्रकाशक मिळाला असता आणि एक लेखक वजा झाला असता.)
त्याच वर्षी, म्हणजे ५९ मध्ये दादरच्या महाराष्ट्र नाटय़कलोपासक मंडळानं माझं ‘वाऱ्यावरचा मुशाफिर’ हे नाटक सादर केलं आणि संस्थाप्रमुख बाळासाहेब ठकार यांच्या ‘ठकार आणि कंपनी’नं ते पुस्तकरूपानं प्रकाशित केलं. म्हणजे माझ्याशिवाय दुसऱ्या प्रकाशकानं प्रकाशित केलेलं ते माझं पहिलं पुस्तक! ..तोवर माझ्या एकांकिका आकाशवाणीवर आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. त्यांना कारण झालेल्या दोन व्यक्तींचा उल्लेख इथं कृतज्ञतापूर्वक करायला हवा. एक, १७व्या वर्षी, १९५५ मध्ये माझी पहिली एकांकिका ‘वेडी माणसं’, तिच्यात कसलाही बदल न करता लगेच ध्वनिक्षेपित करणारे, वर ‘आमच्यासाठी सातत्यानं लिही’ असं प्रोत्साहन देणारे, ऑल इंडिया रेडिओचे नाटय़विभागप्रमुख ल. ग. भागवत आणि दुसरे, माझं लिखाण मागवून घेऊन, त्यात एका अक्षराचाही बदल न करता किंवा एका शब्दाचाही सल्ला न देता, ‘शर्वरी’पासून सुरुवात करून, पुढे माझ्या एकांकिका लगोलग छापणारे ‘वसुधा’ मासिकाचे संपादक आणि थोर नाटककार विजय तेंडुलकर. यथावकाश श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनीही ‘सत्यकथा’, ‘मौज’मध्ये माझ्या एकांकिका प्रकाशित केल्या. या सर्वानी एका विशीच्या आतल्या तरुणात जो होतकरू लेखक पाहिला, त्यासाठी त्यांचे आभार मानावेत, तेवढे थोडेच आहेत.
एके दिवशी माझ्या घरी एक मध्यमवयीन गृहस्थ आले. हे होते, गिरगाव प्रार्थना समाज नाक्यावरच्या ‘रामकृष्ण बुक डेपो’चे वि. र. बाम. त्यांना माझ्या एकांकिकांचा संग्रह काढायचा होता. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ प्रकाशकानं एका पोरसवदा लेखकाक डे स्वत: जाऊन असा प्रस्ताव द्यावा, यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसतो. लवकरच त्यांनी ‘रत्नाकर मतकरी यांच्या सात एकांकिका’ अशा संपूर्ण नावाची, पुठ्ठा बांधणीची संग्राह्य़ आवृत्ती आणि सुटय़ा सात एकांकिका प्रकाशित केल्या. वि. र. बाम आज हयात नाहीत, पण मी त्यांना कधीच विसरणं शक्य नाही.
रामदास भटकळ हा एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दोन र्वष माझ्या पुढे होता. एकदा त्याला विषमज्वर झाल्याचं कळलं म्हणून मी ‘आनंदाश्रम’ या त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो. तेव्हा तो ‘पॉप्युलर’सारख्या नामवंत प्रकाशनाचा मराठी विभाग चालवतोय, हे माझ्या लक्षातच नव्हतं. बाम माझ्या एकांकिकांचा संग्रह काढताहेत, असं बोलण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, ‘मी असताना तुझा संग्रह बाहेरचं कोणीतरी..’ त्यावर मी त्यालाही सहा एकांकिका संग्रह काढण्यासाठी दिल्या. ‘मातीची खेळणी’ हा संग्रह त्यानं प्रकाशित करून त्याची पहिली प्रत मला माझ्या लग्नात भेट म्हणून दिली. ही गोष्ट ६२च्या दसऱ्याची.
त्यानंतर आजपर्यंत रामदासनं माझं एकांकिकासंग्रह, नाटकं, मुलांसाठी नाटकं, गीतसंग्रह असं पुष्कळ साहित्य प्रकाशित केलं. ‘पॉप्युलर’नं काढलेल्या पुस्तकांना एक विशिष्ट साहित्यिक दर्जा असणार, हे वाचकांनी गृहीतच धरलेलं होतं. लेखक म्हणून मला, रामदासच्या साहित्यप्रेमाचा, उच्च अभिरूचीचा, चोखंदळपणाचा, नवीन काही करून पाहण्यातल्या उत्साहाचा आणि मेहनती स्वभावाचा खूपच फायदा झाला. त्यानं माझी मुलांची नाटकं सचित्र प्रकाशित केली.
६५ नंतर मी एकांकिकांबरोबरच गूढकथा लिहायला लागलो. पहिली गूढकथा ‘खेकडा’ ही ‘हंस’कडे पाठवली. गूढकथा या साहित्यप्रकाराचा बिलकुल अभ्यास न करता त्याला सरसकट दुय्यम ठरवण्याच्या शिष्ट आणि कोत्या साहित्यिक वातावरणात ‘हंस’चे व्यासंगी संपादक अनंत अंतरकर यांचा प्रतिसाद अतिशय भिन्न आणि उत्साहवर्धक होता. ‘तुम्हाला एक वेगळा फॉर्म सापडला आहे; तो मराठी वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही सातत्यानं लिहिलं पाहिजे. आमच्याकडे दरमहा न जमल्यास निदान महिनाआड तरी एक गूढकथा पाठवत जा,’ या त्यांच्या उत्तेजनाचा मान राखून मी खरोखरच सातत्यानं ‘हंस’मध्ये लिहिलं. दिवाळीत ‘हंस’साठी ते एकांकिका मागून घेत आणि कथा ‘नवल’मध्ये छापत. मात्र ती ‘नवल’च्या पठडीतली- अनुवादित नाही, साठी सुरुवातीला दुपानी रंगीत चित्रासह छापत.
अनंत अंतरकरांनंतर त्यांचे चिरंजीव आनंद यांनीही काही काळ हा प्रघात चालू ठेवला. विशेष म्हणजे, ‘विश्वमोहिनी प्रकाशन’ सुरू करून, जी अनेक पुस्तकं काढली, त्यात जवळजवळ वर्षांला एक याप्रमाणे माझे कथासंग्रह काढले. मराठी साहित्यात गूढकथा रुजवण्याचं श्रेय नि:संशय अंतरकर पिता-पुत्रांनाच द्यायला हवं.
याच सुमारास राजा फडणीस यांनी आपल्या ‘श्री विशाखा प्रकाशन’ आणि नंतर ‘जोसेफ प्रकाशन’तर्फे माझे कथासंग्रह, एकांकिकासंग्रह, नाटकं आणि बालनाटिकासंग्रह प्रकाशित केले. राजाभाऊ फडणीसांना मी प्रत्यक्ष पाहिलेलंही नाही, पण कित्येक र्वष त्यांचा-माझा पुस्तक-व्यवहार प्रतिभा(माझी पत्नी)च्या माध्यमातून सुरळीत चालू होता. अलीकडे माझ्या ‘निखारे’ या अनुवादित नाटकाचे काही व्यावसायिक प्रयोग झाले. मुळात राज्य नाटय़स्पर्धेत सादर झालेल्या या नाटकाच्या पुसटशा टंकलिखित छायाप्रतीवरून ‘निखारे’ राजाभाऊंनी काढलं नसतं, तर आज त्याची ही नवी व्यावसायिक निर्मिती करणं शक्यच झालं नसतं.
नंतरच्या काळात माझा केशवराव कोठावळे यांच्या मॅजेस्टिक प्रकाशनाशी संबंध आला. ‘मॅजेस्टिक’ने माझे एकांकिका संग्रह, मुलांची नाटकं आणि कितीतरी व्यावसायिक-प्रायोगिक नाटकं प्रकाशित केली. केशवरावांच्या व्यावसायिकतेबरोबरच त्यांच्या सौहार्दाचाही वारसा त्यांचे चिरंजीव अशोक यांनी घेतला आहे. माझ्या अनेक नाटकांची पुस्तकं आणि गूढकथासंग्रह अशोकने काढले. माझ्या आगामी ‘इंदिरा’ या नाटकाचंही प्रकाशन तेच करताहेत. आशयानुसार पुस्तकाचा आकार, त्यांची मांडणी व सजावट, त्यासाठी निवडलेले चित्रकार या सर्वच गोष्टीत त्यांनी स्वातंत्र्य दिलं, वर त्यासाठी शक्य ती मदत करून पुस्तकं उत्कृष्ट होतील, असं पाहिलं. कुठलाही दुराग्रह किंवा पूर्वग्रह न ठेवता आणि हस्तक्षेपही न करता. नव्या आणि वेगळ्या संकल्पनांना सामोरं जाताना, फार मोठे प्रकाशक असा मोकळेपणा दाखवू शकतील!
