‘तंत्रजिज्ञासा’ सदराची सुरुवात आपण अशा गोष्टीपासून करणार आहोत, जिचा शोध मानवाने लावला; पण त्याचाच तो आज गुलाम  झाला आहे. तंत्रज्ञान वापरून जे काही आद्यशोध लावले गेले त्यात घडय़ाळाचा समावेश होतो. कालमापनाच्या पद्धती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. सूर्य-lok03चंद्राच्या स्थितीप्रमाणे पूर्वी काळ-वेळ ठरत असे. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास आज क्वार्ट्झ स्फटिकाच्या खडय़ाने नियंत्रित केल्या जाणाऱ्या घडय़ाळापर्यंत आला आहे.
इसवी सन पूर्व २००० पासून मानवाने कालमापनाचे प्रयत्न सुरू केल्याचे ज्ञात आहे. अथर्ववेदात पाण्यावर चालणाऱ्या कालमापनयंत्राचा उल्लेख आहे. ज्योतिषविद्य्ोत घटिका, पळे ही काळ-वेळेची मापने प्रमाण मानली आहेत. तसेच इ. स.पूर्व कालापासून अगदी १५ व्या शतकापर्यंत प्रचलित असलेली सावलीच्या आधारे सूर्याच्या चालीचा मागोवा ठेवणाऱ्या सूर्य-तबकडय़ाही जगभर सापडतात. (दिल्लीतील जंतरमंतरचे सूर्य-घडय़ाळ हे याचे अर्वाचीन उदाहरण.) या सर्व कालमापन तंत्रांमध्ये अधिक अचूकतेची व सर्वमान्य प्रमाणाची गरज होती. ती प्रथम पूर्ण केली ती यांत्रिक घडय़ाळाने. तीही विनासायास. म्हणजे वाळूचे घडय़ाळ पुन्हा उपडे करा, बुडलेले भांडे पुन्हा घटिकापात्रात मोकळे करून ठेवा.. असा सर्व खटाटोप वाचवून!
कालमापनाची मूलभूत गरज म्हणजे विशिष्ट काळाने पुन:पुन्हा तशीच घडणारी किंवा तयार होणारी परिस्थिती. लंबक ठरावीक वेळेमध्ये आवर्तन पूर्ण करतो आणि पुरेशी ऊर्जा त्यास देत राहिलो तर अनंत काळापर्यंत त्याच गतीने आवर्तन पूर्ण होते, याचा शोध लागल्यावर सुमारे १३-१४ व्या शतकात लंबक वापरून घडय़ाळे तयार व्हायला सुरुवात झाली. लंबक, गीअरची साखळी आणि ऊर्जास्रोत हे या तंत्राचे प्रमुख घटक. ऊर्जास्रोत हा वजन, साखळी स्वरूपात वा स्प्रिंगच्या स्वरूपात असतो. लंबकाला सतत गती मिळण्यासाठी या  ऊर्जास्रोताचा उपयोग होतो. लंबकाच्या वरच्या टोकाला असलेला हुक किंवा ‘कुत्रा’ प्रत्येक आवर्तनाला त्याला अडकवलेल्या गीअरचा एक दात/ काटा सोडतो (याचा होणारा टिकटिक आवाज घडय़ाळाचे व्यवच्छेदक लक्षण बनला.) आणि त्यातून पुढील गीअरची साखळी कार्यान्वित होते. या गीअरला जोडलेले काटे घडय़ाळाच्या दर्शनी भागातील वेळदर्शक तबकडीवर फिरू लागतात आणि आपल्याला वेळ समजते. या तंत्रामागील प्रमुख पायाभूत सूत्र कुठले, तर ते लंबकाच्या एका आवर्तनाला लागणाऱ्या वेळाचे सूत्र.. T = 2p xÖL/G. यातील p चे मूल्य स्थिर असल्याने आणि G  म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या मूल्यामधील उंचीनुरूप होणारा बदल अगदी क्षुद्र म्हणून नगण्य असल्याने, परिणामत: लंबकाच्या दोरीच्या लांबीवरच वेळ आपल्याला ठरवता येते. ही घडय़ाळे लोकप्रिय असतानाच मनुष्याला हे यंत्र कायम स्वत:बरोबर बाळगण्याचे स्वप्न पडू लागले आणि त्यातून जन्माला आले आधुनिक मनगटावरील घडय़ाळ! यामध्ये नियमित आवर्तने घेणाऱ्या लंबकाची जागा घेतली संतुलन चक्राने!!
पीटर हेनलीन यांच्याकडे पहिले खिशातील घडय़ाळ  १५१० मध्ये बनवण्याचे श्रेय जात असले तरी हा शोध १९ व्या शतकातलाच मानला जातो. कारण आजपर्यंत आपण पाहत असलेली, दिवसाला फार तर काही सेकंद मागेपुढे होणारी अचूक घडय़ाळे तेव्हापासूनच तयार होऊ लागली.
मनगटी घडय़ाळाची संकल्पना :
घडय़ाळाची दृश्य तबकडी आणि काटे वगळून जे राहते त्याला चलन (movement) म्हणतात. यात चार मुख्य घटक असतात. १. मेन स्प्रिंग- घडय़ाळ चालायला लागणारी ऊर्जा स्थायिक (Potential energy) स्वरूपात यात साठवली जाते. २. गीअर साखळी- यात पाच गीअर जोडलेले असतात. या साखळीकडे दोन जबाबदाऱ्या असतात.. अ) मेन स्प्रिंगमधील ऊर्जा संतुलन चक्राला पोहचवणे आणि त्याचे आंदोलन जारी ठेवणे, आणि ब) त्या आंदोलनांच्या आधारे सेकंद, मिनिट आणि तासाची चक्रे फिरवणे. यामध्ये मेन स्प्रिंगच्या साहाय्याने घडय़ाळाचे काटे हवे तसे फिरवून वेळ बदलता येण्याचीही सोय असते. ३. संतुलन चक्र (balance wheel)- हे चक्र सव्य (डावीकडून उजवीकडे) आणि अपसव्य (उजवीकडून डावीकडे) दिशेने कायम आंदोलत राहते. प्रत्येक आवर्तन हे अचूकपणे एकाच वेळेत पूर्ण होते. याच चक्रामुळे घडय़ाळ ‘वेळ’ पाळते. बहुतांशी घडय़ाळांमध्ये हे चक्र सेकंदाला ५, ६, ८ किंवा १० मात्रा/आवर्तने घेते. ४. सुटका/ धरसोड यंत्रणा (escapement mechanism) ऊर्फ कुत्रे- हीपण दोन कामे करते.. अ)प्रत्येक आवर्तनानंतर संतुलन चक्राला एक धका देऊन ते सतत चालू ठेवणे, आणि ब) त्याचवेळी गीअर साखळीतील गीअरचे दाते आवर्तनाच्या ठरावीक संख्येप्रमाणे सोडवणे.. त्यांची सुटका करणे. ठरावीक वेळाने होणाऱ्या या यांत्रिक हालचालीचाच ‘टिकटिक’ आवाज आपण ऐकतो.
या यांत्रिक घडय़ाळाच्या तालावर अवघे जग चालू लागले आणि अवलंबून राहू लागले ते थेट आजपर्यंत.
 पण १९६० च्या सुमारास क्वार्ट्झ खडय़ाचा घडय़ाळात वापर करण्याची प्रक्रिया सोपी व स्वस्त झाली आणि घडय़ाळ क्षेत्रात क्रांतीच झाली.                                     
-दीपक देवधर