वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून देशात या वर्षांत आतापर्यंत ५० वाघांचा बळी गेला आहे, तर ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह इतर अवयव जप्त करण्यात आले आहेत. त्यातील तीन घटना महाराष्ट्रातल्या आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडेवारीनुसार २०१४ मध्ये ऑक्टोबर अखेपर्यंत ५० वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १२ वाघांचे मृत्यू मध्यप्रदेशात झाले आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत ९, उत्तराखंडमध्ये ६,आसाममध्ये ५, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी ४ वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वर्षांरंभीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर रेंजमध्ये एका वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण तपासात आहे. गेल्या २४ जून आणि १९ जुलैला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात दोन वाघांचे मृत्यू झाले, तर चार दिवसांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात एका वाघाचा बळी गेला. उपासमारीमुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात ६३ वाघांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. त्यात कर्नाटकमधील सर्वाधिक १५ आणि महाराष्ट्रातील १० वाघांचा समावेश होता.
वाघांची शिकार आणि कातडीसह अवयवांची तस्करी हा गंभीर प्रश्न बनला आहे. यावर्षी राज्यात आतापर्यंत तीन ठिकाणाहून वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे. १३ आणि १७ मार्चला सांगली जिल्ह्यातून, तर २७ जुलैला भंडारा जिल्ह्यातून ही कातडी जप्त करण्यात आली होती. वाघांची शिकार करून वाघाची कातडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. ‘स्थानिकांना वाघाच्या कातडीची दहा-वीस हजार रुपये किंमत मिळाली तरी ती पुरेशी असते, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याच कातडीची १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. त्यामुळेच बडे तस्कर या व्यवसायात गुंतले आहेत. चीन हा वाघांच्या अवयवांचा प्रमुख खरेदीदार देश आहे. कातडी ही वैभवाचे चिन्ह म्हणून तर इतर अवयव हे औषधी गुणधर्मासाठी खरेदी केले जातात.’ असे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले. कायद्याचे उल्लंघन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांना भरपूर मागणी आणि प्रचंड पैसा मिळत असल्याने वन्यप्राण्यांची सर्रास शिकार होत आहे. सीबीआयने तस्कर प्रतिबंध व वन्यप्राणी संरक्षणासाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. वनविभागाच्या वतीने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण तस्करीला पायबंद घालता आलेला नाही, हे वाघांच्या कातडीच्या जप्तीच्या घटनांनी दाखवून दिले आहे. ज्या ५० वाघांचा आतापर्यंत मृत्यू झाला त्यापैकी ४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालात म्हटले आहे. ५ वाघांची शिकार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आणि कातडीही जप्त करण्यात आली. ४१ प्रकरणांचा तपास सध्या सुरू असल्याचे त्यात नमूद आहे. वाघांसह वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याची जुनी ओरड अजूनही कायम आहे.