रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराचे शेतीवर परिणाम होऊ शकतात. जमिनीचा पोत कमी होऊ शकतो, पिकांमध्ये कीटकनाशकांचे अंश पिकात आढळून येत असल्याचे समोर आले होते, ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तीन हजार हेक्टरवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यत १ लाख ३४ हजार हेक्टर एवढे खरीप लागवडीखालील क्षेत्र आहे. यातील १ लाख २४ हजार हेक्टरवर भात पिकाची तर उर्वरित क्षेत्रावर नागली आणि कडधान्य पिकाची लागवड केली जात असते. शेतीसाठी प्रामुख्याने युरिया आणि डीएपी सारख्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. मात्र खताची मात्रा अतिरिक्त झाल्यास त्याचे परिणाम पिकावर होताना दिसून येतात. तर सतत रासायनिक खते वापरल्याने जमिनीचा पोत कमी होत जातो. त्यामुळे रासायनिक शेतीला सेंद्रिय शेती हा उपयुक्त आणि चांगले उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो.  ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यत सेंद्रिय शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघातील एका गावात हा प्रयोग केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सुरुवातीला एकूण तीन हजार हेक्टर क्षेत्रावर या सेंद्रिय शेती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सेंद्रिय शेतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यतील कृषी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी नुकताच सिक्कीम राज्याचा दौरा केला आहे. सिक्कीम हे १०० टक्के सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य आहे.

या दौऱ्यात सेंद्रिय शेतीचे फायदे, ती कशी करावी, सेंद्रिय खत कशी तयार करावी, कीटकनाशक म्हणून सेंद्रिय घटकांचा कसा वापर करावा याची शास्त्रशुद्ध माहिती या पथकाला देण्यात आली. या अभ्यास दौऱ्यानंतर जिल्ह्यतही सेंद्रिय शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. .

या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला सेंद्रिय शेतीसाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल, हळद, भुईमूग, वाल, कडधान्य, तूर, किलगड आणि भाजीपाला या पिकांसाठी सेंद्रिय शेतीची लागवड कार्यक्रम हाती घेतला जाईल. या शेतकऱ्यांना सेंद्रिय खते आणि गांडूळ खतांचा पुरवठा केला जाईल, सेंद्रिय कीटकनाशके तयार कशी करावी याची माहिती देऊन फवारणीचे तंत्र अवगत करून दिले जाणार आहे. यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकेल.

सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या उत्पादनांना महानगरांमध्ये मोठी मागणी असते. मुंबई जवळ असल्याने रायगड जिल्ह्यतील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल. रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे. आगामी रब्बी हंगामापासून यावर प्रत्यक्ष काम सुरू करता येऊ शकेल. आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी जिल्हा परिषद कृषी व पशुसंर्धन सभापती अरिवद म्हात्रे यांनी सांगितले.

meharshad07@gmail.com