नाशिकसह राज्यातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना शुक्रवारपासून पैसे परत मिळण्यास सुरूवात होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, गुंतवणूकदारांनी गुंतविलेली रक्कम त्यांना व्याजासह मिळणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे अमिष दाखवून कोटय़वधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडे आतापर्यंत १४ हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात प्रथम नाशिक शहरातील १२५ ठेवीदारांना हा परतावा देण्यात येणार आहे.
देशात आजवर उघडकीस आलेल्या या स्वरुपाच्या घोटाळ्यांमध्ये गुंतवणूकदारांना अतिशय कमी कालावधीत पैसे परत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मैत्रेय कंपनीकडून फसवणूक झाल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत १४ हजारहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. संबंधितांच्या फसवणुकीची रक्कम सुमारे ३३ कोटी आहे. इस्क्रो खात्यात मैत्रेय कंपनीने पैसे जमा केल्यामुळे न्यायालयाने संचालिका वर्षां सत्पाळकर आणि जनार्दन परुळेकर यांना कायमस्वरुपी जामीन मंजूर केला. कंपनीच्या मालमत्तेची यादी आधीच पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे. तक्रारदारांच्या फसवणुकीच्या रकमेपेक्षा मैत्रेयकडे त्याहून अधिक किंमतीची मालमत्ता आहे. मागील काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांचे या घडामोडींकडे लक्ष लागले होते. अलीकडेच न्यायालयाने त्यास मान्यता दिल्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मैत्रेय कंपनीचे इस्क्रो खात्यात सहा कोटी ३५ लाख रुपये आहेत. कंपनीच्या देशभरात तब्बल एक ते दीड हजार कोटींची मालमत्ता असून त्यांच्या जप्तीची प्रक्रियाही सुरू आहे.
ठेवीदारांच्या रकमेचा परतावा देण्यासाठी समितीने ज्या ठेवीदारांचा परतावा कमी रकमेचा आहे, त्यांना सुरूवातीला रक्कम देण्यास सांगितले आहे. तसेच नाशिक शहरातील ठेवीदारांच्या परताव्यानंतर इतर जिल्ह्यातील ठेवीदारांना इस्क्रो खात्यातून परतावा देण्याचे न्यायालयाने सूचित केले आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने मुदत संपलेल्या व कमी देय रकमेचा परतावा असलेल्या ठेवीदारांची यादी तयार करण्यास सुरूवात केली. त्यातील १२५ ठेवीदारांची यादी समितीने मंजूर करत संबंधितांना या रकमेचा परतावा देण्यात येणार आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे पोलिसांकडे देण्यासाठी गुरूवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात ठेवीदारांची गर्दी झाली होती.
शुक्रवारी दुपारी चार वाजता पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते गुंतवणूकदारांना परताव्याचे वितरित होणार आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. उर्वरित गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा न्यायालयाच्या आदेशातील अटीप्रमाणे समितीच्या छाननीनंतर तयार करण्यात येणाऱ्या यादीप्रमाणे इस्क्रो खात्यातून ठेवीदारांच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या मंजुर यादीतील ठेवीदारांना समिती सदस्यांनी दूरध्वनी केल्यानंतर स्वत:चे छायाचित्र, बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत, कंपनीचे त्यांच्याकडील उपलब्ध कागदपत्र घेऊन जमा करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.