जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावल्याने जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात सतर्कता व्यक्त होऊ लागली आहे. मात्र हा दबावतंत्राचा भाग असावा, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि. ७ मेला होणार असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळेच गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अजित पवार यांनी बारामती येथे ही बैठक बोलावली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, माघारीच्या वेळीच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळेच अजित पवार यांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बँकेत राष्ट्रवादी-काँग्रेसचा थोरात गट-भाजप अशी युती आहे. गेल्या निवडणुकीतच काँग्रेसमधील विखे गटाला बाजूला ठेवून ही आघाडी करण्यात आली होती. यातील अपवाद वगळता स्थानिक पातळीवरील सर्वच प्रमुख नेत्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जुन्याच राष्ट्रवादी-काँग्रेसचा थोरात गट-भाजप असेच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. याही निवडणुकीत काँग्रेसच्या थोरात गटाशीच युती करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या जिल्हय़ातील नेत्यांनी घेतला होता. त्यानुसार मोर्चेबांधणीही सुरू आहे. बँकेतील जुनीच मोट बांधण्यात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी पुढाकार घेतला होता. मात्र आता पुन्हा ऐनवेळी अजित पवार यांनी पक्षाच्या जिल्हय़ातील नेत्यांची बैठक बोलावल्याने याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले हे दोघेही या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीतीलच काही नेते विखे यांच्याशी जवळीक ठेवून आहेत या पाश्र्वभूमीवर बारामतीच्या बैठकीबाबत उत्सुकता व्यक्त होते. ही कुंपणावरची मंडळी काय भूमिका घेतात आणि अजित पवार कोणता आदेश देतात याकडे लक्ष आहे.