काही वर्षांपूर्वी संपादक निखिल वागळे याने ‘अक्षर’ दिवाळी अंकासाठी साहित्य मागितलं. मी माझ्या डोक्यातली ‘अ‍ॅडम’ची रूपरेखा त्याला सांगताच त्यानं ती कादंबरी दिवाळी अंकासाठी तर ‘बुक’ करून टाकलीच; वर लवकरच सुरू होऊ घातलेल्या ‘अक्षर’ प्रकाशनातर्फे ती आम्हीच काढू, असं बजावलं. या कादंबरीपाठोपाठ माझी आणखीही काही पुस्तकं ‘अक्षर’नं देखण्या स्वरूपात काढली.
पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या सुनील मेहतांचे आभार अशासाठी मानायला हवेत, की त्यांनी मध्यंतरी वीसहून अधिक र्वष बाजारातून गायब झालेल्या, माझ्या गूढकथासंग्रहांच्या नव्यानं आवृत्त्या काढून, तरुण पिढीपर्यंत माझ्या गूढकथा पोहोचवल्या. विशेष म्हणजे, जी ‘अ‍ॅडम’ बाजारात मिळत नाही अशी रसिक वाचकांची वर्षांनुर्वष  तक्रार होती, तिची त्यांनी नवीन आवृत्ती काढली आणि ती सर्वाना उपलब्ध करून दिली.
याशिवाय सुनील मेहतांनी माझी ‘तन-मन’, ‘जादू तेरी नजर’ ही नाटकं प्रकाशित केली, तेव्हा मला साहजिकच त्यांचे वडील- कोल्हापूरच्या ‘अजब पुस्तकालया’चे अनिल मेहता यांची आठवण झाली. कारण अंतरकर, कोठावळे यांच्याप्रमाणेच त्यांनीही माझी ‘दुमंत्र’, ‘जोडीदार’ ही महत्त्वाची नाटकं प्रकाशित केली आहेत.
आता आजच्या कार्यक्रमाचे यजमान प्रकाशक ‘नवचैतन्य’चे शरद मराठे. माझी लेखक म्हणून झाली त्याहीपेक्षा त्यांची प्रकाशक म्हणून अधिक पुस्तकं झाली, तीदेखील ‘महिंद्र अँड महिंद्र’मधली नोकरी सोडून प्रकाशनाकडे बऱ्याच उशिरा वळल्यानंतर. विविध विषयांवरची आकर्षक पुस्तकं काढणं आणि ती स्वत: गावोगाव जाऊन खपवणं, हे त्यांना आर्थिक आणि शारीरिकदृष्टय़ा कसं परवडतं कोण जाणे! त्यांनी माझी अनेक पुस्तकं तर काढलीच आहेत; त्यांच्या आवृत्त्याही काढल्या आहेत; मात्र त्यांचा-माझा स्नेह असा आहे की, त्यांनी  स्वीकारलेलं पुस्तक बाजारात कधी येणार, असं मी त्यांना केव्हाच विचारत नाही. काही महिन्यांनी ते स्वत:च कावरेबावरे होऊन मला त्या पुस्तकाची शेवटची प्रुफं पाहण्याची घाई करू लागतात. ते आणि त्यांचे सहकारी चित्रकार सतीश भावसार ही अशी एक विलक्षण दुक्कल आहे, की ते दोघे कधी आरामात असतात आणि कधी घाईत, हे कुणीच सांगू शकणार नाही!
नवचैतन्य, पॉप्युलर, मॅजेस्टिक, मेहता, अक्षर, विश्वमोहिनी, श्री विशाखा अशा माझी अनेक पुस्तकं काढणाऱ्या प्रस्थापित प्रकाशनांबरोबरच, ज्यांनी माझी एक-दोनच पुस्तकं काढली आहेत, त्यांच्याविषयीही मी कृतज्ञ आहे; कारण माझ्या साहित्याचा १० टक्के भाग तरी त्यांनीच प्रकाशित केला आहे.  ‘सहज’, ‘रंगत’, ‘गोंदण’, ‘कायमचे प्रश्न’ ही सारी पुस्तकं वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात लिहिणारा, सामाजिक बांधीलकी मानणारा लेखक या माझ्या प्रतिमेत भर घालणारी आहेत.
