खुनाच्या गुन्ह्य़ात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने मंगळवारी दुपारी शहरातील जिल्हा कारागृहात (सबजेल) गळफास घेऊन आत्महत्या केली. बबन दामोदर साळवे (वय २७) असे त्याचे नाव आहे. कारागृहातील गोदामात त्याने सुतळ्या एकत्र बांधून, छाताला लटकवलेल्या तराजूच्या दांडय़ाला गळफास घेतला. यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
साळवेनगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी होता. गावातीलच एका विवाहित महिलेचा १४ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजता कु-हाडीचे घाव घालून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्याची दि. २० ऑगस्टला न्यायालयीन कोठडीसाठी सबजेलमध्ये रवानगी झाली. तेव्हापासून तो तेथेच होता. दि. ७ नोव्हेंबरला सुनावणीसाठी न्यायालयात नेल्यावर त्याची नातेवाइकांशी भेट झाली होती.
मंगळवारी सकाळी साळवे याला कामासाठी इतर सात ते आठ कैद्यांबरोबर बाहेर काढण्यात आले. रेशनचे धान्य घेण्यासाठी हे सर्व कैदी गोदामात गेले होते. परंतु इतरांबरोबर साळवे बाहेर आलाच नाही. त्यांच्यासमवेत एक हवालदार होता, त्याचीही ही बाब लक्षात आली नाही. तो गोदामातील धान्याच्या थप्पीमागे लपला होता. कारागृहात दुपारी १२ वाजता बाहेर काढलेल्या कैद्यांची मोजणी करून परत त्यांना बराकीत पाठवले जाते. त्या वेळी ही बाब लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू करण्यात आला. त्यानंतर साळवे याचा गळफास घेतलेला मृतदेह गोदामात आढळला.