भाजप सरकारला डोके नाही. हेल्मेट, कांदा असो किंवा डाळीचा मुद्दा, एकाही विषयावर काय निर्णय घ्यावा, हेच भाजप सरकारच्या मंत्र्यांना कळेनासे झाल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ते शनिवारी नाशिक येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारवर हल्ला चढवला.  न खाऊंगा न खाने दूँगा’, ही नरेंद्र मोदींची घोषणा केवळ डाळींच्याबाबतीत खरी ठरली आहे, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. तसेच सरकार महागाई, शेतकरी आत्महत्या, पीक विमा या महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, त्यांनी सरकारच्या आडतबंदीच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आडत बंदीच्या निर्णयाआधी कांद्याला पर्यायी व्यवस्था द्यायला हवी होती, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. हेल्मेट सक्तीचा निर्णय हा डोके नसलेल्या सरकारने घेतलेला निर्णय आहे. हेल्मेट सक्तीला स्थगिती म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसल्याचे उदाहरण आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि सरकार निष्प्रभ झाल्याचे सिद्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी अशोक चव्हाण यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केले. नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच काँग्रेसचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ऐनवेळी परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेऊ, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला.