माझ्या कन्सल्टिंग रूमच्या काचेतून बाहेर आलेले रुग्ण मला दिसत असतात. आज एक नवीन प्रौढ स्त्री lok12आणि तिच्याबरोबर तिची १४-१५ वर्षांची मुलगी होती. मुलीच्या वागणुकीत अजूनही एक अल्लडपणा दिसत होता. क्षणभर विचार आला, यातली रुग्ण कोण असेल? आई की मुलगी? आई असेल तर आम्लपित्त की सांधेदुखी? आणि मुलगी असेल तर? PCOD? बाप रे! नको. आजकाल हे असं होतं. एखाद्या किशोरवयीन मुलीच्या पोटात cyst चा गोळा असेल तर इकडे माझ्या पोटात भीतीचा गोळा येतो. त्याचं कारण ही समस्या तशी गंभीर आणि जटिल आहे, पण त्या मुलींचं ते समजण्याचं वयच नसतं. त्यामुळे यात रुग्णाचं सहकार्य लाभण्याची शक्यता फारच कमी असते. ते मिळाल्याशिवाय समस्या सुटणंही अवघडच नाही का?
दुर्दैवानं माझा अंदाज खरा ठरला. सायली PCOD ची शिकार होती, पण cool! स्त्रीशरीरातील ऋतुचक्र नियमित आणि सुयोग्य पद्धतीनं चालू राहणं हे त्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी, पुढील वैवाहिक आयुष्यासाठी किती आवश्यक आहे याची त्या भाबडय़ा जिवाला काय जाणीव? तो भार अर्थात मातेवर!
नेटवर आज या समस्येची सर्व माहिती उपलब्ध आहे, पण त्यात या समस्येचं निश्चित कारण आणि त्यामुळे निश्चित चिकित्सा उपलब्ध नाही. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या आजारात ऋतुचक्राचा अनियमितपणा, स्त्री-बीजनिर्मितीमध्ये अडथळा आल्यानं तरुण वयात लक्षात येणारं वंध्यत्व आणि स्थौल्य या प्रमुख विकृती आढळतात. रस, मेद, शुक्र या धातूंचं योग्य पोषण होत नसल्याच्या या खुणा आहेत. याला कारण मुळात असलेलं अग्निमांद्य (भूक आणि पचनशक्ती कमी असणं) आणि पोषक आहाराची कमतरता. (इथे फक्त आहार हा विषय असल्यानं त्याच कारणांचा उल्लेख केला आहे.)
आजची बाल आणि युवा पिढी यांचा आहार पोषक नाही हेच खरं आहे. चॉकलेटस्, वेफर्स, आइस्क्रीम, पाव, बेकरीचे म्हणजे मद्याचे पदार्थ, शीतपेये, पाणीपुरी-शेवपुरी असे चाट पदार्थ, बर्गर, विविध चवींचे सॉस, मिओनीज, न्यूडल्स या सगळ्या पदार्थामध्ये शरीराला वापरता येतील असे पोषक घटक नगण्य असतात. यातले काही पदार्थ तर नसíगक नाहीतच, कृत्रिम आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं हे शरीराला कळतच नाही. त्यांचं पचन करण्याचा प्रयत्न करण्यात आणि जे द्रव्य (शास्त्रात याला आहार-रस म्हणतात.) तयार होईल ते शरीरात पाठवण्यातच अग्नीची सगळी शक्ती खर्ची पडते. आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या शरीरधारक सात धातूंचे सात वेगवेगळे अग्नी असतात असं आयुर्वेदात सांगितलं आहे. जठरातील अग्नीकडून पचन करून आलेल्या आहार-रसावर हे धात्वग्नी काम करतात; त्यातून आपापल्या धातूला उपयुक्त अंश घेऊन त्यांचं धातूमध्ये रूपांतर करतात आणि राहिलेला भाग टाकाऊ म्हणून परत पाठवतात. दुर्दैवानं या जंक फूडमधून धातूंना उपयुक्त असं काही येतच नाही. जे येतं ते अनसíगक म्हणून अनोळखी असतं. (त्यातल्या कित्येक केमिकल्सचा शरीरावर काय परिणाम होतो याचं नीट संशोधनही झालेलं नाही. ते आपल्याला चालतं. हजारो र्वष उपयोगात असलेल्या आयुर्वेदशास्त्राला मात्र आपणच संशोधनाचे पुरावे मागतो.) धात्वाग्नींचा पण गोंधळ उडतो. पोषण कमी पडल्यानं धातूंची शक्ती कमी कमी होत जाते. रोज रोज तोच पुरवठा होत राहिला तर धात्वाग्नी तरी काय करणार? त्यातलाच काही भाग ते नाइलाजानं ठेवून घेतात, (रमीच्या डावात हवी ती पानं येत नसतील तर आपण नाही का आलेली निरुपयोगी पानं ठेवून घेतो..) साठवतात आणि वजन वाढू लागतं. या धात्वाग्नींची क्षमता पोटातल्या म्हणजे जठराग्नीवर अवलंबून असते. तो सेनापती (जठराग्नी) ढेपाळला की हे मावळे (धात्वाग्नी) किती लढणार? अशा रीतीने ती लढाई लढायची वेळ त्या रुग्णावरच येते.
