सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाच्या निर्णयानुसार शहरात सध्या अनधिकृत प्रार्थनास्थळांविरूध्द कारवाई करण्यात येत असून शुक्रवारी सातपूर, सिडको प्रशासनाच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ११ प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यात आली.

याअंतर्गत मार्गशीर्ष स्वामी विवेकानंद नगरमध्ये झाड व ओटा तसेच प्रार्थनास्थळ, स्टेट बँक चौक, महाराणा प्रताप चौक, औदुंबर बस थांबा छत्रपती नगर, पेलीकन पार्क, सातपूर एमआयडीसीतील संतोषी माता नगर येथील प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यात आली. अतिRमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे आयुक्त अभिषेक कृष्णा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार . उपआयुक्त आर. एम. बहिरम, सिडको प्रशासक कांचन बोधले यांच्या अधिपत्याखाली डॉ. सुनीता कुमावत, आर. आर. गोसावी , नगररचना विभागाचे अभियंता, बांधकाम विभागाचे अभियंता व पथक, अतिRमण विभागाचे दोन पथके, सिडको प्रशासन विभागाचे अभियंता व पथक, अंबड व सातपूरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांचे सुमारे ५० कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महापालिकेने बेकायदेशीरपणे प्रार्थनास्थळांचे बांधकाम करणाऱ्यांना बेकायदेशीर व अतिक्रमीत प्रार्थना स्थळे काढून घेण्यासंदर्भात सूचित केले आहे. ज्यांनी आवाहनास प्रतिसाद दिलेला नाही, असे नागरिक, मंडळ तसेच संघटनांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांनी बेकायदा प्रार्थनास्थळे काढली नसतील, त्यांनी ती काढून घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.