कोकणातील हापूसचा आंबा युरोपीय देशांमध्ये निर्यात करण्यावरील बंदी उठली असली तरी निर्यातीपूर्वी त्यावर उष्ण पाणी प्रक्रियेची घातलेली अट अडथळा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आंब्यामध्ये फळमाशीचा प्रादूर्भाव आढळल्यामुळे गेल्या वर्षी युरोपीय देशांनी आयात रोखली होती. ही बंदी उठवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाल्यानंतर या देशांमध्ये यंदा पुन्हा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. पण, येथून आंबा निर्यात होण्यापूर्वी त्यावर उष्ण पाण्याची प्रक्रिया (हॉट वॉटर ट्रीटमेंट) बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे ५२ अंश तापमानाच्या पाण्यातून हा आंबा न्यावा लागणार आहे. प्रसिध्द आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले की, हापूस हे नाजुक फळ आहे. एवढी उष्णता त्याला मानवेल का, याबाबत शंका आहे. म्हणून उष्ण पाण्याची प्रक्रिया केल्यानंतर त्या फळाची प्रयोगशाळेत तपासणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी यंत्रणा उभारून मार्च महिन्यात चाचण्या घेण्यात याव्यात आणि नंतरच नियमित प्रक्रिया करून आंबा युरोपला निर्यात करावा, असा इशारा डॉ. भिडेंनी दिला.