शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीने आणखी एकाचा बळी घेतला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाजार समिती चौकाजवळ एका कंटेनरची धडक बसून सुनील जगन्नाथ कानडे (वय २५, रा. टिळक रस्ता नगर) या मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात साडेबाराच्या सुमारास झाला.
बाजार समिती चौकालगतच्या स्टेट बँक बाजूलगतच्या गेटसमोर, सुनीलच्या मोटारसायकलला औरंगाबादकडून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरची (एमएच १२ एक्यू ६८१२) धडक बसली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक कंटेनर सोडून पळून गेला. सुनील माळीवाडा वेशीजवळ वडापाव विक्रीचा व्यवसाय करत होता. मंगळवारी सकाळी त्याच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
सक्कर चौक ते चांदणी चौकापर्यंत रस्ते दुभाजक टाकण्यात आल्याने अनेक दुचाकीस्वार ‘यू टर्न’ टाळण्यासाठी विरुद्ध बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे अनेकदा छोटेमोठे अपघात होतात. वाहतुकीची कोंडीही होते. या अपघातात सुनील कानडे असाच यू टर्न टाळण्यासाठी विरुद्ध बाजूने जात होता का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले. सुनीलचा मृत्यू झाल्याने व कंटेनरचालक पळून गेल्याने अपघात नेमका कसा झाला, हे स्पष्ट झाले नसल्याचे तपासी अधिकारी सहायक उपनिरीक्षक दुसुंगे यांनी सांगितले.