शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केल्यानंतर ‘लोकसत्ता’ने लिहिलेल्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाचा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र निषेध केला. अग्रलेखाची भाषा योग्य नसून त्यामुळे निराश शेतकऱ्यांच्या भावनांवर तेल ओतले गेले आहे. चौथ्या स्तंभाने आपली जबाबदारी ओळखावी, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
विजय औटी यांनी अग्रलेखाबद्दल औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तर जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. तो नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी या अग्रलेखाबद्दल वृत्तपत्राचा निषेध करण्याची विनंती अध्यक्षांना केली.
वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित आहे आणि त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची राजकीय टीका आम्ही सहन करू आणि योग्य ठिकाणी उत्तरही देऊ; पण वृत्तपत्र स्वातंत्र्य असले तरी इतरांच्या स्वातंत्र्यांवर अधिक्षेप गाजविण्याचा हक्क त्यातून मिळत नाही. शेतकरी अडचणीत व निराश असल्याने तो आत्महत्या करीत आहे, स्वखुशीने करीत नाही. सर्वानी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, यासाठी मदतीचे पॅकेज दिले आहे. सभागृहाने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्याने निषेधाचा ठराव करण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विजय औटी यांनी आपण पाच एकर जिरायती जमीन संपादक गिरीश कुबेर यांना देतो. त्यांनी मेहनत करून आपल्या पत्नीच्या अंगावर सोन्याचे दागिने करून दाखवावेत, असे आव्हान दिले.
बळीराजाच्या वेदनांवर फुंकर घालून त्याला मायेचा हात देण्याऐवजी त्याच्या जखमांवर अग्रलेखातून मीठ चोळण्यात आल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
मुंबईत वातानुकूलित केबिनमध्ये बसून महाराष्ट्राचे चित्र पाहून अंदाज करायचा आणि लिहायचे, यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रात फिरून परिस्थिती पाहून लिहायला हवे होते, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. गेले दोन-तीन वर्षे शेतकरी सतत अडचणीत येत आहे. मुख्यमंत्र्यांनीही अनेक भागांमध्ये भेटी देऊन पाहणी केली आहे आणि मन हेलावणारी परिस्थिती आहे. आयाबहिणींच्या अंगावरील दागिने हे स्त्रीधन असून त्याचा उल्लेख करणेही चुकीचे आहे, असे थोरात यांनी नमूद केले.
कुबेर यांनी लिहिलेला अग्रलेख आश्चर्यकारक असल्याचे सांगून छगन भुजबळ म्हणाले, शेतकरी करोडपती नाही. त्यांची अवस्था पाहण्यासाठी मुख्यमंत्री गेले, केंद्रीय पथक गेले आणि पॅकेज दिले गेले. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखविण्याऐवजी मदत करणाऱ्यांना अग्रलेखात मूर्ख ठरविले गेले आहे.  एखादा कलाकार, गायक-वादक आर्थिक विपन्नावस्थेत गेल्यावर त्याला मदत का करायची, त्याच्यासाठी अश्रू का ढाळायचे, असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. जत्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली, तर तेथे जाणाऱ्यांना मूर्ख ठरविण्यात आले आहे.
अग्रलेखाचा निषेध करायला हवा, असे मत अ‍ॅड. आशीष शेलार यांनीही व्यक्त केले.