पत्नी किरण रावसह आनंदवाडी, तगरखेडा येथे श्रमदान

सत्यमेव जयते वॉटरकप स्पध्रेतील आनंदवाडी व तगरखेडा या दोन गावाला सिने अभिनेते अमीर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी भेट दिली. कामाची पाहणी केली व प्रत्यक्ष श्रमदानही केले. जलसंधारणाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यामुळे मोठे प्रोत्साहन मिळाले.

पाणी फाउंडेशनच्या वतीने या वर्षी वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पध्रेत लातूर जिल्हय़ातील निलंगा व औसा या दोन तालुक्यांतील अनेक गावांनी सहभाग घेतला आहे. मागील महिन्यात अनेक गावांतील ग्रामसभेच्या दरम्यान व्हीसीडीमार्फत अमीर खान यांनी प्रत्यक्ष संवाद साधला होता व या संवादातून गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. मंगळवारी अचानक त्यांनी जिल्हय़ातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर व तगरखेडा या दोन गावांना भेटी दिल्या. हातात टोपले व फावडे घेऊन गावकऱ्यांसोबत त्यांनी श्रमदान केले. श्रमदानानंतर गावातील लोकांसोबत त्यांनी आणलेल्या नाश्त्याचाही आस्वाद घेतला.

गावात या सिने अभिनेत्याला पाहण्यासाठी तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अमीर खानने भेट दिल्यामुळे स्पध्रेत क्रमांक पटकावयाचाच या जिद्दीने या दोन्ही गावांतील नागरिक आता नव्या जोमाने कामाला लागले आहेत.