सोलापूर जिल्हय़ात उन्हाळय़ाची तीव्रता वाढत असताना पाण्याची टंचाईही भासू लागली आहे. सध्या जिल्हय़ातील विविध पाच तालुक्यांतील २५ गावे व १२३ वाडय़ावस्त्यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मंगळवेढा, सांगोला, माढा, करमाळा व उत्तर सोलापूर या पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. मागील सलग दोन वर्षे जिल्हय़ात दुष्काळ पडला होता. त्या वेळी ७५०पेक्षा अधिक संख्येने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्याच्या कटू आठवणींना टंचाईग्रस्त भागात उजाळा मिळत आहे.
सध्या सर्वाधिक ७ टँकर मंगळवेढा तालुक्यात सुरू आहेत. तर सांगोला (२), माढा (४), करमाळा (५) व उत्तर सोलापूर (२) याप्रमाणे पाण्याचे टँकर कार्यरत आहेत. या टंचाईग्रस्त भागातील लोकसंख्या ४७ हजार ५६८ इतकी आहे. पाण्यासाठी शासकीय १० तर ११ खासगी टँकर वापरले जात आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाण्याचा प्रश्न चांगलाच भेडसावला असता जिल्हय़ात पाण्यासाठी ५११ टँकरचा वापर केला जात होता.