माझी मुलांची नाटकं, नाटिका आणि प्रौढांच्या एकांकिका या वाचकांना उपलब्ध कशा होतील, याची मला नेहमीच काळजी वाटते. ती बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम काही नवोदित प्रकाशकांनी केलं. सुनाद प्रकाशन, दिनपुष्प प्रकाशन, परेश एजन्सी, पंडित प्रकाशन, नंदादीप प्रकाशन यांनी ते संग्रह वाचकांची सोय करून टाकली.
माझ्या या १०० पुस्तकांमागे, निर्णय घेणाऱ्या प्रकाशकांबरोबरच अदृश्य असलेले असंख्य हात आहेत. पुस्तकं इतकी निर्दोष आणि आकर्षक करण्यामागे त्या हातांची अथक मेहनत मला जाणवते. त्याच काळात माझ्या ‘आरण्यक’मधल्या मुक्तछंदातल्या ओळीची लांबी-रुंदी एका शब्दानंही चुकू नये, यासाठी डोळ्यांत तेल घालून राखण करणारे मोहन वेल्हाळ आठवतात. नंतरच्या काळात मॅजेस्टिकचं प्रूफरीडिंग करणारे- नुकतेच कालवश झालेले जाणकार साहित्यप्रेमी मनोहर बोर्डेकर, यांनी तर प्रूफरीडिंग कलेच्या पातळीवर पोहोचवलं होतं. हे लक्षात घेऊन मी पुस्तकात ‘मुद्रणसंस्कार’ असा वेगळा उल्लेख छापावा, अशी विनंती अशोक कोठावळ्यांना केली, ती त्यांनी आजतागायत प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत पाळली आहे!ं मनोहर बोर्डेकरांची मुद्रणशंका विचारणारी, तरीही प्रेम आणि आदर यांनी भरलेली पत्रं हा माझ्या लेखनसंपत्तीतला एक अमूल्य ठेवा आहे!
पुस्तक पाहताना पहिल्या क्षणीच ज्यांच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार होतो, त्या माझ्या उपकारकर्त्यांचा आता अगदी शेवटी उल्लेख करतो. हे आहेत अर्थपूर्ण, आकर्षक मुखपृष्ठं तयार करून पुस्तकाला चेहरा देणारे कसबी चित्रकार. माझं भाग्य थोर म्हणून माझ्या पुस्तकांना वसंत सरवटे, श्याम जोशी, रघुवीर तळाशीलकर, पद्मा सहस्रबुद्धे, सुभाष अवचट, पुंडलिक वझे, साईनाथ रावराणे, कमल शेडगे आणि अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी या सर्वच काळात आधुनिक ठरलेल्या थोर चित्रकारांची मुखपृष्ठं लाभली! यापैकी काहींनी नियतकालिकात प्रथम प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथांना काढलेली चित्रं इतकी कलात्मक आहेत, की मी ती जपून ठेवली आहेत. कधी ना कधीतरी त्यांचं प्रदर्शन भरवावं, असाही विचार आहे. खंत एकच वाटते, वयाच्या सातव्या वर्षांपासून मी ज्यांची चित्रं जमवत आलो, त्या दीनानाथ दलालांचं मुखपृष्ठ मात्र माझ्या एकाही पुस्तकाला लाभलेलं नाही!
माणूस आपला आपण मोठा होत नसतो. त्याच्या जडणघडणीत अनेकांचा वाटा असतो. लेखक आपला आपण समाजापर्यंत पोहोचत नाही. त्याला प्रकाशकांचा आणि त्यांच्या संपूर्ण सरंजामाचा आधार लागतो. तो ज्यांनी मला दिला, त्यांच्याविषयी मी कायम कृतज्ञ राहीन. आज आपण वाचनसंस्कृतीविषयी बोलतो, पण तिथवर नेणाऱ्या प्रकाशनसंस्कृतीचं काय? व्यवसाय, अर्थकारण, यांबरोबरच सचोटी, तत्त्वनिष्ठा, साहित्याविषयी प्रेम, उच्च अभिरुची, माणसं सांभाळणं आणि त्यांना मोठं करणं, असे प्रकाशन व्यवसायाचे अनेक मूलाधार आहेत. ते ज्यांनी वर्षांनुर्वष कसोशीनं जोपासले, ज्यांच्या सहवासात मी भाग्यवशात येऊ शकलो, ज्यांनी मला अकृत्रिम स्नेह दिला आणि लेखक म्हणून चेहरा दिला..