सायलीच्या खाण्यात जंक फूडचा भरणा होताच. मी तो बंद करायला सांगितल्यावर रसद बंद केलेल्या सनिकापेक्षाही तिचा चेहरा वाईट झाला. या वयाच्या सगळ्या मुलींचं हे असंच होतं. लगेच तिची माता तिच्या मदतीला धावली. म्हणाली, ‘‘पाणीपुरी, शेवपुरी, पिझ्झा हे सगळे पदार्थ मी घरी करते. बाहेरचं आम्ही तिला काहीच देत नाही. मग काय हरकत आहे?’’
‘‘त्यानं काय फरक पडणार आहे?’’ मी विचारलं.
‘‘नाही म्हणजे, घरी कसं स्वच्छतेचे सगळे नियम पाळले जातात ना!’ सायलीच्या आईचा भाबडा विचार.
‘अहो, पिझ्झाचा बेस, पाणीपुरी-शेवपुरीच्या पुऱ्या, चाट मसाला, सॉस, ब्रेड, पाव, बटर, चीज हे सगळं तर तुम्ही विकतच आणणार ना? मग त्यात घरचं काय? गॅसची शेगडी आणि पाणी? शिवाय सगळेच आजार संसर्गजन्य असतात किंवा अस्वच्छता हे आजारांचं एकमेव कारण आहे असं थोडंच आहे? PCOD मध्ये तर तसं नाहीच. यात शरीरात जाणारे अन्नपदार्थ थेट शरीराच्या चयापचय क्रियेवर (metabolism) परिणाम करतात. पाळी येऊन गेल्यावर पुढचे काही दिवस स्त्रीशरीरात बीजनिर्मिती होत असते. या काळात फार खारट किंवा क्षारीय पदार्थ खाल्ले गेले तर बीजनिर्मितीमध्ये अडथळा येतो असं शास्त्र सांगतं. चायनीज पदार्थ, सॉसेस, पाणीपुरी यात क्षार किंवा मीठ जास्तच असतात. ते तुम्ही घरी केल्यानं काय बदलणार?’ माझ्या या बोलण्यावर त्या मातेनं किंचित विचार केला आणि म्हणाली, ‘‘मला पटतं हो, पण ही ऐकतच नाही. आणि हिच्या बरोबरीच्या सगळ्या मुली तेच पदार्थ खातात. मग हिला आपण किती वेळा नाही म्हणायचं?’’
सायलीच्या आईची ही समस्या प्रातिनिधिक आहे, हे मात्र खरं. पण त्यासाठी मुलांच्या लहानपणापासूनच पालकांनी जागरूक राहायला नको का? लाड म्हणून, आम्हाला मिळालं नाही म्हणून, सगळं खाण्याची सवय हवी म्हणून, जवळ पसे आहेत म्हणून, मुलांना आवडतं म्हणून – अशी तद्दन भंकस कारणं पुढे करून या कचऱ्याची/ विषाची चटक मुलांना कोण लावतं? आई-बाप झाल्यावरही आपल्याला जर आहाराबाबत योग्य-अयोग्य ठरवता येत नसेल, तर बिचाऱ्या मुलांना इतक्या लहान वयात सांगितल्याबरोबर ते कळेल आणि वळेल अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? मग यावर उपाय काय? तर या पदार्थाना उत्तम पर्याय असे घरगुती, ताजे, पोषक आणि चविष्ट पदार्थ- पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ, पराठे, आंबोळ्या, घावन, उकड, भाकरीचा काला, लाडू, कणकेच्या तिखट करंज्या. इ. खूप वैविध्य आपल्याकडे आहे- सगळ्या मातांनी ते बनवले पाहिजेत. हजारो रुपये खर्च करून, कार्यालयीन दगदगीतून वेळ काढून, फुशारकीने बेकरीचे, पंजाबी, चायनीज पदार्थ शिकून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यापेक्षा आपल्या आई/आजी/सासू/आजेसासू यांच्याकडून आरोग्यपूर्ण, पोषक आणि रुचकर पाककृती फुकटात शिकायला काय हरकत आहे?
सायलीसारख्या मुलींच्या अग्नीची वाट लावणारा मुख्य घटक म्हणजे व्यायामाचा अभाव. ‘मार्काच्या स्पध्रेत उतरवलेल्या आपल्या पाल्यानं अभ्यासाशिवाय इतर कुठलेही ‘फालतू’ उद्योग (व्यायाम, घरकाम, स्वत:ची कामं, खेळ, चालत शाळेत जाणं) केलेले आजच्या महत्त्वाकांक्षी पालकांना अजिबात खपत नाही. तरण्याताठय़ा मुलांना ते बसल्या जागी खायला-प्यायला देतात. (घरातल्या ज्येष्ठांना मात्र गुडघे दुखत असले तरी, ‘उठून पाणी घ्यायची सवय राहायला हवी!’ असा सल्ला दिला जातो.) अशा मुलांना भूक कशी लागणार आणि भारंभार खाल्लेलं पचणार तरी कसं?
औषधं, पंचकर्म याद्वारे PCOD वर इलाज करता येतात. पण ते खूप वेळखाऊ असतात आणि मुली ते गांभीर्यानं घेत नाहीत. लहानपणापासून योग्य आहार ठेवला तर केवळ PCOD च नाही, अन्य कित्येक आजारांपासून आपल्या मुलांना दूर ठेवता येऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत नेहमीच ‘तहान लागण्यापूर्वी विहीर खणणे’ इष्ट.