पिण्याचे पाणी, रस्ते, कोळीवाडय़ांचा विकास असे अनेक प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत. पण दिल्लीमध्ये मुंबईचा आवाज बुलंद करण्यासाठी इथला एकही खासदार लोकसभेत उभा राहात नाही. हे खासदार गल्लीत दादागिरी आणि दिल्लीत चाटुगिरी करतात, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर सभेत केली.  
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी गिरगावच्या ठाकूरद्वार नाक्यावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आघाडीवर टीका करताना, दरवर्षी एकटय़ा मुंबईकडून दिल्लीच्या तिजोरीत दीड लाख कोटी रुपये जमा केले जातात. पण त्या बदल्यात मुंबईला काय मिळते, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारवर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. दोन वर्षांत आम्ही राज्य कर्जमुक्त करू, असे उद्धव म्हणाले. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा संपुष्टात आला आहे. त्यामुळे रेसकोर्ससाठी मुंबईबाहेर जागा देऊन महालक्ष्मी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान साकारण्याचा विचार होता. त्यामुळे पर्यटकांसाठी एक पर्यटन स्थळ उपलब्ध झाले असते. पण इतिहासात रमायचे आणि भविष्यात काही करायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.