पंढरपूरची आषाढी यात्रेनंतर परतीच्या मार्गावर निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी नातेपुते (ता. माळशिरस) येथे मुक्कामाला असताना मिठाईच्या दुकानात स्वयंपाक गॅसचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत एका वारक -यासह बारा जण भाजून जखमी झाले.
पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर नातेपुते येथे डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या मैदानालगत विशाल स्वीट्स अ‍ॅन्ड बेकरी या दुकानात अचानकपणे स्वयंपाक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पालखी सोहळा दाखल होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर ही दुर्घटना घडली. घरगुती गॅस सिलिंडरमधून वाणिज्य वापराच्या गॅस टाकीत गॅस भरत असताना टाकीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दुकानमालक श्रीपती तुकाराम गणगे (५४), त्यांचा मुलगा संदीप गणगे (२३) यांच्यासह लक्ष्मण दामोदर शिंदे (४५, रा. जालना) हा वारकरी आदी बारा जण भाजून जखमी झाले. सर्व जखमी हे २० ते ४५ टक्के भाजून जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.