अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ बुधवारी दुपारी क्रूझर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तर, लातूर जिल्ह्यातील चापोलीजवळ रिक्षा आणि मालमोटारीमध्ये झालेल्या दुसऱ्या अपघातातही एकाच कुटुंबातील सात जणांचा जीव गेला.
बुलडाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे राहणारे माणिक पाटील (६७) हे आपला मुलगा अरविंद (२७) याच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील आर्वी येथे जात होते. मूर्तिजापूरजवळ अमरावतीवरून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या क्रूझरला समोरून धडक दिली. यात माणिक व अरविंद यांच्यासह सचिन पाटील (१८), प्रभाकर शेनू बोरले (७०), वसंता माधव पाटील (६०), प्रकाश रामचंद्र पाटील (५७), भास्कर रामा किनगे (६५) व भास्कर नीळकंठ पाटील (६८) यांचा मृत्यू झाला. क्रूझरचा चालक शंकर टफ अपघातात गंभीर जखमी असून त्याच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 लातूर जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात चाकूर तालुक्यातील चापोली गावातील शेख कुटुंबावर काळाने घाला घातला. खरूनबी शेख यांना अर्धागवायू झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शेख कुटुंबीय देवणी येथे रिक्षाने निघाले होते. मात्र, चापोलीपासून काही अंतरावरच त्यांच्या रिक्षाला ट्रकने धडक दिली. या अपघातात खरूनबी यांच्यासह इकबाल मलंग शेख (वय ३५), जब्बार मलंग शेख (२३), मकदुम शेख (५०) हे तिघे भाऊ, नजमुनबी मलंग शेख (आई), रिझवाना हसन पठाण (बहीण), हसन पठाण (जावई) यांचा मृत्यू झाला. तर तिघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.