शनिवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज दुखद निधन झाले. खूप खूप दुख झाले. अश्रूंची शाई करून हे लिहितो आहे! कालपर्यंत बाळासाहेबांची तब्येत स्थिर होती. कोणीतरी म्हणाले, की तब्येत सुधारत आहे. पण दैवापुढे कोणाचे काय चालते? चालत नाही हेच खरे. आज एकदम पोरके झाल्यासारखे वाटते आहे. टीव्हीवरचे अँकर जे सांगतात तसेच वाटते आहे. बाळासाहेब म्हणजे खरेच मराठी माणसांचे आधार होते. आज त्यांच्यामुळेच या देशात मराठी माणूस टिकला आहे. नाही तर आज सगळे मराठी लोक लुंग्या नेसून, नाही तर खांद्यावर लाल गमछे टाकून िहडताना दिसले असते.
बाळासाहेबांना माझा व माझ्या सर्व कुटुंबातर्फे अखेरचा जय महाराष्ट्र!
उद्याचा ‘सामना’ घ्यायला पाहिजे.

 रविवार
मराठी माणसाचे दैवत बाळासाहेब आज पंचत्त्वात विलीन झाले. त्यांना निरोप देताना उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोघेही रडले. मलाही रडू आवरले नाही. अंत्ययात्रेला जायला पाहिजे होते. पण, ही म्हणाली आपल्यासारख्यांना तिथे कोण विचारणार? त्यापेक्षा टीव्हीवरूनच चांगले अंत्यदर्शन होईल. म्हणून घरीच थांबलो. तिचेच नेहमीप्रमाणे खरे ठरले. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला २० लाख लोक जमले होते म्हणे! आपण गेलो तर चार खांदेकरी धड मिळणार नाहीत. बाळासाहेब म्हणजे जाणता राजा होता, हेच खरे. त्यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा!
अंत्यसंस्काराच्या वेळी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकमेकांशी बोलताना दिसले. ते पाहून त्या परिस्थितीतही बरे वाटले. आता दोघांनी एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न पुरे करायला हवे, हीच सदिच्छा.
आज दूध आले नाही. कॅलेंडरवरसुद्धा लिहून ठेवले आहे.
 
सोमवार
आज सामना, लोकसत्ता, मटा, सकाळ, नवाकाळला पत्र पाठवले. त्यात लिहिले, की आपले साहेब गेले, युगान्त झाला, तसेच एका पर्वाची अखेर झाली. त्यांच्या निधनाने जनसागर, शोकसागर अनावर झाला.
मा. श्री. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आज देशाला, शिवसेनेला, उद्धवजी ठाकरेंना आणि आपल्या सगळ्यांना त्यांची खरी गरज होती. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या स्मृती आपल्या मनात कायम राहतील. शिवाजी पार्कच्या मदानावर त्यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे. तसेच अरबी समुद्रातही त्यांचा भव्य पुतळा उभारला, तर भावी पिढय़ांची चांगली सोय होईल. त्यांनी सांगितलेल्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय महाराष्ट्र.
 
मंगळवार
काल पाठवलेले पत्र फक्त ‘सामना’त छापून आले. ते कापून वहीत चिकटवून ठेवले. आज पुन्हा सगळ्या पेपरांना पत्र पाठवले. त्याला ‘स्मारक वहीं बनायेंगे’ असे हेिडग दिले.  
पण बाळासाहेबांच्या स्मारकाला काही नतद्रष्ट विरोध करीत आहेत. अरे, प्रसंग काय आणि तुमचे चालले आहे काय? सगळे ठाकरे कुटुंब अजून त्या धक्क्यातून सावरलेले नाही. अशा वेळी स्मारकाची मागणी केली तर ठीक आहे. पण अशा वेळी स्मारकाला विरोध करायचा असतो काय?
पत्र छापून आल्यामुळे ऑफिसात सगळ्यांना चहा द्यावा लागला. ७४ रुपये पाण्यात गेले. आता चार दिवस रिक्षाला सुटी. वैताग आहे.
सध्या फेसबुकची फार चर्चा आहे. चर्चगेटला कुठे फूटपाथवर फेसबुक मिळते का ते पाहा म्हणून चिरंजिवांना सांगायला हवे. पण त्यांना आमच्याशी बोलायला वेळ कुठे असतो?

बुधवार
फेसबुक हे खरे पुस्तक नसते. ते इंटरनेटवर असते, असे चिरंजिवांनी सांगितले. त्याला आयटीला पाठवले पाहिजे. मराठी माणसांनी या क्षेत्रात किती प्रगती केली आहे. आपण मागे राहायला नको. असो.
पेपरांना पत्र पाठवण्याऐवजी आपण फेसबुक लिहिले तर, असा एक विचार मनात आला आहे. बाळासाहेबांवर फेसबुक लिहायचे. पण नकोच ते. एखादा शब्द इकडेतिकडे झाला, तर वांधा व्हायचा. घरात तसे फार काचेचे सामान नाही. पण विषाची परीक्षा कशाला घ्यायची? अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा घरातले काचसामान महत्त्वाचे. (हाहाहा! हा विनोद आहे.)
अखेर आज कसाबला फाशी दिली. चला, एक मुद्दा संपला. पण फाशी जाहीरपणे द्यायला पाहिजे होती, ही उद्धवजींची मागणी मान्य करायला हवी होती. किमान टीव्हीवर तरी लाइव्ह दाखवायला पाहिजे होती! मालिका पाहून नुसता कंटाळा आलाय.

 गुरुवार
आज ऑफिसला दांडी मारली. वाचनालयातून आणलेला दिवाळी अंक वाचला. हिच्यासोबत ‘चार दिवस सासूचे’ पाहिली. अधूनमधून कुटुंबाला असा क्वालिटी टाइम दिलाच पाहिजे.

 शुक्रवार
शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या माझ्या मागणीला आज ऑफिसातल्या चव्हाणनी जोरदार पािठबा दिला. त्यामुळे त्याला कँटिनमध्ये नेऊन वडापाव खाऊ घातला. सावंतला चव्हाणनी पािठबा दिल्याचे सांगितले. तर सावंत म्हणाला, हा चव्हाण पक्का काँग्रेसवाला आहे. यात त्याची काहीतरी चाल असणार. मला ते पटले नाही. एकदा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक कधी तरी उभे राहिले, की मग हेही स्मारक होईल. मी तर म्हणतो, सगळीच स्मारके अरबी समुद्रात उभी करावीत, नाही तर मग सगळी मदाने अरबी समुद्रात बांधावीत. चांगली आयडिया आहे. पत्र लिहिले पाहिजे.

 शनिवार
आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणाला आठवडा झाला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या मार्गावरून चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे रस्ते व चौक निवडून त्यांना आदरणीय बाळासाहेबांचे नाव दिले पाहिजे.

रविवार
आज सुटी. मस्तपकी मटणाचा बेत होता. तडस लागेस्तवर नळ्या ओरपल्या आणि झोपलो. आता आठ दिवस या जेवणाची स्मृती मनात कशी दरवळत राहील!