अमरावतीमधील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाचवेळी चार नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. चार नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रविवारी रात्री ही घटना घडली. बालकांच्या मृत्यूमुळे त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉक्टरांच्या चुकीमुळेच नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अमरावती व आसपासच्या भागातील लोक उपचारांसाठी पंजाबराव देशमुख रुग्णालयात येतात. मात्र एकाचवेळी चार बालकांचा मृत्यू झाल्याने अमरावतीमध्ये खळबळ माजली आहे. उपचार सुरु असताना बालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

चारही बालकांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. ‘चारही मुलांच्या अंगावर लाल चट्टे होते. त्यांच्यावर औषधांचा परिणाम झाला असावा आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा,’ असे मृत बालकांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आणि रुग्णालयातील टीम या घटनेची चौकशी करणार आहे. या चौकशीतूनच नवजात अर्भकांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.